Home महामुंबई ठाणे वसई-विरारकरच सांगतील,कोण किती पाण्यात!

वसई-विरारकरच सांगतील,कोण किती पाण्यात!

1

वसई-विरार शहराला बारा महिने कायम भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा! त्यामुळे या परिसरातील सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा भर आहे, तो पाणी प्रश्नावर! तोही ज्वलंत पाणी प्रश्नावर.
विरार-  वसई-विरार शहराला बारा महिने कायम भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा! त्यामुळे या परिसरातील सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा भर आहे, तो पाणी प्रश्नावर! तोही ज्वलंत पाणी प्रश्नावर. त्यासाठी एकमेकांवर हवे तसे शिंतोडे उडवले जाताहेत. पाणी म्हणजे जीवन. सत्ताधारी म्हणताहेत आम्ही ते जनतेला दिले. आणि विरोधक म्हणताहेत आम्हाला ते मिळालेच नाही. खरा प्रश्न आहे, तो मतदारांचा. त्यांना काय वाटते, हे त्यांनाच माहीत. प्रश्न सगळयाच उमेदवारांकडे आहेत, मात्र या समस्येचे निराकरण कसे करणार, याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे वसई-विरारकरच सांगू शकतील, कोणता पक्ष किती पाण्यात आहे ते!

तालुक्यातील गावपाडे तसेच शहरी भागातील सामान्य जनता अद्याप पाणीटंचाईशी झुंजत आहे. नेमका हाच मुद्दा वसई-विरार, नालासोपा-यातील उमेदवारांनी आपल्या प्रचारात घेतला आहे. वसईचे विद्यमान आमदार आणि जनआंदोलनचे उमेदवार विवेक पंडित यांनी तर यासाठी हायटेक प्रचार यंत्रणाच राबवली आहे. वसई-विरारकरांना पाण्याच्या टंचाईबाबत सत्ताधारी कसे उल्लू बनवतात, याची माहिती पंडित लघुपटाच्या माध्यमातून देत आहेत. पंडित यांनी पाण्यावरून होणारी आर्थिक गणिते मतदारांना सांगण्याचा यातून प्रयत्न चालवला आहे. ज्यात त्यांनी गेल्या काही वर्षात पाण्यावर गब्बर झालेल्या टँकर लॉबीचा उल्लेख केला आहे. विरार-नालासोपारा, वसई-नायगाव या चारही प्रमुख पूर्व आणि पश्चिम पट्टयात टँकरमाफियांचा असलेला सुळसुळाट हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आहे. यावर सत्ताधारी बविआ मात्र पाण्याचा प्रश्न आपण सोडवला असल्याचे मतदारांना सांगत आहे. यासाठी त्यांनी आणलेल्या योजना, आलेला निधी, होऊ घातलेले पाणी प्रकल्प याची सविस्तर माहिती मतदारांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे. यावर बविआने तर आपला कार्यवृत्तांत असलेला ‘महामेरू’ हा अहवालच मतदारांच्या हाती दिला आहे. दरम्यान, भाजपच्या उमेदवारांनीही शाळा, रुग्णालये इत्यादी मुद्दयांसोबत पाण्याचा मुद्दा प्रचाराचा मुद्दा बनवला आहे.

मनसेचे उमेदवारही यात मागे नाहीत. गटार, रस्ते, झोपडपट्टीचा प्रश्न याबरोबरच त्यांच्याही पटलावर पाण्याचा मुद्दा प्रमुख बनला आहे. तर शिवसेनाही याच मुद्दयावर पुढे चालली आहे.

एकूण काय पाण्याच्या समस्येने वसई-विरारमध्ये किती गंभीर स्वरूप धारण केले आहे, हे सगळेच उमेदवार मतदारांना कानीकपाळी ओरडून सांगताहेत. मात्र आपण निवडून आल्यास या समस्येचे निराकरण कसे करू, याचे उत्तर मात्र या कोणाकडेच नाही. नसलेल्या पाण्याने सगळेच उमेदवार एकमेकांवर शिंतोडे उडवत असताना, मतदार मात्र आपली तहान कोण भागवणार, या विवंचनेत आहेत.

