Home महाराष्ट्र कोकण राहिला ना भरोसा कालव्याचा; आसवांवरती पिकाची भिस्त

राहिला ना भरोसा कालव्याचा; आसवांवरती पिकाची भिस्त

1

हुंदका माझा असा बंदिस्त आहे; आसवांना लावलेली ही शिस्त आहे, राहिला ना भरोसा पावसाचा; आसवांना पिकाची भिस्त आहे.
शेतक-यांची व्यथा कवीने अशा प्रकारे मांडली आहे.
दोडामार्ग-  हुंदका माझा असा बंदिस्त आहे; आसवांना लावलेली ही शिस्त आहे, राहिला ना भरोसा पावसाचा; आसवांना पिकाची भिस्त आहे.

शेतक-यांची व्यथा कवीने अशा प्रकारे मांडली आहे. याचे वास्तव चित्रण दोडामार्ग तालुक्यात सध्या पाहावयास मिळत आहे. पावसाचा संदर्भ कालवा विभाग असा घेतला तर कालवा विभागाचे पाणी कधी सुरू होणार याचा काही भरोसा नाही. शेतकरी अक्षरश: आसवं गाळताहेत. त्यांच्या केळी बागायती सुकायला आल्या आहेत. केळींचे घड वाकले आहेत. ज्या कालव्याच्या पाण्यावर या बागायती उभ्या झाल्या तो विभाग मात्र दुरुस्तीच्या नावाखाली महिना महिना पाणी बंद ठेवत आहे. मात्र, एवढे असताना स्थानिक आमदारांना मात्र याचा पत्ताही नाही. यामध्ये शेतक-याचे मात्र अतोनात नुकसान होत आहे.

दोडामार्ग तालुक्यात तिलारी या ठिकाणी महाराष्ट्र व गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने धरण बांधण्याचे ठरवण्यात आले. सुमारे ३५ वर्षापूर्वी या हालचाली सुरू झाल्या. यासाठी पाल, पाटये, सरगवे, आयनाडे, केंद्रे या गावांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित करण्यात आले. आपल्या तालुक्यातील जनतेला मुबलक पाणी मिळून येथील भूमी सुजलाम् सुफलाम् होईल म्हणून पाचही गावांतील लोकांनी आपल्या पिढीजात संपत्तीचा त्याग केला आणि या ठिकाणी मोठे धरण साकारले. सिंचनक्षेत्रात वाढ व्हावी, या उद्देशाने बांधलेले धरण म्हणावे तसे फलदायी ठरले नाही. या धरणाच्या उजव्या कालव्यातून दोडामार्गातील बहुतांश शेतक-यांना पाणी मिळते. कालव्यापासून पाचशे-पाचशे मीटर अंतरावर शेतक-यांनी स्वत: खर्च करून पाणी नेले आणि बागा उभ्या केल्या आहेत. सासोली परिसरातील शेकडो शेतक-यांनी केळीच्या बागा फुलवल्या आहेत. मात्र या शेतक-यांना थेट पाणी देण्यात कालवा विभाग पूर्णत: अयशस्वी ठरला आहे. परंतु शेतक-याने स्वकष्टाने आपल्या बागायतीत पाणी नेले. मोठया कष्टाने बागायती उभ्या केल्या. यातून ते वर्षभराची रोजीरोटी भागवतात. असे असताना कालवा विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका गतवर्षी शेतक-यांना बसला होता. या वर्षीही ती झळ सहन करावी लागत आहे.

या प्रकरणी सासोली वाघमळा येथील हेमंत गवस यांच्या केळी बागायतीची पाहणी केली असता भयानक चित्र समोर आले. त्यांनी गोवा मंडळ जातीची केळी लावली आहेत. साधारण दोन महिने राबल्यानंतर आता ही केळी पाण्याविना सुकत चालली आहेत. दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली जर पाणी बंद करण्यात येत असेल तर शेतक-यांचे नुकसानच आहे. त्यामुळे शेतक-यांनी संबंधित विभागाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. अन्यथा शेतक-यांची लाख मोलाची मेहनत वाया जाणार आहे हे निश्चित.

आम्हाला वाली कोण?

कालवा विभागाने बंद केलेल्या पाण्यामुळे शेतक-यांची पिके उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. असे असताना कालवा विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा जाब विचारताना कुणीही दिसत नाही. आता आम्हाला वाली कोण, असा सवाल शेतक-यांकडून विचारला जात आहे.

मी केळींची बाग फुलवली आहे. यामध्ये मोठया प्रमाणात खर्च झाला. आता कुठे पीक मिळणार होते. पण ऐन मोसमात पाणी बंद केल्याने नुकसान होत आहे. शिवाय या भागातील शेतक-यांचीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे शेतक-यांना आठ दिवसांत कालवा विभाग पाणी देऊ शकत नसेल तर त्यांचे मोठे नुकसान होणार असून आम्हाला  नुकसान भरपाई द्यावी.     – संतोष शेटवे,     प्रगतशील शेतकरी, सासोली

1 COMMENT

  1. खूपच वाईट परीस्ठीठी आहे शात्कार्यांची पाण्यामुळे. नवीन सरकार तरी या श्त्काराना दिलासा देईल. पाणीवेळेवर शात्कार्याना मिळेल.

    सुधाकर तायडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version