Saturday, November 28, 2026

'धारावी बचाव मोर्चा'ला धारावीकरांचा प्रतिसादच नाही; मंत्री आशिष शेलारांनी विरोधकांना सुनावलं!

धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चावर भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी टीका केली आहे. धारावीकर मोर्चात सहभागी झाले नसून, त्यांना पुनर्विकास हवा असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा शेलार यांनी केला. जवळपास एक लाख कुटुंबांनी सर्वेक्षण पूर्ण केल्याचा दाखला देत त्यांनी विरोधकांवर राजकीय स्टंटबाजीचा आरोप केला.

मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मुंबईत राजकीय वातावरण तापले असताना, शनिवारी धारावी बचाव आंदोलनाच्या (DBA) वतीने काढण्यात आलेल्या मोर्चावर भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. या मोर्चात धारावीतील नागरिक सहभागी झाले नसल्याचा दावा करत, धारावीकरांना पुनर्विकास हवा आहे आणि त्यांनी मोर्चापासून दूर राहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली. धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने शनिवारी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला. मात्र, हा मोर्चा म्हणजे केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. धारावीतील नागरिकांनी या मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने पुनर्विकासाला त्यांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला. विकासाच्या मुद्द्यावरून विरोध करणाऱ्या राजकीय गटांना धारावीकरांनी नाकारले असल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे.   मुंबईमध्ये कोणताही विकास प्रकल्प सुरू झाला की काही गटांकडून विरोध केला जातो. मेट्रो प्रकल्प असो, कोस्टल रोड असो किंवा अन्य पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रत्येक वेळी विरोधातून विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेलार यांनी केला. अशा विरोधामुळे मुंबईच्या विकासाला खीळ बसत असल्याचे सांगत, केवळ राजकीय स्वार्थासाठी विरोध करणाऱ्यांना धारावीतील तेने चांगलेच फटकारले असल्याचा दावा त्यांनी केला.

धारावीकर पुनर्विकासाच्या बाजूने?

धारावी पुनर्विकास प्रक्रियेत नागरिक सक्रियपणे सहभागी होत असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. धारावीतील जवळपास एक लाख कुटुंबांनी घरगुती सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यावरून धारावीतील नागरिक पुनर्विकास प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले. पुनर्विकासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न काही स्वार्थी हितसंबंधींकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. धारावीतील नागरिकांना विकास हवा असून, पुनर्विकासाच्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चापासून नागरिक दूर राहिल्याने विरोधकांना त्यांची भूमिका समजली पाहिजे, असे शेलार यांनी म्हटले आहे. शनिवारी काढण्यात आलेला मोर्चा हा धारावीतील नागरिकांच्या प्रश्नांसाठी होता की राजकीय हेतूने आयोजित करण्यात आला होता, यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर आगामी काळात मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >