Home कोलाज पायाला चाकं लावून पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचविणारी प्रकाशिका सुमती

पायाला चाकं लावून पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचविणारी प्रकाशिका सुमती

0

गेल्या जवळपास ३०-३२ वर्षापासून मी सुमतीला पाहत आली आहे. सुमती म्हणजे सुमती लांडे. श्रीरामपूरला तिचं स्वत:चं शब्दालय प्रकाशन आहे.

गेल्या जवळपास ३०-३२ वर्षापासून मी सुमतीला पाहत आली आहे. सुमती म्हणजे सुमती लांडे. श्रीरामपूरला तिचं स्वत:चं शब्दालय प्रकाशन आहे. तिची सतत भ्रमंती चालू असते. पुस्तक प्रकाशन हा तिचा व्यवसाय असला तरी मुळात साहित्याबद्दल तिला अतोनात प्रेम आहे.

उत्तमोत्तम लेखकांना भेटावं, त्यांची पुस्तकं छापावीत आणि ती संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा येथील शाळा, कॉलेज आणि ग्रंथालयाना पुरवावीत हाच तिचा ध्यास आहे. हे सगळं कसं आणि कधी सुरू झालं हे समजून घेणं माझ्यासाठीसुद्धा औत्सुक्याचं होतं.

‘सुमती साहित्याबद्दलचं प्रेम आणि प्रकाशनाचा व्यवसाय हे कधीपासून सुरू झालं?’ असं विचारल्यावर अगदी मनापासून हसून तिने बोलायला सुरुवात केली. सुमती तशी मनमोकळी आणि बोलघेवडी आहे.

साहित्याबद्दलची ओढ उपजतच होती म्हटलं तरी चालेल. माझं लग्न वयाच्या १७-१८ व्या वर्षी झालं. श्रीरामपूरसारख्या खेडेगावात आणि शेतकरी कुटुंबात लग्न झालं म्हणून माझं शिक्षण नाही थांबवलं तर ते पुढे चालूच राहील.  ग्रज्युऐशन, मराठी एम. ए., एम.फील आणि बी.एड. हे मी संसार आणि मुलं सांभाळूनच केलं.

शिक्षणादरम्यान माझं अवांतर वाचनही सुरू होतचं. त्यात कधीच खंड पडला नाही. १९४४-८५च्या दरम्यान ग्रंथाली वाचक चळवळीने चांगलाच जोर धरला होता. ग्रंथाली प्रकाशनाची काही पुस्तकं माझ्या शब्दालय पुस्तकालयात मी विक्रीसाठी ठेवली होती. हळूहळू पुस्तक विक्रीबरोबर माझ्याही नकळत मी या व्यवसायात ओढली गेले. इथचं माझं शब्दालय प्रकाशनचं रोपटं लागलं, असं म्हणायला हरकत नाही.

काळ, काम आणि वेग यांचा मेळ जमवताना तू फक्त व्यवसायच करत नाहीस तर स्वत:मधली लेखिका आणि कवयित्रीही जागती ठेवलीस, कसं जमवतेस हे सगळं?
मुळात माझं पहिलं प्रेम कवितेवर असल्यामुळे सतत माझ्या डोक्यात कविता असायचीच.

ती कागदावर अगदी बसच्या तिकिटाच्या मागच्या बाजूवरसुद्धा कधी कधी उतरवली जायची. सांगण्याचा मुद्दा असा की, माझ्या पहिल्या प्रेमावर माझ्या व्यवसायाने मात न केल्यामुळे मी आजही सातत्याने लिहू शकते.

साहित्याबद्दल जेवढे प्रेम आहे तेवढंच प्रेम माझं माझ्या व्यवसायावर आहे. आजघडीला मराठीतील सर्व महत्त्वाच्या लेखकांची पुस्तकं मी प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये रंगनाथ पठारे, दि. पु. चित्रे, वसंत आबाजी डहाके आणि अजून बरेच.

