
इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 13 कामगारांचा मृत्यू झाला असून, 13 कामगार अजूनही बेपत्ता आहेत. गुरुवारी स्थानिक शोध आणि बचाव पथकाच्या प्रमुख देसियाना कर्तिका बहारी यांनी मृतांचा आकडा जाहीर केला. बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाला पाणी, अंधार आणि निसरड्या, अरुंद वाटेचा सामना करावा लागत आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मंगळवारी मिळाली. मात्र प्रत्यक्षात पाणी शिरण्याची घटना त्याच्या सुमारे 16 तास आधीच घडली होती. त्यानंतर जवळच्या सरकारी खाण कंपनी पीटी अँटमने बुधवारी मध्यरात्रीनंतर जकार्ता शोध आणि बचाव संस्थेला औपचारिक माहिती दिली. त्यानंतरच पूर्ण ताकदीनं बचाव मोहीम सुरू झाली.
ही खाण बेकायदेशीरपणे चालवली जात असल्यामुळे अधिकाऱ्यांना लगेच माहिती मिळाली नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुरुवातीला स्थानिक खाण कामगार आणि गावकऱ्यांनी स्वतःच खाणीतलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं. ही खाण बोगोर येथील पोंगकोर परिसरात आहे. हा डोंगराळ भाग राजधानी जकार्तापासून सुमारे 60 किलोमीटर दक्षिणेला आहे. इथे सरकारी कंपनी अँटम सोन्याच्या खाणकामाचं काम करते. बचाव मोहिमेत सुमारे 325 जवान गुंतले आहेत. खाणीचे खड्डे सुमारे 100 मीटर खोल आहेत. आत अरुंद जागा, कमी प्रकाश आणि निसरडी जमीन यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
“खड्ड्याची खोली, अरुंद वाट आणि कमी प्रकाश, या गोष्टी लक्षात घेऊनच शोधाची रणनीती ठरवली जात आहे. बचाव पथकाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात आहे,” असं देसियाना यांनी सांगितलं. पश्चिम जावा पोलीस प्रवक्ते हेंद्रा रोचमावन यांनी सांगितलं की, सोमवारी खाणीत पाणी शिरण्यापूर्वी 11 कामगार सुरक्षितपणे बाहेर पडू शकले. इंडोनेशियासारख्या खनिजसंपत्ती असलेल्या देशात लहान प्रमाणावर आणि अनधिकृत खाणकामामुळे अशा दुर्घटना वारंवार घडतात. दुर्गम भागात असलेल्या या खाणींवर नियंत्रण ठेवणं अधिकाऱ्यांसाठी अवघड ठरतं, असंही सांगितलं जात आहे. बेपत्ता कामगारांचा शोध अजूनही सुरू आहे.






