Saturday, November 28, 2026

Ahilyanagar : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्रदान-अवयवदानाचा संदेश

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रमच जनजागृती पोस्टरचे उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते अनावरण

अहिल्यानगर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३६ व्या पुण्यतिथीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान आणि अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. महात्मा फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना अभिवादन करत मानवतेची सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या वेळी नेत्रदान व अवयवदान जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले, तसेच जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांचे नेत्रदान व अवयवदान संकल्पपत्र भरून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते नेत्रदान व अवयवदान जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी नागरिकांना नेत्रदान आणि अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. मृत्यूनंतरही आपले अवयव दुसऱ्याच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करू शकतात, हा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या वेळी फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जालिंदर बोरुडे, जिल्हा रुग्णालयाच्या अवयवदान समुपदेशन विभागाचे समुपदेशक सतीश अहिरे, बजरंग भुतारे, विष्णुपंत म्हस्के, गणेश कोल्हे, दीपक पाटोळे, सतीश खेतमाळीस, रवींद्र कांबळे, सुजित ठोफळ, प्रकाश साळवे, योगेश साठे आदी उपस्थित होते.

उपमहापौर जाधव म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित, शोषित आणि गरजू घटकांच्या कल्याणासाठी समर्पित केले. शिक्षण, समता आणि मानवतेचा विचार त्यांनी समाजाला दिला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्रदान व अवयवदानासारखा मानवतावादी उपक्रम राबविणे ही त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे. नेत्रदान आणि अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारी मानवतेची महान सेवा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या अवयवांमुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, तर नेत्रदानामुळे दृष्टी गमावलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश येऊ शकतो. मात्र, आजही समाजात नेत्रदान आणि अवयवदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.

फिनिक्स सोशल फाऊंडेशनने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच समाजहिताचे कार्य केले आहे. फिनिक्सच्या माध्यमातून डॉ. जालिंदर बोरुडे यांनी चालवलेल्या नेत्रदान चळवळीतून हजारो अंधांना नवदृष्टी मिळाली आहे. तसेच अवयवदानसाठी देखील त्यांचे सातत्याने कार्य सुरु आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते. प्रत्येकाने नेत्रदान व अवयवदानाचे महत्त्व समजून घेऊन स्वतः संकल्प करावा आणि आपल्या कुटुंबीयांनाही यासाठी प्रोत्साहित करावे. या मानवतावादी चळवळीत सहभागी झाल्यास अनेक गरजू रुग्णांना जीवनाची नवी संधी मिळू शकेल, असे आवाहन ॲड. जाधव यांनी केले.

फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जालिंदर बोरुडे म्हणाले की, अवयवदान आणि नेत्रदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. एका व्यक्तीच्या मरणोत्तर अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, तर नेत्रदानामुळे अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होतो. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमधून जनजागृती केल्यास हा संदेश मोठ्या प्रमाणावर समाजापर्यंत पोहोचतो. प्रत्येक नागरिकाने अवयवदानाचा संकल्प करून आपल्या कुटुंबीयांनाही त्याबाबत माहिती देण्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयाचे अवयवदान समुपदेशन विभागाचे समुपदेशक सतीश अहिरे म्हणाले की, अवयवदानाबाबत समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. योग्य माहिती आणि जनजागृतीद्वारे हे गैरसमज दूर करणे आवश्‍यक आहे. अवयवदानामुळे अनेक गंभीर रुग्णांना जीवनदान मिळू शकते. प्रत्येकाने अवयवदानाबाबत सकारात्मक विचार करून शासनाच्या अधिकृत प्रक्रियेनुसार नोंदणी करावी. फिनिक्सने जिल्ह्यात नेत्रदान व अवयवदानचे मोठे कार्य उभे केले असल्याचे स्पष्ट करून अशा जनजागृती मोहिमांमुळे समाजात मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >