Home संपादकीय अग्रलेख ‘नमो’चा भोपळा फुटेल

‘नमो’चा भोपळा फुटेल

1

गुजरातमधील दंगलींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका वादग्रस्त ठरली. या दंगल वाढण्याला अप्रत्यक्षपणे मोदी, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री तसेच प्रशासकीय अधिकारी जबाबदार होते, असे म्हटले जाते. या दंगलीतील अल्पसंख्याकांच्या हत्याकांडामुळे मोदींची देश आणि देशाबाहेरही मोठी बदनामी झाली.

गुजरातमधील दंगलींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका वादग्रस्त ठरली. या दंगल वाढण्याला अप्रत्यक्षपणे मोदी, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री तसेच प्रशासकीय अधिकारी जबाबदार होते, असे म्हटले जाते. या दंगलीतील अल्पसंख्याकांच्या हत्याकांडामुळे मोदींची देश आणि देशाबाहेरही मोठी बदनामी झाली. गोध्रामध्ये रेल्वे जळीतकांडात झालेल्या यात्रेकरूंच्या मृत्यूमुळे गुजरातेत जातीय दंगल झाली.

या दंगलीत अल्पसंख्याकांवर भीषण हल्ले झाले. मोदींवर ही दंगल घडवून आणल्याचा व दंगलखोरांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. हा आरोप त्यांना अद्याप खोडून काढता आलेला नाही. अशा वेळी मोदी यांनी आपली प्रतिमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्याचा, भाजपमधील आपले स्थान अधिक उंचावण्याचा व गुजरातमध्ये केलेल्या तथाकथित विकासाचे डांगोरे पिटण्याचा सातत्याने प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ व पाठिंबा मिळाला. यामुळे मोदी यांना भाजपमध्ये महत्त्व मिळत गेले.

याच वेळी भाजपमधील मोदी समर्थकांनी मोदींची भाजपचे पंतपधानपदाचे उमेदवार म्हणून प्रतिमा तयार करण्यास सुरुवात केली. भाजपच्या या चालीला संयुक्त जनता दलाने तीव्र विरोध केल्यानंतर भाजपने ही मोहीम आवरती घेतली. पण त्यानंतरही भाजपने मोदी यांना पक्षाच्या आगामी लोकसभा निवडणूक प्रचार मोहिमेच्या प्रमुखपदी नेमले. या नियुक्तीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून संयुक्त जनता दल बाहेर पडला. येवढे सर्व होऊनही मोदी आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या धोरणात आणि मनोवृत्तीत काहीही बदल नाही. मोदींच्या अल्पसंख्याकविरोधी व धर्मनिरपेक्षवादी धोरणाला तिलांजली देण्याच्या भूमिकेमुळे ‘रालोआ’मधील संयुक्त जनता दलाने भाजपची साथ सोडलीच. पण अनेक नेत्यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी हे विभाजनवादी, फुटपाडे असल्याची खरमरीत टीका केली आहे. मोदी यांच्या या विभाजनवादी भूमिकेमुळेच त्यांना पक्षातून विरोध होत असून लालकृष्ण अडवाणी यांनीही मोदी यांना जाहीर विरोध केला आहे. मोदी हे धर्मनिरपेक्ष व सर्वाना सामावून घेणारे नसल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले. चिदंबरम यांनी असेही म्हटले की, मोदी हे गुजरातमध्ये विकास केल्याचा दावा करतात. पण त्यांचा हा दावा फसवा असून गुजरातमधील सामान्य माणूस आणि बहुसंख्य समाज या विकासापासून वंचित आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वास्तवच सर्वसामान्यांसमोर मांडले आहे. कारण मोदी गुजरातमधील विकासाचा जो दावा करतात तो विकास म्हणजे काही बडय़ा उद्योगपतींच्या उद्योगधंद्यांचा विकास होय.

मोदी यांनी राज्यात उद्योगपतींना सवलतीच्या दरात जमिनी आणि अनेक सोयी-सवलती देऊन बोलावले व त्यांचे उद्योग चालू झाले. काही अधिका-यांना व कर्मचारी-कामगारांना नोक-या मिळाल्या. पण लक्षावधी सामान्यांना काय मिळाले? हा विकास तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलेला नाही. मूठभर धनिकांच्या, काही बडय़ा अधिका-यांच्या आणि सरकारच्या खजिन्यात आणखी भर पडली असेल तर सामान्य माणसाचा, शेतक-याचा आणि कामगाराचा विकास झाला, असे म्हणता येईल का? यामुळे चिदंबरम मोदी यांचा विकासाचा दावा फसवा आहे, असे म्हणतात ते खरेच आहे.

