Home शिकू आनंदे उद्योगी व्हा!

उद्योगी व्हा!

1

व्यवसाय, उद्योग हे करिअरचं वेगळं क्षेत्र मानलं जातं आणि व्यवसाय करणं हे सगळ्यांना जमेल असं नाही. यात संभाव्य धोकेही अधिक आहेत, हे समजून मराठी माणूस व्यवसायापासून नेहमी दूर राहत आला आहे. अगदी किर्लोस्कर, बेडेकर, विठ्ठल कामत, गद्रे, नितीन पोतदार यांसारखे यशस्वी मराठी उद्योगपती असूनही मराठी माणसांचं उद्योगाविषयीचं भय गेलेलं नाही. वास्तविक माणसाला आर्थिक व सामाजिक दृष्टय़ा सक्षम करण्याची क्षमता फक्त उद्योगामाध्येच आहे. नोकरीपेक्षा व्यवसाय अधिक मानसिक शांती देतो, स्वत:साठी करण्याचे सुख वेगळे असते. कमी भांडवलं, मनुष्यबळ, जागा आणि धोके यामुळे अनेक जण उद्योगापासून दूर राहतात किंवा जे उत्सुक असतात कशी सुरुवात करायची याची माहिती नसते. त्यामुळे आज आपण घरच्या घरी किंवा कुठल्याही लहान जागेत कमी भांडवलावर सुरू करता येण्यासारख्या व्यसायांची माहिती घेऊ.

डबे पुरवणे
अनेक महिला आणि बचत गट हे व्यवसाय करीत आहेत. डबे पुरवणे हा एक उत्तम जोडव्यवसाय आहे. तुमच्या आजूबाजूच्या ऑफिसमध्ये योग्य प्रकारे मार्केटिंग केलात तर या व्यवसायला अधिक मोठा प्रतिसाद लाभू शकतो. घरच्या घरी व्यवसाय सुरू करत असाल तर वेगळ्या अशा गोष्टींची गरज भासणार नाही पण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या चवीचं, स्वच्छ आणि प्रेझेंटेबल प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे असं जेवण पुरवू शकता. १ वर्षाच्या आसपास तुम्हाला यातून तुम्ही केलेली गुंतवणूकही परत मिळेल आणि दर महिन्याला नफाही चांगला मिळेल. भांडवल १०,००० गरजेचं.

सुरुवातीला एकटीनं किंवा बचत गटातील महिलांना सोबत घेऊन काम सुरू करता येईल. डबे पुरवण्यासाठी एखाद्या मुलाला ठेवता येईल. जास्त डबे असतील तर डबेवाल्यांची मदत येईल.

केटरिंग व्यवसाय
यापुढील स्टेप म्हणजे जेवण पुरवणे. यामध्ये रोजचे जेवण आणि रेस्तारोप्रमाणे जेवण पुरवणे यांचा समावेश होतो. मात्र यासाठी तुमच्याकडे फूड आणि ड्रग्स संचालनालयाचं लायसन्स असणं आवश्यक आहे. या व्यवसायाला खूप मागणी आहे. लोकांकडे पैसा असल्यानं पूर्वीपेक्षा हॉटेलिंगवर अधिक पैसा खर्च होऊ लागला आहे. थकाथकीच्या दिवसानंतर घरी येऊन जेवण बनवणं नकोसं वाटतं. अशा वेळी रोज किंवा काही ठराविक दिवशी तुमच्याकडे जेवणाची ताटे मागवली जाऊ शकतात. त्यातून तुम्ही घरगुती जेवण देत असल्यानं ते अधिक रुचकर आणि पौष्टिक असेल. त्यामुळे तुमच्याकडे येणारी पावले वाढतील. जर तुम्ही मालवणी, पंजाबी, गुजराथी थाली असं काही वेगळं स्पेशालिटी फूड सुरू केलंत तर व्यवसाय आणि उत्पन्न वाढण्यात मदत होईल.

घरगुती सेवा- एकाच छताखाली (होम युटीलिटी सर्विसेस)

घरात इलेक्ट्रिशिअन, प्लंबर, पेंटर आणि कार्पेटर यांची आवश्यकता असतेच. हे काम कोणी स्वत:हून करू शकत नाही. विशेषत: घर बदलून येणाऱ्यांना आणि नवीन घर घेऊन राहायला येणाऱ्यांची ही मोठी समस्या असते. अशा वेळी तुम्ही त्यांना ही सेवा देऊ शकता. अशी कामं करणा-याना तुम्ही हाताशी घेऊन तुमचा छोटासा ग्रुप करू शकता. आपल्या ग्रुपला नावं दिलं, त्याचा लोगो बनवला, सोशल मीडिया किंवा डोअर टू डोअर जाऊन पॅम्पलेट वाटून जाहिरात केली की त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. १० हजाराच्या आसपास भांडवल वापरून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

गिफ्ट वस्तू
सणासुदीचे दिवस, वाढदिवस किंवा लग्न या सगळ्याप्रसंगी आपल्या आप्तजनांना विविध वस्तू भेट म्हणून देण्याची आपल्याकडे परंपरा आहे, असं म्हणण्यापेक्षा तो ट्रेंड जास्त वाढत चालला आहे. अगदी १०० रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत भेटवस्तू देणा-यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अशा भेटवस्तू देणारी लोकं, कंपन्या, दुकानदार यांना गिफ्टवस्तू पुरवण्याचं काम तुम्ही करू शकता. अर्थात यासाठी ब्रँडिगही तितकचं महत्त्वाचं आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे, एक प्रचंड सर्जनशिलता आपण आपल्या क्लाएंटला काय नवीन काय वेगळे देऊ शकतो हे पाहणं. मार्केटचा उत्तम अभ्यास आणि दुसरं म्हणजे मोठय़ा प्रमाणात स्टॉक देण्यासाठी भरवशाचा विक्रेता पाठीशी असणं. कोणत्या प्रसंगानुसार काय गिफ्ट्स देता येतील, अशी गिफ्ट तुमच्याकडे तयार हवी. चॉकलेट्सपासून ते लहान मोठी इलेक्ट्रोनिक उपकरणं आणि पाठीवरच्या बॅगांपासून हातातील नक्षीदार पिशव्या असा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही देऊ शकता. यात २० ते २५ हजारापर्यंत भांडवलाची गरज आहे. गिफ्ट पाठवण्यासाठी एखाद्या मदतनीसाची गरज या व्यवसायात तुम्हाला भासू शकते.

ऑफिस स्टेशनरी
प्रत्येक ऑफिसला स्टेशनरीची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता असते. यात बॅगांपासून, स्टेपलर पिनांपर्यंत आणि नोटपेड पेनपासून ते हाउसकिपिंगच्या सामानापर्यंत खूप मोठय़ा प्रमाणात यादी आहे. महाराष्ट्रात विशेषत: मुंबई ठाण्यात लहान मोठी अनेक ऑफिसेस आहेत. त्यांना लागणा-या स्टेशनरीचं प्रमाण किती असेल याचा अंदाज लावा. कोणत्या गोष्टीत किती नफा मिळेल याचा साधारण अभ्यास केलात तर इथेही उत्पन्न अधिक मिळू शकतं. यात २० ते २५ हजारापर्यंत भांडवलाची गरज आहे.

इंडस्ट्रीला लागणारी उपकरणे
हा थोडासा विशेष प्रावीण्याचा व्यवसाय आहे. प्रत्येक उत्पादकाला मशिनरी, विविध पार्ट्स इथपासून नट्स, स्क्रू ड्रायव्हर्स, हेल्मेट्स, हातमोजे अशा अनेक लहान मोठय़ा गोष्टी लागतात. यासाठी विविध उत्पादकांशी तुमचे चांगले संबंध असणे आवश्यक आहे. ऑफिस स्टेशनरीपेक्षा या व्यवसायाची निकड खूप वेगळी असते. साधारण २० ते २५ हजार किमान भांडवलची आवश्यकता.

टोटल सर्व्हिसेस
अनेकांना लहानसहान घरगुती किंवा व्यवसायाची कामं करण्यासाठी वेळ नसतो. जसं बँकेची कामं, पोस्टाची कामं, बिलं भरणे वगैरे वगैरे. विशेषत: वृद्ध राहत असतील तर त्यांना याची गरज जास्त असतेच. तसेच अनेक लहान सहान ऑफिसेस किंवा उद्योजकांना वरवरची कामं करून देऊ शकेल असा कोणी हवा असतो. या सगळ्या गोष्टी टोटल सर्व्हिसेसमध्ये येतात. १० ते १५ हजारांचं भांडवल आणि मदतीला एक दोन मुलं घेऊन तुम्ही व्यवसायाला सुरुवात करू शकता.

