
महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून आणण्यात येणाऱ्या परिसीमन विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या विधेयकाच्या समर्थनार्थ एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, शिवसेनेचे सर्व खासदार या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईतील नंदनवन निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे खासदार प्रत्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. आगामी विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांनी रविवारीच दिल्लीत दाखल व्हावे, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच बैठकीत मंजूर झालेल्या ठरावाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय कायदामंत्री आणि संसदीय कामकाज मंत्र्यांसह एनडीएच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : देशातील महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने हालचाली सुरू ...
दरम्यान, येत्या ३० नोव्हेंबरला लोकसभेचे, तर २ डिसेंबरला राज्यसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात घटनादुरुस्ती आणि परिसीमनाशी संबंधित विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. या विधेयकांमुळे महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल, असा दावा करण्यात येत आहे. या प्रस्तावित बदलांमुळे लोकसभेतील सदस्यसंख्या ५४३ वरून ८१५ पर्यंत वाढण्याचा प्रस्ताव असून, महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागाही ४८ वरून ७२ होऊ शकतात. त्यामुळे संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मतदारसंघांची पुनर्रचना ही लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असल्याची भूमिका शिंदे यांनी मांडली. सध्या एका खासदाराला मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करावे लागत असल्याने नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होण्यासाठी परिसीमन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती सुरू असून, राष्ट्रहिताला प्राधान्य देणे हीच शिवसेनेची भूमिका असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील २ अशा शिवसेनेच्या सर्व १५ खासदारांकडून या विधेयकांना पाठिंबा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.