मोदी हे फुटपाडे आणि विभाजनवादी आहेत, हा जो आरोप होतो आहे तो गंभीर असला तरी खरा आहे. त्यासाठी मोदी हे नेहमीच टीकेचे लक्ष्य राहणार आहेत. कारण काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीतील त्याचे सहकारी पक्षच नव्हे तर अन्य समविचारी विरोधी पक्ष धर्मनिरपेक्षतेचाच पुरस्कार करतात, हे उघड आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आणि शांती, सलोख्यावर भर देणारा व विकासकार्यात सर्वाना बरोबर घेणारा पक्ष असल्यानेच आज जनतेचा या पक्षावर विश्वास आहे. यामुळेच लोकांनी काँग्रेसला गेल्या दोन निवडणुकीत निवडून दिले आहे. भाजप व अन्य विरोधी पक्षांनी यूपीए सरकारमधील काही मंत्र्यांवर गेल्या चार वर्षात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप सातत्याने केले. संसदेतही अनेक वेळा गोंधळ, आरडाओरडा व घोषणाबाजी करून संसदेचे काम बंद केले.

त्यामुळे अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर होऊ शकली नाहीत. गरीब लोकांच्या कल्याणासाठी असलेले अन्न सुरक्षा विधेयक विरोधी पक्षांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे रखडले आहे. भाजपने सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले, अनेक प्रकरणे उकरून काढली, चौकशीची मागणी केली. टू-जी स्पेक्ट्रमसारख्या प्रकरणात सरकारने चौकशीचे आदेश दिले व पंतप्रधानांनी सरकार कोसळण्याचा धोका पत्करूनही आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे राजीनामे घेतले. सरकारला भ्रष्टाचारांच्या आरोपांचा भडीमार करून सरकारला जेरीस आणता येईल, कोंडीत पकडता येईल व संयुक्त पुरोगामी आघाडीत फूट पडून सरकार कोसळेल, असे भाजपला वाटले होते.

भाजप नेत्यांनी अनेकदा आपल्या कार्यकर्त्यांना मुदतपूर्व निवडणुकीसाठी तयार राहण्याचा आदेश दिला होता. पण भाजपची ही आशा फोल ठरली. उलट कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपला कोंडीत पकडले व विधानसभा निवडणुकीत भाजपचे पानिपत करून काँग्रेस सत्तेवर आली. भाजपचा भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रातील सरकारला हलवू शकला नाही. केंद्रातील काँग्रेसप्रणित आघाडी सरकार आपला कार्यकाळ पुरा करील, अशीच सध्या परिस्थिती आहे. मोदींमुळे रालोआत फूट पडली तर आहेच, पण भाजपमध्येही मोदींविरोधी जोरदार वारे वाहत आहेत. मोदी यांचे वजन भाजपमध्ये वाढत आहे व त्यांची निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे म्हणून अडवाणी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीवरच बहिष्कार टाकला व सर्व पदांचा राजीनामाही दिला.

पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत, हे महाराष्ट्रात घडलेल्या घटनांवरून दिसून येते. निवडणुकीपूर्वीच जर पक्षाची ही गत तर तिकीट वाटपाच्या वेळी काय होईल, हे सांगता येणार नाही. मोदींमुळे देशात भाजपची प्रतिमा व पत वाढेल व लोक पक्षाला निवडून सत्तेवर आणतील, असा भ्रम भाजप नेत्यांमध्ये निर्माण झाला आहे. पण मोदी यांचे पक्षात वजन वाढणे म्हणजे विभाजनवादी व अल्पसंख्याकविरोधी असलेल्या रा. स्व. संघाचा प्रभाव भाजपवर असल्याचा व वाढल्याचा पुरावाच आहे.

नरेंद्र मोदींमुळे आपल्याला लोकांना आकर्षति करता येईल, त्यासाठी मोदी हे हुकमाचे पान आहे, असा जो भाजप नेत्यांचा समज झाला आहे तो भाजपच्या चांगलाच अंगलट आला आहे. मोदींच्या भाजपमधील वाढत्या प्रभावामुळे भाजपमधील गटातटाचे राजकारण अधिकच उफाळून आले आहे. या पार्श्वभूमीवर २०१४च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्ता स्थापण्याचा भाजपचा आणि पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्या भ्रमाचा भोपळा निश्चितपणे फुटेल.

 [EPSB]

कुपोषणमुक्तीच्या दिशेने महाराष्ट्र

भारतात बालकुपोषण आणि बालमृत्यूची समस्या फार मोठी आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील अनियंत्रित व अफाट लोकसंख्या, गरीब व दारिद्रयरेषेखालील लोकांची वाढती संख्या व या लोकात असलेला अशिक्षितपणाचा अंधार यामुळे बालकुपोषण व बालमृत्यू या देशातील गंभीर समस्या आहे.

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version