Saturday, November 28, 2026

तूप बनवल्यानंतर बेरी फेकू नका! फक्त 10 मिनिटांत बनवा चविष्ट मिठाई, साहित्यही अगदी मोजकं

घरी तूप बनवल्यानंतर कढईत उरलेली बेरी फेकून देण्याऐवजी त्यापासून अवघ्या 10 मिनिटांत स्वादिष्ट मिठाई बनवा! दूध, साखर आणि मिल्क पावडर वापरून तयार होणाऱ्या या झटपट वड्यांची रेसिपी जाणून घ्या. बेरीपासून शिरा, लाडू आणि पराठेही बनवता येतात.

घरात तूप बनवल्यानंतर कढईच्या तळाशी उरणारी बेरी अनेक जण फेकून देतात. मात्र, हीच बेरी वापरून तुम्ही झटपट आणि चविष्ट मिठाई तयार करू शकता. तुपाचा खमंग सुगंध आणि दुधाचा स्वाद असलेली ही बेरी योग्य पद्धतीने वापरली, तर घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट गोड पदार्थ बनवता येतो. विशेष म्हणजे, ही मिठाई तयार करण्यासाठी ना फार मेहनत लागते, ना बराच वेळ. अवघ्या 10 मिनिटांत तुम्ही बेरीच्या स्वादिष्ट वड्या तयार करू शकता.

बेरीपासून मिठाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • तुपाची बेरी
  • दूध
  • साखर
  • मिल्क पावडर
  • ताटाला लावण्यासाठी थोडे तूप

बेरीच्या मिठाईची सोपी रेसिपी

सर्वप्रथम तुपाची बेरी एका कढईत घेऊन मंद आचेवर थोडीशी परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये दूध घालून व्यवस्थित मिक्स करा. आता चवीनुसार साखर घालून मिश्रण पुन्हा परतून घ्या. शेवटी मिल्क पावडर घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिश्रण ढवळत राहा.

मिश्रण घट्ट झाल्यानंतर एका ताटाला थोडे तूप लावून त्यामध्ये तयार मिश्रण जाडसर पसरवून घ्या. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. अशा प्रकारे तुपाच्या बेरीपासून झटपट आणि चविष्ट मिठाई तयार होईल. ही रेसिपी @anjalis_chavist_kitchen या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.

बेरीपासून आणखी कोणते पदार्थ बनवता येतात?

तुपाची बेरी केवळ मिठाई बनवण्यासाठीच नव्हे, तर इतर पदार्थांमध्येही वापरता येते.

  • शिरा किंवा लाडू : खमंग भाजलेली बेरी गव्हाच्या शिऱ्यात किंवा बेसनाच्या लाडूमध्ये घातल्यास पदार्थाला छान स्वाद येतो.
  • साखर किंवा गुळासोबत : बेरीमध्ये पिठीसाखर किंवा गूळ आणि वेलची पूड मिसळूनही खाता येते.
  • पराठ्यांचे सारण : बेरीचा वापर पराठ्यांच्या सारणासाठी करून खमंग पराठे बनवता येतात.
  • भातासोबत : गरम भातावर तूप, बेरी आणि चिमूटभर मीठ किंवा तिखट घालूनही खाता येते.

घरात तूप बनवल्यानंतर उरणाऱ्या बेरीचा अशा प्रकारे उपयोग केल्यास ती फेकण्याऐवजी चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी वापरता येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा