Home महामुंबई ठाणे डेंग्यूच्या साथीला जबाबदार कोण?

डेंग्यूच्या साथीला जबाबदार कोण?

0

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा संपल्यावर हिवाळा सुरू होत असतानाच पसरणारी डेंग्यूची साथ यंदाही पसरली. उल्हासनगरात पालिकेच्या यादीनुसार ४५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. 

उल्हासनगर – दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा संपल्यावर हिवाळा सुरू होत असतानाच पसरणारी डेंग्यूची साथ यंदाही पसरली. उल्हासनगरात पालिकेच्या यादीनुसार ४५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. वनिता दाभार्डे या वृद्ध महिलेचा मृत्यूही झाला. उपचारासाठी रुग्णांचे लाखो रुपये खर्च झाले. या सर्वाला जबाबदार कोण? असा प्रश्न उल्हासनगरवासीयांनी केला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या झोपडपट्टीसदृश परिसरात यंदा डेंग्यूने उच्छाद मांडला. सहा महिन्यांच्या मुलापासून वयोवृद्धंना डेंग्यूची लागण झाली. लागण होत असतानाच पहिला रुग्ण आढळल्यावरच पालिकेने डेंग्यू प्रतिबंधक योजना हाती घेतल्या नाहीत. याचा फटका नागरिकांना बसला. दिवसागणिक रुग्णांची यादी वाढत गेली. नागरिकांत डेंग्यूमुळे घबराट पसरली.

आठवडाभरापूर्वी सुभाष टेकडी परिसरातील वयोवृद्ध महिला वनिता दाभार्डे हिचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. घराघरात घुसून डेंग्यूच्या डासांच्या अळय़ा असलेले ड्रम शोधणे, ते ओतून टाकणे, धूर फवारणी करणे आदी उपक्रमांनी वेग घेतला. रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांनी रक्त तपासणी सुरू झाली.
विशेष बाब म्हणजे डेंग्यूचा डास हा शुद्ध पाण्यात वाढतो. घरात ड्रम, बादली, पाण्याच्या टाक्या यांत याच्या अळय़ा वाढतात. पाणी सात दिवसांच्या आत बदलले न गेल्यास त्यात डासांनी घातलेल्या अंडय़ाचे फलोत्पादन होऊन डास जन्म घेतो. यामुळे नागरिकांनी साठवलेले पाणी बदलणे गरजेचे असते, मात्र उल्हासनगरसारख्या कमी दाबाने पाणीपुरवठा होणा-या शहरात पाणी घराबाहेर ड्रमात साठवण्याची प्रथा जुनी आहे.

मात्र त्यावरही पालिकेकडे एक उपाय आहे. टेमीफॉस नावाचे ड्रॉप्स पाण्याच्या ड्रमात टाकल्यास अळय़ा मारल्या जातात, मात्र टेमीफॉस टाकल्यानंतर पाणी वापरण्याजोगे राहत नसल्याने गृहिणी हे ड्रॉप्स पाण्यात टाकण्यास देत नाहीत. हा डास दिवसाढवळय़ा चावा घेत असल्याने रुग्णाला डेंग्यूची लागण नक्की कोठे झाली? हे समजण्यापलीकडचे असते.

डेंग्यूचा उपचार खर्चिक
डेंग्यू या ताप प्रकारात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच सफेद पेशी कमी होत जातात़ त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागते, त्याची डेंग्यू टेस्ट करावी लागते, जी महागडी आह़े तसेच महागडा औषधोपचार सुरू असतानाच, घटणा-या सफेद पेशींचे प्रमाण जाणून घेण्यासाठी दररोज रक्तातील सफेद पेशी मोजाव्या लागतात़ वेळ पडल्यास रक्तपेढय़ांतून आणलेल्या सफेद पेशी रुग्णांना चढवल्या जातात. या सफेद पेशींची एक पिशवी दोन हजारांच्या घरात आहे. या सर्वासाठी १५ दिवसांच्या उपचाराचा खर्च हा २५ ते ५० हजारांच्या घरात जातो़ एवढा खर्च करूनही रुग्ण वाचेलच हे सांगता येत नाही़

आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा
डेंग्यूच्या रुग्णांवर ही परिस्थिती सर्वतोपरी येते, निर्लज व निष्काळजी असलेल्या पालिकेच्या आरोग्य विभागामुऴे हा आरोग्य विभाग सफाईवर लक्ष देत नाही, डास जन्मल्यानंतर ८व्या दिवशी डासाला जन्म देतो, या कालावधीत त्याचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक असते, त्यासाठी सात दिवसांच्या फरकाने डास नाशकांची फवारणी करणे आवश्यक असते. मात्र प्रत्यक्षात उल्हासनगरात ही फवारणी ३० दिवसांत एकदा केली जाते. जास्तीत जास्त डासनाशके उरवून काळाबाजारात विकण्याचे अर्थकारण यामागे असल्याचे समजत़े पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून धूर फवारणी यंत्र आणली आहेत. पण त्यांचा योग्य वापर होत नाही़ साचलेल्या डबक्यात मलेरिया ऑइल फवारताना कर्मचारी महिन्यातून एकदा दिसतात़ डासांची पैदास कोंदट व अस्वच्छ गल्ल्यांत होते. मात्र धूर फवारणीही रस्त्यांवर करून धूर फवारणीचा दिखावा केला जातो़ धूर फवारणी रस्त्यांवर केल्यानंतर डास घरांत घुसतात आणि घरातील लहान मुलांना लक्ष करतात़

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version