Home मध्यंतर भन्नाट शिवशाहीचा एक्का तळेगड

शिवशाहीचा एक्का तळेगड

0

तळे-घोसाळेगड ही जोडगोळी इतिहासाबरोबरच भूगोलाने नटलेली आहे, कारण येथे मंदगोरबंदर (मांदाड) आहे. येथून निघालेला आणि कुडा-भाजे-बोरघाट मार्गे पैठणपर्यंत गेलेला सातवाहनकालीन रस्ता होता. बालेकिल्ल्याच्या दगडी तटबंदीत खोबण असल्यामुळे हा गड कुडालेणी वेळचा आहे हे सिद्ध होते. काही इतिहासकारांनी तळेगडाची फक्त टेहळणी बुरुज अशी हेटाळणी केल्यामुळे पर्यटकांच्या यादीत तळेगड नाही. तळे परिसराचा २००० वर्षाचा इतिहास संकलित करताना तळेगड हा कोकणचा मुकुटमणी आहे हे लक्षात आले आहे.

निजाम मलिक अहमदने १५८५मध्ये तळेगड पुनर्वापरात आणला ( रिओपन केला असा कुलाबा गॅझेटिअरमधील उल्लेख आहे) हा उल्लेख असं दर्शवतो की, हा गड शिवपूर्व काळापासूनचा आहे. भु-या डोंगरावर तटबंदी निर्माण करून या डोंगराची निर्मिती केली आहे. सातवाहन काळात मंदगोर व वाशी या प्रमुख बंदरामुळे कुडा लेणी तयार झाली. बंदरात आलेला आयात माल, इंदापूरजवळील अमरोलीवरून, उंबरठा ओलांडून पैठणकडे जात असे. त्या घाटमार्गावर ठाणाळे, खडसांबळे, लोणावळे संकुलातील लेणी तयार झाली आहेत. येथील मंदगोर बंदराला ऊर्जितावस्था आल्यावर अमिर राजाच्या काळात उत्तर कोकणची राजधानी सोपाऱ्याहून मध्यवर्ती असलेल्या पुरी येथे आणली. त्यावेळी तटबंदी असलेला तळेगड बांधून येथे राजधानी स्थापली.

खाडीत शिरलेल्या सहय़ाद्रीच्या भूशिरावर ही राजधानी वसवल्यामुळे तिला मांदाड, रहाटाड व मालाठे खाडीचे तीनही बाजूंनी नैसर्गिक संरक्षण मिळाले. शत्रूपक्षाला खाडी ओलांडल्याशिवाय कसब्यामध्ये येता येत नव्हते. हा कसबा गडावरच असून समुद्रसपाटीपासून ५०० फूट उंच आहे आणि तटबंदी येथून ४०० फूट उंच आहे. माथ्यावरील कातळाचा उपयोग तटबंदी उभारण्यासाठी केल्यामुळे दक्षिण व उत्तरेच्या तटबंदीला ४०० फूट उंचीची नैसर्गिक अभेद्यता आहे.

गडाच्या पूर्व उतारावर कसब, शेजारी रहाटाड, खांबोली, मालाठे, गिरणे, धनगरवाडी, वैतागवाडी, अंबेळी आणि तारणे या वाडय़ा येतात. मंदानदी व बामणघर नदी यांच्या संगमाजवळ बामणघर हे गाव आहे, तो ब्राह्मणघरचा अपभ्रंश आहे. मंदा नदीमुळे सुपीक जमीन व पाण्याची उपलब्धता होती. सातवाहन काळात बाण हेच मोठे शस्त्र असल्यामुळे तटबंदीत बाण मारण्यासाठी शेकडो जंग्या आहेत. आपत्काली शत्रूपक्षाच्या वाटेवर तेल ओतण्यासाठी तटबंदीत तेलासाठी खोबण खोदली आहे. हे सातवाहन काळातील गडाचे वैशिष्टय़ होते. खजिना ठेवण्यासाठी लक्ष्मीची कोठी आहे. सैन्याबरोबर असणाऱ्या बैल, घोडे व इतर प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जो तलाव गडाच्या पायथ्याशी बांधत त्याला सातवाहन काळात ‘पुसाटी’ म्हणत. या नावाचा तलाव येथे अजूनही आहे. या सर्व वैशिष्टय़ामुळे व बालेकिल्ल्याच्या बांधणीने असे लक्षात येते की, हा गड सातवाहनकालीन आहे. तळेगडाच्या पार्श्वभूमीला वसलेल्या गावांचे प्राचीनत्व येथे असलेल्या तीन वेशींवरून लक्षात येते. प्रत्येक ठिकाणी ५ ते ६ फुटी वेशीवरील मारुती आहे. तळेगडावरून घोसाळेगड, कुडालेणी येथून जंजिरा मुरूडपर्यंत किंवा आगीमार्फत संदेश देता येत असे. ते संदेश साईच्या डोंगरावरून रायगडापर्यंत पोहोचत असत. म्हणून त्यांना काहींनी टेहळणी बुरुज म्हटले आहे. हा शिवरायांच्या किल्ल्यांमधील एक महत्त्वाचा गड.