पाण्यासाठी किती आंदोलने झाली?

पाणीप्रश्नावर सध्या विरोधकांचा प्रचार सुरू आहे. मात्र या विरोधकांनी पाण्यासाठी स्वत: किती आंदोलने केली? उलट पाणी येऊ नये, यासाठीच प्रयत्न केले, असे उत्तर बविआचे संघटक अजीव पाटील यांनी, विरोधकांचा पाणीप्रश्नावरील प्रचार, या विचारलेल्या प्रश्नाला दिले.

पाणीप्रश्नावर विरोधकांनी एका व्यासपीठावर यावे, असे आवाहन आम्ही केले आहे. मात्र ते एकत्र येणार नाहीत, हे आम्हाला माहीत आहे. त्यांच्याकडून केवळ लोकांची दिशाभूल केली जात आहे. आम्ही आमचा कार्यवृत्तांत ‘महामेरू’ या नावाने प्रसिद्ध केला आहे. ज्यात सगळे मुद्दे सविस्तर मांडले आहेत, असेही ते म्हणाले. हितेंद्र ठाकूर आमदार झाले तेव्हा शहराला ५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होत होता. म्हणजे ४ ते ६ एमएलडी पाणी. आज ते १४० एमएलडी पाणी शहराला मिळते आहे. एवढे पाणी कसे झाले? म्हणजे किती पट पाणी मिळते? याची आकडेमोड विरोधकांनी करावी. पुढील आठ महिन्यांत हे पाणी दुप्पट होणार आहे. दुर्दैवाने लोकसंख्या वाढते आहे, पण त्या दृष्टीनेही प्रयत्न होताहेत. यासाठी दोन वर्षापूर्वी सुसरी धरणाचा विषय पटलावर आला होता. मात्र विवेक पंडित यांनी, स्थानिक लोकांना पुढे करून हे धरण होऊ दिले नाही. विवेक पंडित यांनी स्वत: पाण्यासाठी किती आंदोलने केली? हे सांगावे, असा प्रतिप्रश्न अजीव पाटील यांनी या वेळी केला.

1 COMMENT

  1. वसई-विरार, नालासोपा-यातील कित्येक ठिकाणी एक दिवस पाणी मिळेल एक दिवस मिळणार नाही, याचा अर्थ पाणी ज्या तलावातून पुरवले जाते त्या तलावातील पाण्याची पातळी वर्षातील ३६५ दिवसांपैकी १८३ दिवस पुरेल एवढीच असावी. एकीकडे वृत्तपत्र, मिडियातून मंत्र्यांकडून महाराष्ट्रातील जनतेस आश्वासन दिले जाते कि वर्षभर पुरेल इतके पाणी महाराष्ट्राच्या तलावात आहे आणि दुसरीकडे पाण्याची टंचाई दाखवली जाते, एकतर महाराष्ट्रातील जनता वेडी असावी किंवा पाण्याची पातळी मोजणार्यास तलावाची खोली किंवा पाण्याची पातळी कळत नसावी. सर्व सुविधा जर तातडीने जनतेस पुरवल्या तर राजकारण घडणार तरी कसे आणि आयते बसून खाणा-यास सर्व मिळणार तरी कसे? असा प्रश्न उद्भवला. इंग्रज सरकारला पळवताना जर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अशा थोर नेत्यांनी विचार केला असता कि आम्ही इंग्रज सरकारशी हात मिळवणी करून ऐश आरामात राहू शकतो, मग माझा देश स्वतंत्र करून आपल्यास मिळणार तरी काय? त्यामुळे पुन्हा चले जाव ची चळवळ होई पर्यंत कोणत्याही हालचाली करायच्या नाही, हि येथील पालिका अधिकारी वर्गाची मोहीम असावी, अशा वेळेस सामान्य जनतेने विचार करावा कि यात सामान्य जनतेने चले जाव हि घोषणा कोणास करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version