मुंबई : संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने विरोधी पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शप) सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, शरद पवार गटाने पक्षाने विधेयकाबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.
केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२६ या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विधेयकाला आवश्यक पाठिंबा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर काय घडणार?
मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या लोकसभा खासदारांना तीन ओळींचा व्हीप ...
इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि उबाठा गटाकडूनही विरोधाची भूमिका अपेक्षित आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ने आपल्या खासदारांना व्हिप जारी करून अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. विधेयकाची प्रत मिळाल्यानंतर त्यातील तरतुदींचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, अशी पक्षाची भूमिका आहे. दरम्यान, आगामी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी इंडिया आघाडीने बैठक बोलावली असून, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. त्यांच्या अनुपस्थितीमागे राजकीय कारण असल्याची चर्चाही सुरू आहे.