Home प्रहार ब्लॉग कोकण रेल्वेने केला कोकणी माणसांचा अपेक्षाभंग

कोकण रेल्वेने केला कोकणी माणसांचा अपेक्षाभंग

1

१८ वर्षापूर्वी सुरू झालेल्या कोकण रेल्वेने कोकणातील रेल्वे प्रवाशांची निराशा केली आहे. कोकणातील प्रवाशांसाठी नवीन गाडय़ा सुरू करण्याऐवजी दक्षिणेकडेच गाडय़ा सोडण्याकडे भर दिला जात आहे. कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न, कोकणीवासीयांसाठी आवश्यक ठरणा-या गाडय़ांचे अत्यल्प प्रमाण आदींमुळे ही सेवा कोकणी माणसाच्या मनात नाराजीची भावना निर्माण करीत आहे.

संग्रहित छायाचित्र

कोकण रेल्वे हे भारतातील मोठे आश्चर्य आहे. डोंगर द-यातून वाट काढत तयार केलेले कोकण रेल्वेचे अभियांत्रिकी आश्चर्य पाहायला जगभरातून लोक येत असतात. भव्य पूल, मोठमोठय़ा बोगद्यातून वेगाने जाणारी कोकण रेल्वे कोकणवासीयांचा अभिमान आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून कोकण रेल्वेची सेवा असमाधानकारक होत चालली आहे. या रेल्वेचा फायदा कोकणवासीयांना कमी आणि अन्य राज्यातील नागरिकांनाच अधिक होताना दिसत आहे. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे.

सध्या रेल्वे मोठमोठे विस्तार प्रकल्प हाती घेत आहे. त्यातही रेल्वेने संरक्षणाच्या दृष्टिकोनातून चीनच्या सीमेपर्यंत मार्ग टाकण्याचे ठरवले आहे. यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या रेल्वेमार्गासाठी जवळपास दोन लाख कोटी रुपये खर्च करणार आहेत. काश्मीरमध्येही सध्या अंशत: रेल्वे सुरू झाली आहे. मात्र, रेल्वेचे जाळे विस्तारत असताना रेल्वे प्रवाशांना मिळणा-या सुविधा किती परिपूर्ण आहेत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण रेल्वे प्रवाशांना तो मोजत असलेल्या भाडय़ाच्या तुलनेत मिळणारी सेवा कमी दर्जाची आहे.

कोकण रेल्वे मार्गावर गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न ज्या प्रशासनाला सोडवता येत नाहीत, त्या प्रशासनाने नवनवीन रेल्वेमार्ग उभारण्याची घोषणा करणे अयोग्य आहे. कोकण रेल्वे महामंडळ १९९० मध्ये स्थापन झाले. अवघ्या सात वर्षात मोठमोठय़ा अडचणींवर मात करून हा मार्ग २० जानेवारी १९९७ पासून सुरू झाला. दिल्लीतून दक्षिणेत जाणा-या गाडय़ांना हा मार्ग वेळेत बचत करणारा ठरला आहे. त्यामुळे बहुतांशी गाडय़ा याच मार्गावरून वळवल्या आहेत. तसेच मुंबईतूनही दक्षिणेत जाणा-या गाडय़ा या मार्गावरून जात आहेत. त्यामुळे देशातील उत्तर व दक्षिण भागातील अंतर झपाटय़ाने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरील प्रवाशांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

गेली १८ वर्षे हा मार्ग अनेक समस्यांच्या गर्तेतून वर आलेला नाही. रेल्वे अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला स्वतंत्र स्थान नाही. त्यामुळे रेल्वेच्या मंत्र्यांकडून नव्या योजना आखताना ज्या योजना सुरूकेल्या, जे मार्ग सुरू झाले त्या मार्गावर योग्य पद्धतीने समाधानकारक सेवा देता येईल का, याकडे प्राधान्याने पाहणे गरजेचे आहे. कोकण रेल्वे संदर्भात बोलायचे झाल्यास हजारो प्रश्नांची यादीच समोर येते.

कोकण रेल्वेचे विलीनीकरण
 
कोकण रेल्वे महामंडळ मध्य रेल्वेत विलीनीकरण करणे गरजेचे होते. मात्र अद्यापही ते विलीनीकरण झालेले नाही. त्यामुळे या महामंडळाला रेल्वेकडून सापत्नपणाची वागणूक मिळते. अनेकवेळा कोकण रेल्वेच्या गाडय़ा मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रतीक्षेत ठेवल्या जातात. परिणामी कोकण रेल्वेच्या प्रवाशांना त्रास होतो.