रिअल इस्टेट सल्लागार
सध्या रिअल इस्टेटचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र तरीही त्यांची मागणी कमी होत नाही. भाडेकरूंची संख्या वाढते आहे. तसेच अनेक उद्योजकांना गाळे, ऑफिसेस हवी असतात. तुम्हाला तुमच्या परिसराची व्यवस्थित माहिती असेल आणि बोलण्याचं चातुर्य असेल तर रिअल इस्टेट एजंट हे मोठ क्षेत्र तुमची वाट पहात आहे. यासाठी फिरणं, तुमच्या परिसरात कुठे काय विकायला किंवा भाडय़ानं द्यायला कोणती जागा उपलब्ध आहे याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. सुरुवातीला केवळ तुम्ही बोलघेवडेपणा आणि बिझनेस कार्ड या भांडवलावर हा व्यवसाय सुरू करा. लोकांकडे तुमचा नंबर असेल आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी तुम्ही हजर राहू शकत असाल तर तुम्हाला ऑफिसची काहीच गरज नाही. व्यवसायात तुम्ही स्थिर झाल्यानंतर ऑफिसही सुरू करू शकता.

क्लास
तुम्हाला शिकवायला आवडते का? तर क्लास हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमचा विद्यार्थी गट निवडावा लागेल. म्हणजे दहावीपर्यंत, कॉलेज-आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, त्यापुढे मग आयटी, मास मीडिया, इंजिनिअर वगरे. त्याचप्रमाणे कुकिंग क्लास किंवा हस्तकला, क्रिएटिव्ह मेकिंग क्लास घरच्या घरी सुरू करू शकता. अशा क्लासेसना मिळणारा प्रतिसाद जास्त आहे. तुम्हाला एखादी परकीय भाषा येत असेल तर आणखी उत्तम. जापनीस, चायनीज, जर्मन आणि फ्रेंच या भाषांचे टय़ुशन घेणाऱ्यांना मागणी अधिक आहे. शिवाय यात प्रचंड पैसा आहे. तुमच्या क्लासची उत्तम जाहिरात तुमचे विद्यार्थीच करतात. सध्या तुमच्या राहत्या घरी तुम्ही क्लास सुरू करू शकता किंवा एखाद्या क्लासशी टाय अप करून त्याला ठराविक हिस्सा देण्याच्या बोलीवर सुरू करू शकता. १० ते ५० हजारांपर्यंत भांडवल गरजेचं.

सॉफ्ट स्किल
बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला पुस्तकी ज्ञानापेक्षासुद्धा अधिक काही वेगळे हवे असते. ते म्हणजे तुमच्यातील विविध किंवा विशिष्ट गुणांचा विकास. यात आंतर मानवी संबंध आले किंवा एखादा विशेष गुण आला. वेळेचं व्यवस्थापन, ऑफिस व्यवस्थापन, सेक्रेटरी सव्‍‌र्हिसेस, उद्योगातील आंतर मानवी संबंध व्यवस्थापन, सेलिंग स्किल्स, मार्केटिंग स्किल्स, संवाद (कम्युनिकेशन) अशा अनेकविध गोष्टींचं प्रशिक्षण तुम्ही देऊ शकता. तुम्ही नोकरीमध्ये एका चांगल्या हुद्दय़ावर असाल किंवा मार्केटिंग, मनुष्यबळ अशा विशेष क्षेत्रात असाल तर तुम्ही हे प्रशिक्षण देऊ शकता. पूर्णवेळ किंवा शनिवार-रविवार अशा स्वरुपात हे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. यासाठी स्थिर वेबसाईट, बिझनेस कार्ड स्वत:चं मार्केटिंग या सगळ्या गोष्टींची गरज भासेल. सुरुवातील ४० ते ५० हजारांचा खर्च येईल.

सल्लागार
तुम्हाला विशिष्ट क्षेत्राचं ज्ञान आणि अनुभव असेल तर तुम्ही उद्योगांना खालील क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करू शकता.

