Home महाराष्ट्र कोकण कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण होणार जंक्शन

कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण होणार जंक्शन

0

कोकण रेल्वेला पश्चिम महाराष्ट्र जोडणा-या चिपळूण ते कराड रेल्वेमार्गाला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात अखेर हिरवा झेंडा मिळाला आहे.

चिपळूण- कोकण रेल्वेला पश्चिम महाराष्ट्र जोडणा-या चिपळूण ते कराड रेल्वेमार्गाला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात अखेर हिरवा झेंडा मिळाला आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंत्री असल्यापासून वेळोवेळी केलेला पाठपुरावा आणि तत्कालीन रेल्वेमंत्र्यांशी केलेली चर्चा फलद्रूप झाली आहे. राणे यांच्याच  प्रयत्नाने या मार्गाचे सव्‍‌र्हेक्षण झाले होते.

या ११२ कि.मी.च्या मार्गाच्या दुपदरीकरणासाठी तब्बल १२०० कोटींची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात झाल्याने चिपळूणवासीयांना सुखद धक्का बसला आहे.

कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडली जावी यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक वर्षापासून मागणी होत होती.

चिपळूण ते कराड हे रेल्वेमार्गाचे अंतर ११२ कि.मी. असणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणला जोडला जाईल तर पश्चिम महाराष्ट्रासाठी मुंबई अधिक जवळ येईल. त्यामुळे दळणवळणासाठी हा मार्ग सोयीचा असणार आहे. चिपळूण ते कराडदरम्यान सुमारे १० रेल्वे स्टेशन असणार आहेत. यामध्ये चिपळूणनंतर खेर्डी, मुंढे, कुंभार्ली घाट ओलांडल्यानंतर कोयना रोड, येराड, पाटण, नडे, मल्हारपेठ, साकुर्डी, कुडची आणि कराड ही रेल्वे स्टेशन असणार आहेत. या मार्गावर साधारणपणे लहान-मोठे १० बोगदे असणार आहेत.

त्यामध्ये सर्वात मोठा बोगदा म्हणजे कुंभार्ली घाटाखालून काढण्यात येणार आहे. हा बोगदा साधारणपणे ७ कि.मी. लांबीचा असणार आहे.
चिपळूण ते कराड या रेल्वेमार्गाचे अंतर अवघे ११२ कि.मी. असल्याने रेल्वेमार्ग बांधण्यासाठी तुलनेने खर्च कमी येणार आहे. त्यामुळे अन्य पर्यायांपेक्षा हाच मार्ग सोयीचा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कराड-चिपळूण रेल्वेमार्गाच्या दुपदरी कामामुळे चिपळूण-कराड रेल्वेने जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा कोकणातील मध्यवर्ती केंद्र असलेल्या चिपळूण शहरालादेखील लाभ होणार आहे. चिपळूण स्टेशन जंक्शन होणार असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ा थेट चिपळूणमधून पश्चिम महाराष्ट्राकडे वळविता येतील. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेगाडय़ादेखील या मार्गावरून धावू शकतील.

दोन मार्गापैकी एका मार्गावर अडथळा आल्यास गाडय़ा दुस-या मार्गावर वळविणे शक्य होणार आहे. शिवाय वेळ, अंतर आणि पैसादेखील वाचणार आहे. सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून चिपळूण-कराड रेल्वेचे काम होणार आहे. त्यामुळे ते तातडीने होईल, अशा अपेक्षा आहेत.

चिपळूणमध्ये हा मार्ग जोडला जाणार असल्याने चिपळुणात सर्व गाडय़ा थांबतील. शिवाय येथे प्रवासी आणि मालवाहतूक यांना मोठी संधी मिळेल. त्यात मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणसुद्धा मार्गी लागल्याने कोकणातील एक प्रमुख शहर असलेल्या चिपळूणचे महत्त्व अधिक वाढणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version