Home महाराष्ट्र कोकण गुहागरात काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून दाखवाच

गुहागरात काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून दाखवाच

0

गुहागरात काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून दाखवाच, असे आव्हान देत अनामत कुणाचे जप्त करायचे हे जनता ठरवते, तुम्हाला कोणी अधिकार दिला? या निवडणुकीत प्रसंगी जनता भास्कर जाधवांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका काँग्रेसचे उमेदवार संदीप सावंत यांनी केली.
चिपळूण- गुहागरात काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून दाखवाच, असे आव्हान देत अनामत कुणाचे जप्त करायचे हे जनता ठरवते, तुम्हाला कोणी अधिकार दिला? या निवडणुकीत प्रसंगी जनता भास्कर जाधवांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका काँग्रेसचे उमेदवार संदीप सावंत यांनी केली.

मजरेकौंढर गोंधळे येथे प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गुहागरात २०० कोटींची विकासकामे झाली, अशा गमजा मारत आहेत. स्वत:च्या मुला-मुलींच्या शाही विवाह सोहळ्यासाठी एवढा पैसा आला कोठून? ही संपत्ती कोणत्या मार्गाने जमवलीत? या शाही विवाह सोहळ्यात दहा ते बारा ट्रक अन्न टाकून दिले, एवढा पैसा आला कोठून, असा सवाल करीत सावंत यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली.

सभेत बोलताना सावंत म्हणाले की, या मतदारसंघातील मायभगिनी भास्कर जाधवांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. या मतदारसंघात गेली पाच वर्षे दादागिरीचे प्रकार झाले. आता चालणार नाही, असा इशाराही यावेळी दिला. काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करणार असे ते म्हणत आहेत. मात्र, डिपॉझिट कोणाचे जप्त करायचे हे जनता ठरविते. तुम्हाला कोणी अधिकार दिला, असा सवाल उपस्थित करीत प्रसंगी जनता तुमचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका यावेळी केली.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या मतदारसंघातील अनेक गावांमध्ये विकासकामे केली आहेत. मात्र, भास्कर जाधवांनी स्वत: न केलेली कामेसुद्धा कार्य अहवालात प्रसिद्ध केली आहेत. तसेच अन्य विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अशा स्थितीत ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशी त्यांची वृत्ती असल्याने ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. कुणबी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला, अशा वावडया ते उठवत आहेत. आता जनतेची दिशाभूल दाखवा, असे शेवटी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आव्हान स्वीकारले असून लवकरच याची प्रचिती येईल, असे स्पष्ट केले.

यावेळी मजरेकौंढर-गोंधळे येथील ग्रामस्थांनी काँग्रेसचे उमेदवार संदीप सावंत यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. या प्रचारसभेचे सूत्रसंचालन प्रभाकर जाधव यांनी केले. यावेळी बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version