शिवाजी राजे आणि तळेगड

शत्रूसैन्याने कब्जा केलाच तर जाताना त्यांची धुळधाण व्हावी म्हणून खोबणीतील तेल वाटेवर टाकत असल्यामुळे परत जाणारे सैन्य घसरून पडून ताब्यात येत असे. येथील तटबंदी बांधणीत पाणी अडवा व पाणी जिरवा हे नियोजन आढळते. तटबंदी डोंगराच्या कडेने बांधताना डोंगर व तटबंदी यामध्ये खंदक आहेत. तेथे पावसाळ्यात पाणी जिरते आणि तेथून ४ खणी कातळाच्या हौदात येऊन थांबते. त्याला अंगभूत दगडी खांब आहेत. सूर्यप्रकाश आत जात नसल्यामुळे ते पाणी बारा महिने अत्यावश्यक असलेल्या शिबंदीला पुरत असे. इ.स. १६४८मध्ये शिवरायांनी तोरणा घेतल्यावर तळे-घोसाळे गडाच्या गडक-यांना आमंत्रण देऊन बोलावले, हे सभासद व चिटणीस बखरींतील पुढील नोंदीवरून लक्षात येते.

सिद्दीच्या कब्जातील तळे-घोसाळे गडावर आदिलशहाने सोडवळकर व कोडवळकर या मराठे किल्लेदारांची नेमणूक केली होती. त्यांनी महाराजांस असे सांगून पाठवले की, ‘आम्हास हबशांच्या ताबेदारीचा वीट आला आहे. तो आम्हांस अनेक प्रकारे छळतो. आपली स्वारी कोकणात यावी म्हणजे आम्ही तळा व घोसाळा हे किल्ले आपणांस घेऊन देतो. हे किल्ले हाती आल्याने आपणांस पुष्कळ प्रांत साधण्यासारखा आहे व यवनांची ताबेदारी जाऊन आम्ही आपल्या पदरी पडू.’ ही तशी अनुकूलता पाहून महाराज तळेगडावर आले व ते किल्ले स्वाधीन करून घेतले. या किल्ल्यांनजीक सुरगड आहे, तोही हस्तगत केला व आसपासच्या प्रांतात आपला अंमल बसविला.(चिटणीस बखरीतील शब्द : सोंढवळकर व कोंढवळकर हफसियांचे चाकर मर्द जमातदार होते. त्यांचे राजकारण महाराजांकडे आले. आपली स्वारी कोकणांत यावी म्हणजे तळा-घोसाळा घेऊन देतो व जंजिरीयांचेही राजकारण करतो.) शिवरायांचे हे कोकणातील पहिल्या गडावरील पाऊल आहे. चंडिका भवानी ही त्यांची कुलदेवता असल्यामुळे तिचे दर्शन या परिसरात असताना मिळाल्याने हा गड त्यांना भावला. चंद्रराव मोरे यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या उद्दिष्टाला नकार दिल्यावर त्यांना त्यांची जागा तळेगडाच्या परिसरात राहूनच दाखविली.

शिवराय अफजल खानाचा समाचार घेण्यासाठी गेले आहेत असे कळल्यावर सिद्दीने तळेगडाला घेराव घातला होता. दोन दिवसातच शिवरायांची फत्ते झाल्याचे कळल्यावर सिद्दी गडावर अडकला होता. बाहेर पडताना मुसलमानी बुरखा घालून पलायन केल्याची कथा या परिसरात पसरली होती. गडावरील भवानी देवीच्या मंदिरामुळे येथे शाकारणीसाठी, एकादशीसाठी, तेलासाठी, गुरवासाठी वतने चालू केली होती ती अजूनही चालू आहेत.

शिवरायांचा या जोडगोळी ( तळेगड-घोसाळेगड) दुर्गावर एवढा जीव होता की, मिर्झाराजे जयसिंगबरोबर झालेल्या तहात ते दोन्ही गड मागून घेतले. त्यांना विश्वास होता की, हाच कोकण आपल्याला आधार देईल.
दुसरा बाजीराव येथे साडेसहा महिने राहिल्याचा संदर्भ आहे. त्या काळात १३ तोफा येथे आणल्या होत्या. त्यातील ५ तोफा गावांत आहेत व ८ तोफा निरनिराळ्या पोलीस स्टेशनची प्रवेशद्वारे सुशोभित करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version