Home महामुंबई मेट्रो-३ कारडेपो विरोधात पर्यावरणप्रेमी करणार आंदोलन

मेट्रो-३ कारडेपो विरोधात पर्यावरणप्रेमी करणार आंदोलन

1

डू नॉट टच आरे, आरे कॉलनीतील मेट्रो-३चा कार डेपो स्थलांतरित करा, प्रकल्पांच्या विकासासाठी पर्यावरणाचा -हास होऊ देऊ नका.. अशा घोषणा देत आरे कॉलनी येथील रहिवासी, पर्यावरणप्रेमी १ मार्च रोजी निदर्शने आंदोलन करणार आहेत.

मुंबई – डू नॉट टच आरे, आरे कॉलनीतील मेट्रो-३चा कार डेपो स्थलांतरित करा, प्रकल्पांच्या विकासासाठी पर्यावरणाचा -हास होऊ देऊ नका.. अशा घोषणा देत आरे कॉलनी येथील रहिवासी, पर्यावरणप्रेमी १ मार्च रोजी निदर्शने आंदोलन करणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता गोरेगाव स्थानकाजवळ आरेतील रहिवासी, पर्यावरणप्रेमी तसेच सेव्ह आरे कॉलनी संघटनेचे कार्यकर्ते एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे (एमएमआरसी) आरे कॉलनी येथे बांधण्यात येणा-या कारडेपोविरोधात निदर्शने करणार आहेत.

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ मार्गासाठी गोरेगाव आरे कॉलनी येथे कारडेपो बांधण्यात येणार आहे. या कारडेपोच्या मार्गात एकूण २ हजार २९८ झाडे असून यातील २५४ झाडे छाटून २ हजार ४४ झाडांचे पुनरेपण करण्याची एमएमआरसीची योजना आहे. पण या सर्व प्रक्रियेत दिरंगाई होऊन पुनरेपणाच्या प्रक्रियेत झाडांच्या मुळांना इजा होऊन ती मरतात, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. १ मार्च रोजी निदर्शने आंदोलन करून ट्विटरद्वारेही जनजागृती करणार आहेत. सेव्ह आरे या नावाने ट्विटरवर मोहीम चालवली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून नागरिकांनी ट्विट करावे, असे आवाहन सेव्ह आरे कॉलनी संघटनेद्वारे करण्यात आले आहे.

मुंबईत विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्प, टोलेजंग इमारती उभारत असताना झाडांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल होत आहे. मुंबईत केवळ आरे कॉलनी येथे ग्रीन हब उरला असून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून याचा विचार करावा, असा संदेश आरे येथील रहिवाशांद्वारे दिला जात आहे. आरे कॉलनी येथील कारडेपो बांधकामाचे प्रकरण न्यायालयप्रविष्ठ असून पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय आरेतील झाडे तोडणार नाही, असे एमएमआरसीद्वारे न्यायालयात सांगण्यात आले आहे.

कारडेपोबाबत काही दिवसांपूर्वीच वृक्ष प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत कारडेपो इतर ठिकाणी स्थलांतरित करता येईल का, याबाबत वृक्ष प्राधिकरण एमएमआरसीसोबत चर्चा करणार असल्याने आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली आहे.

आरे कॉलनी हा मुंबईतील एकमेव ग्रीन हब आहे. त्यामुळे या ठिकाणी जर प्रकल्प उभारले गेले तर पर्यावरणाचा निश्चित -हास होईल. त्यामुळे येथील कारडेपोला आमचा विरोध असून त्या विरोधात सुरू असलेले आंदोलन आम्ही सुरू ठेवणार आहोत. – मनीष सेठी, प्रवक्ता, सेव्ह आरे कॉलनी

आरेतील झाडांवर कु-हाड
एकूण : २ हजार २९८
झाडे छाटणार : २५४

1 COMMENT

  1. “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” हा निसर्ग मंत्र जपणा-याबद्दल मुंबईकर त्यांचे आभार मनातील. आधीच भरपूर प्रमाणात विकासाच्या नावाखाली पर्यावरणास धोका निर्माण होईल अशा प्रकारे मुंबईचे वातावरण तयार होत होते. त्यातच आरे सारखा हिरवळीचा भाग जर फक्त मेट्रो प्रकल्पामुळे नष्ट झाला तर खरोखरच १२ हि महिने मुंबई सारख्या शहरात पाऊस पडू शकत नाही. खरे तर मुंबईच्या रस्त्या लगत हि वृक्ष लावणी सारखे सामाजिक कार्य केले गेले पाहिजे. सर्व मुंबई भर जर मेट्रो प्रकल्प राबविले तर मुंबईत कोळ्याचे जाळे निर्माण होईल आणि माणसास जगण्यास लागणाऱ्या मुलभुत गरजात शुद्ध हवा व पाणी हि पुरवले जाणार नाही. वृक्ष छाटणी मुळे आमच्या मायाभूमीस उन्हाचे चटके बसत आहे. जरी मेट्रो हा पर्यायी उपाय वातानुकुलीत आणि जलद रित्या पोहचवण्याचे साधन जरी असले तरी ते पर्यावरण आणि संपूर्ण व्यक्तीच्या आरोग्यास हानिकारक आहे. हालचाल करणारे माणसाचे शरीर हे मृत शरीराप्रमाणे कार्यरत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version