माझ्या प्रकाशन व्यवसायातील एक वैशिष्टय़ असं आहे की, मी कथा, कादंब-या, वैचारिक ही पुस्तकं तर काढतेच पण त्याबरोबर कवितांचीही पुस्तकं मी खूप प्रकाशित केली आहेत. आजपर्यंत जवळपास ३५० पुस्तकं प्रकाशित झाली असून संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यापर्यंत ही पुस्तकं पोहोचविण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे.

तुझ्या शब्दालय प्रकाशनाचा दिवाळी अंकही वाचनीय आणि एक विषय घेऊन काढलेला असतो, काय सांगशील त्याबद्दल?

हो. माझ्या पहिल्या दिवाळी अंकापासून मी हे वेगळेपण जपले आहे. एक विषय ठरवून, त्याविषयावर लेखकांकडून लिहून घेऊनच मी दिवाळी अंक काढत आले आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या पहिल्या दिवाळी अंकापासून आजपर्यंतचे जवळपास सगळे अंक पुरस्कारास पात्र ठरले आहेत.

सुमतीची ही ३०-३२ वर्षापासूनची वाटचाल ऐकताना मलाही तिचे कौतुक वाटत होते. सुमती मला एक सांग की या प्रकाशकाच्या व्यवसायात महिला प्रकाशक इतक्या कमी का?
कारणं तशी बरीच आहेत. इतर व्यवसायाप्रमाणेच इथे कष्ट आहेत, गुंतवणूक आहे आणि कटकटीही आहेत. महिला हे सगळं करू शकत नाहीत, असं नाही, पण पुस्तकांचे वितरण करणे यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते.

डोकं शांत आणि व्यवहार चोख ठेवावा लागतो. हजार पुस्तकं छापली तरी विकताना ती सर्वच पुस्तकं एकदम विकली जातील असं नाही. तेव्हा विक्रीमध्ये सातत्य ठेवणं आणि आर्थिक गणित जमवणं ही तंत्र जमली की हाही व्यवसाय इतर व्यवसायासारखाच फायद्याचा होऊ शकतो.

खरं तर महिलांमध्ये उपजतच चिकाटी खूप असते त्यामुळे या व्यवसायात लेखकांचे साहित्य मिळविणे, वाचणे, छापून घेणे, प्रूफ रीिडग आणि वितरण करणे या सगळ्या गोष्टी महिला उत्तमपणे करू शकतात, याची मला खात्री वाटते.

नेहमीचाच विचारला जाणारा पण आवश्यक असलेला प्रश्न म्हणजे लोकांचं वाचन कमी झालं आहे का?  आणि वाचक पुस्तक विकत घेतात का?

हा फार मोठा गरसमज आहे की, लोक वाचत नाहीत. अगं लोकांनी पुस्तकं वाचली नसती तर प्रकाशकांनी त्यांचा प्रकाशनाचा व्यवसाय बंद नसता का केला? मी संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तक वितरणासाठी फिरते. त्यामुळे मी हे विधान खात्रीपूर्वक करते आहे.

पुण्या- मुंबईमध्ये वाचकसंख्या थोडी कमी आहे कारण तिथे नोकरी-व्यवसायामुळे वाचनाला वेळ कमी मिळतो; परंतु उर्वरित ठिकाणी वाचकसंख्या खूप आहे. ग्रामीण भागांमध्ये कथा, कादंबऱ्यांबरोबर वैचारिक साहित्यही खूप वाचले जाते.

प्रकाशकांनी जर त्यांची प्रकाशने वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अजून जास्त मेहनत घेतली तर वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके सर्वानाच सहजतेने वाचण्यास मिळू शकतीत.
शेवटी एवढंच सांगते पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो आनंद आहे, तो ई-पुस्तकांमुळे मिळूच शकत नाही. तेव्हा लेखक लिहिणार, आम्ही छापणार आणि वाचक वाचू आनंदे म्हणून हा आनंद घेणार हे चित्र असंच दिसत राहणार याची मला खात्री आहे.- शुभांगी मांडे-खारकर

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version