Home मध्यंतर भन्नाट जय मल्हारच्या गजरात केली सहल

जय मल्हारच्या गजरात केली सहल

1

गेल्या वर्षी २५ ते २८ डिसेंबर या चार दिवसांच्या काळात आम्ही कौटुंबिक सहलीसाठी ७२ तासांचा प्रवास केला. नालासोपा-याहून १३ कुटुंबं मिळून आम्ही पन्नास जण, सोबत दोन आचारी घेऊन निघालो.

गेल्या वर्षी २५ ते २८ डिसेंबर या चार दिवसांच्या काळात आम्ही कौटुंबिक सहलीसाठी ७२ तासांचा प्रवास केला. नालासोपा-याहून १३ कुटुंबं मिळून आम्ही पन्नास जण, सोबत दोन आचारी घेऊन निघालो. २५ तारखेला सकाळी सात वाजता जेजुरीला पोहोचलो. ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आमच्यातील महिला मंडळाने महाराष्ट्राच्या परंपरेस साजेसा नऊवारी साडय़ांचा वेष परिधान केला होता. सकाळी दहा वाजता जेजुरी गडावर पोहोचलो. ‘‘यळकोट यळकोट जय मल्हार’’च्या गजरात आमच्या ग्रुपने पूर्ण जेजुरीगड दणाणून सोडला. श्रीम्हाळसाकांत मरतड मल्हारीच्या दर्शनाने धन्य धन्य होऊन जेजुरीगड उतरू लागलो.

दुपारी जेवणं उरकून जेजुरीतील प्रशांत भक्त निवासचा निरोप घेऊन आम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघालो. वेळेअभावी ‘श्री नरसोबाची वाडी’ची भेट रद्द करून अंबादेवीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला रात्री नऊ वाजता स्थिरावलो. भल्या पहाटे लेकुरवाळ्यांसहित स्नानविधी उरकून श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. नंतर सकाळी १० वाजता चहा,नाश्ता उरकून दुपारी जोतिबाच्या दर्शनास निघालो.

जोतिबाच्या दर्शनानंतर संध्याकाळी पन्हाळगड गाठला. पन्हाळगड सध्या जीर्णावस्थेकडे झुकताना दिसतोय. महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक ठेवा आपल्या शाळेतल्या मुलांसहित पाहणं आणि त्यांना याचं महत्त्व समजावून सांगणं हे खूपच गमतीशीर असतं. इथे कोकण दरवाजा, सज्जा कोटी, धर्म कोठी, तीन दरवाजा, वाघ दरवाजा, कलावंतांचा महाल, अंधार बावडी, शिवा काशी आणि बाजीप्रभूंचा पुतळा हे पाहण्याजोगं आहे. हे सर्व पाहून पुन्हा कोल्हापूरला विश्रांती घेतली.

मग उजाडला सहलीचा तिसरा दिवस आणि आम्ही कोल्हापूरहून महाबळेश्वरकडे प्रस्थान केलं. दुपारी पाचगणीच्या जवळ माळरानावर वनभोजनाचा आस्वाद घेतला. संध्याकाळी सात वाजता महाबळेश्वरच्या गोविंद निवासवर पोहोचलो. तिथल्या थंड हवेत रात्रीच्या धम्मालीसाठी सज्ज झालो. आमच्या ग्रुपमधील दोन मुलांचे वाढदिवस इथेच साजरे केले.

आमचा मोठा ग्रुप पाहून हॉटेलचे मालक शेलार यांनी आम्हाला भजन करण्याची विनंती केली. आम्ही सुद्धा त्यांच्या विनंतीस मान देऊन, तल्लीन होऊन भजन सादर केलं. रात्री जेवणानंतर पुन्हा करमणुकीचा कार्यक्रम रंगला. त्यात अंताक्षरी आणि खूप धम्माल-मस्ती सर्वानी केली.

रविवारी, चौथ्या दिवशी नयनरम्य महाबळेश्वरमध्ये फिरायला सुरुवात केली. ऑर्थर पॉईंट, एलिफंट पॉईंट, केट्स पॉईंट, बलाकवाडी धरण, मंकी पॉईंट, विल्सन पॉईंट, स्ट्रॉबेरी शेती अशी सर्व भटकंती केली. बोटिंगसाठी ‘वेण्णा लेक’ इथे प्रसिद्ध आहे; पण वेळेअभावी आम्ही नौकाविहार करण्याचं टाळलं. ऑर्थर पॉईंटवरून दुरूनच दिसणाऱ्या प्रतापगडावरती नजर लावून ‘‘जय भवानी .. जय शिवाजी’’च्या गजरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.

दुपारनंतर जावळीच्या खोऱ्यातून घाट उतरून पोलादपूरला वनभोजनाचा पुन्हा आनंद घेऊन ठाणे घोडबंदर मार्गे नालासोपाऱ्याला मार्गस्थ झालो. बसमधील प्रत्येकाने या कौटुंबिक सहलीचा आनंद लुटलाच, शिवाय प्रत्येक गृहिणीने अशीच टूर सालाबादप्रमाणे पुढच्या वर्षीही आयोजित करावी, असं मनोगत व्यक्त केलं. कामाच्या धावपळीतून आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र-परिवारासोबत अशी ‘आनंद यात्रा’ पुन्हा आयोजित करू,असा विश्वास प्रत्येकाने दिला आणि ‘ऑल टाईम हॅप्पी ग्रुप’ हे आमच्या ग्रुपचं नाव आम्ही सार्थ ठरवलं.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version