
मुंबई : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवान, पोलीस अधिकारी आणि निष्पाप नागरिकांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यानिमित्ताने गेटवे ऑफ इंडिया येथे राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (NSG) ‘#NEVEREVER’ स्मृती आणि शपथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. “हा घाबरणारा भारत नाही, तर दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देणारा भारत आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाला एनएसजीचे महासंचालक श्रीनिवासन, मेजर जनरल मुकेश गढवाल, फोर्स वनचे महासंचालक एस. जयकुमार, शहीद पोलीस अधिकारी आणि नागरिकांचे कुटुंबीय तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
हुतात्म्यांच्या शौर्याला अभिवादन
26/11 च्या हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन, हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक शूरवीरांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. या सर्वांच्या शौर्याला शिंदे यांनी अभिवादन केले. हुतात्म्यांच्या कुटुंबीयांप्रती महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.
तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा चेहरा जगासमोर उघड झाला, असे शिंदे यांनी सांगितले.
मुंबई पोलीस आणि एनएसजी कमांडोंच्या शौर्याचे कौतुक
हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी शहराच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने लढा दिला. त्यांच्या धाडसी कारवाईमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले. या सुरक्षा दलांचे योगदान शब्दांत व्यक्त करता येणार नाही. त्यांच्या त्यागाचे आणि धैर्याचे स्मरण देश कायम ठेवेल, असेही शिंदे म्हणाले.
‘दहशतवादाला निर्णायक उत्तर देणारा नवा भारत’
2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आल्याचे शिंदे यांनी नमूद केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
एअर स्ट्राइकसारख्या कारवायांमधून भारताची बदललेली भूमिका जगासमोर आली आहे. निषेध आणि निंदा करून थांबणारा नव्हे, तर दहशतवादाला निर्णायक प्रत्युत्तर देणारा हा नवा भारत आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘हुतात्म्यांच्या बलिदानाचे आपण कायम ऋणी’
देशाची सुरक्षा ही केवळ सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि कुटुंबीयांसह सुरक्षा दलांचे अधिकारी, मुंबई पोलीस आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी, “जिनकी वजह से आज हमारी जिंदगी है, उन शहीदों के हम कर्जदार हैं,” या शब्दांत हुतात्म्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.