व्यवस्थापन सल्लागार
यासाठी तुमचा विशेष क्षेत्रांचा अनुभव असणे गरजेचं आहे. तुम्हाला व्यवस्थापनातील खाचाखोचा आणि बारकावे, मार्केट, ग्राहक यांचे अद्ययावत ज्ञान असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या क्लाएंटच्या गरजा समजून घेऊन त्यांना सल्ला देता आला पाहिजे. तुमच्या शिक्षणाची आणि अनुभवाची जंत्री जेवढी चांगली आहे, तेवढे तुम्ही या क्षेत्रात नावारूपाला लवकर याल. ३ लाखांच्या आसपास याला भांडवल लागेल.

मनुष्यबळ सल्लागार
तुम्हाला जर मनुष्यबळ क्षेत्रातील अनुभव असेल तर हे एक फार विस्तीर्ण क्षेत्र आहे. मनुष्यबळाचं व्यवस्थापन, मनुष्यबळाचा विकास म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणं आणि विविध मनुष्यबळ पुरवणे म्हणजे एचआर सव्‍‌र्हिसेस अशा तीन गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही एका वेळी एकच गोष्ट निवडणं योग्य आहे. यासाठी विविध कंपन्याशी ओळखी वाढवण्यासाठी सेमिनार्स, विविध चेम्बर्समध्ये नोंदणी करणं आवश्यक.

मार्केटिंग सल्लागार
कुठलाही व्यवसाय मार्केटिंगशिवाय चालू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर मार्केटिंग तज्ज्ञ असाल तर नोकरी सोडून या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम सुरू करा. मार्केटिंग सल्लागार एखाद्या उत्पन्नाच्या ब्रँडिंगपासून ते त्याच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे सल्ले देत असतो. यामध्ये जाहिरात कशी कुठे करावी, किती खर्च करावा, ग्राहकाची नस कशी ओळखावी, काय उत्पादन करावे ते कसे कुठे विकावे, लोगो कसा असावा, यांसारख्या गोष्टींचा सल्ला मार्केटिंग सल्लागार देत असतो.

आर्थिक सल्लागार
एलआयसी एजंट किंवा एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीच्या एजंटपेक्षा हे वेगळे क्षेत्र आहे. यात क्लाएटची आर्थिक कमाई, क्षेत्र, खर्च या सर्वाचा गोषवारा घेऊन दर महिना किती गुंतवणूक करावी, गुंतवणुकीचे, विशिष्ट ओकेजनसाठी पैसे साठवणे अशा सर्व गोष्टींचा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतो. तो कुठल्याही विशिष्ट कंपनीशी बांधील नसतो. गुंतवणूक सल्लागार होण्यासाठी फायनांशिअल प्लानिंग बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेचा गुतंवणूक सल्लागाराचा कोर्स करणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला पदवी आणि मान्यता मिळते. तसेच विविध कर्जे मिळवून देणे. आर्थिक व्यवसाय सांभाळणे ही सुद्धा कामे आर्थिक सल्लागार करू शकतो.

पब्लिक रिलेशन/ संवाद सल्लागार
पब्लिक रिलेशन म्हणजे एखाद्या संस्थेची मते, बातम्या आणि संवाद लोकांपर्यंत पोहोचवणं. तुम्ही जर्नलिझम किंवा पब्लिक रिलेशनमध्ये असाल तर तुम्हाला या क्षेत्रात स्वत:च आणखी वेगळ्या संधी निर्माण होऊ शकतील. यासाठी तुमच्याकडे कल्पकता, सृजनशीलता आणि ग्राहकांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे त्याला संवादाच्या, माध्यमाचा सल्ला देता आला पाहिजे. यापेक्षा सुद्धा अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकी काही आपण आता पाहिले. उर्वरित व्यवसायांची माहिती पुढील लेखात पाहू. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व उद्योग सेवा उद्योग असल्यानं तुम्ही आणि तुमचे ज्ञान/ कौशल्य हे त्याला लागणारे सर्वात मोठे भांडवल आहे. त्यामुळे तुमच्यामधील कौशल्याचा उपयोग करा आणि स्वत:च स्वत:चे बॉस व्हा! (पूर्वार्ध)

1 COMMENT

  1. तरुण मिंत्रानो कमी भांडवलात व्यवसाय करायचा असेल तर मला कॉल करा .सागर सर no. 9922536208

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version