कोकणी माणसांच्या अपेक्षाभंग करणारा रेल्वे प्रकल्प

कोकण रेल्वे प्रकल्प प्रा. मधू दंडवते, जॉर्ज फर्नाडिस यांच्या पुढाकाराने अस्तित्वात आला. त्यावेळी कोकणी माणसाने रेल्वेचे पाहिलेले स्वप्न पुरते भंग झाल्याची प्रचिती येते. मुंबईत पाहिलेली रेल्वे आपल्या गावातून जाते याचा अभिमान प्रत्येक कोकणी माणसाला होता. मात्र त्या रेल्वेतून आपल्याला प्रवास करता येणार नाही हे गेल्या १८ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर कळले आहे. आज रेल्वेतून स्थानिक प्रवास करू शकत नाही. त्यांच्यासाठी रेल्वेच्या गाडय़ाच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कणकवली, सावंतवाडीसारख्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर आरक्षण मिळू शकत नाही. एवढी दुरावस्था या कोकण रेल्वेची आहे. कारण या मार्गावरून मालगाडय़ाच भरपूर धावतात. प्रवाशांची संख्या कितीही असली तरी प्रवासी गाडय़ा मात्र वाढत नाही. रत्नागिरी ते मडगाव ही पॅसेंजरही सुरू झालेली नाही.

राज्यराणीला फक्त सोळाच डबे

कोकणकन्या एक्स्प्रेसला २३ डबे तर राज्यराणी एक्स्प्रेसला १६ डबे आहेत. राज्यराणीला आणखी सात डबे वाढविणे गरजेचे आहे. त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. या गाडय़ांचे डबे वाढतील ते सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील प्रवाशांसाठी आरक्षित असतील तरच ख-या अर्थाने कोकण रेल्वेचा कोकणी माणसाला फायदा झाला असे म्हणता येईल. संपर्कक्रांती एक्स्प्रेस गोव्यातून मुंबईपर्यंत जाते. ही गाडी गोव्यातील चार स्थानकांवर थांबते त्यानंतर कोकणातील कोणत्याही स्थानकावर तिला थांबा दिला जात नाही. या गाडीमध्ये कोकणी माणसाला प्रवेश नाही, याचा अर्थ असाच होतो.

जादा सुविधा देताना सुरक्षेचे काय?

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देणार असे सांगून सीसीटीव्ही कॅमेरे रेल्वे स्थानकांवर लावले. या सेवेचा प्रवाशांना थेट फायदा होणार नाही. काही प्रमाणात सुरक्षिततेसाठी किंवा चोरींच्या तपासासाठी हे कॅमेरे उपयोगाला येतील. मात्र ते चालू स्थितीत असावेत हा पहिला प्रश्न. या कॅमे-यावरून तपास करायचा झाल्यास कोकण रेल्वेकडे जे पोलीस दल आहे ते सक्षम करणे गरजेचे आहे. आजपर्यंत या रेल्वे पोलिसांकडे तपासाचे अधिकारच दिलेले नाहीत. त्यामुळे हे कॅमेरे म्हणजे चलचित्रे पाहण्यासाठी किंवा रेल्वे स्थानकावर घडणारी नैतिक, अनैतिक कृत्ये पाहण्यासाठी उपयोगाला येतील, असे वाटते.

प्रकल्पग्रस्तांची निराशाच..

रेल्वे प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना मिळालेला मोबदला फारच तुटपुंजा होता. प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाइकांना नोकरी देण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते. ते अजूनही पाळलेले नाही. मात्र कोकण रेल्वेत परप्रांतियांचीच भरती मोठय़ा प्रमाणात होते. कोकणात सामायिक कुटुंबपद्धती असल्याने जमिनीच्या एका सातबारावर दहा कुटुंबीयांची नावे असतात. त्या सातबाराच्या अनुषंगाने एकाला तरी नोकरी मिळाली तर उरलेल्या ९ कुटुंबातील मुलांना रेल्वे सेवेत सामावून घेत नाही. हा त्या प्रकल्पग्रस्तांवर ख-याअर्थाने अन्यायच आहे.

अशा मूलभूत प्रश्नांवर चर्चा होऊन हे प्रश्न सोडविले जाणे गरजेचे आहे. रेल्वेचे दुहेरीकरण होऊ शकते काय, सुरक्षेच्या दृष्टीने तशा पद्धतीचे सर्वेक्षण झाले आहे काय, याबाबत केवळ घोषणाबाजी होत आहे. केवळ कोकण रेल्वेच्या अधिका-यांकडून याबाबतची स्वप्ने दाखवली जात आहेत. जोपर्यंत कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरी मार्ग होत नाही, तोपर्यंत रेल्वे प्रवाशांचे हाल कायमच राहणार आहेत. कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वेमंत्र्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

1 COMMENT

  1. Konkan वासीयांच्या रेल्वे बाबतच्या तक्रारी ,प्रश्न ,त्या वरील उपाय ,शोधता शोधता ” प्रभू ” साहेबांची पांच वर्षे निघून जातील ,आणि नंतर कोंकण वासी ” जयसे थ्ये वैसे च राहतील ” ! जय महाराष्ट्र !!!!!!,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version