Home महामुंबई ठाणे माथेरान मिनीट्रेनचे इंजिन पुन्हा घसरले

माथेरान मिनीट्रेनचे इंजिन पुन्हा घसरले

0

पर्यटकांची लाडकी माथेरान राणी पर्यटक प्रवाशांना घेऊन निघाली असता मिनीट्रेनचे इंजिन रविवारी ऐन गर्दीच्या वेळी रुळावरून घसरले.

नेरळ- पर्यटकांची लाडकी माथेरान राणी पर्यटक प्रवाशांना घेऊन निघाली असता मिनीट्रेनचे इंजिन रविवारी ऐन गर्दीच्या वेळी रुळावरून घसरले. त्यामुळे गाडीतील १४० प्रवाशांना तब्बल साडेपाच किलोमीटर अंतर पायी चालत नेरळ रेल्वे स्टेशन गाठावे लागले. दुसरीकडे मिनीट्रेनच्या तब्बल तीन फे-या यामुळे रद्द करण्यात आल्याने पर्यटक प्रवाशांना मनस्ताप झाला.

दरम्यान, मिनीट्रेन इंजिन घसरण्याचे रडगाणे कधी थांबणार, असा प्रश्न आहे. मिनीट्रेनचे इंजिन घसरण्याच्या घटना वाढल्याने ही गंभीर बाब आहे. इंजिन घसरून मोठा अपघात झाल्यास जिवितहानी होण्याची शक्यता असल्याने रेल्वे आणि संबंधित यंत्रणांनी या बाबत वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

शतक महोत्सव साजरा केलेली आणि जागतिक हेरिटेज वारसा मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या नेरळ-माथेरान या घाट मार्गावर धावणा-या मिनीट्रेनचे इंजिन घसरणे ही नित्याची बाब झाली आहे. रविवारी माथेरानमध्ये पर्यटक नेहमीप्रमाणे मोठी गर्दी  होती. त्यामुळे पाच डब्यांची मिनीट्रेन पूर्ण भरली व माथेरानहून नेरळकडे निघाली.

दुपारी साडेचारच्या सुमारास मिनीट्रेनने जुम्मापट्टी स्थानक सोडले होते. ‘एनडीएम ५५०’ हे इंजिन लावलेली मिनीट्रेन ‘एनएम ५४’ या ठिकाणी नांगरिखड येथे रुळावरून घसरले. त्याचवेळी मिनीट्रेन पहिला डबाही खाली उतरला होता. त्यानंतर पर्यटकाची धावपळ सुरू झाली. पूर्ण भरलेले ट्रेन रुळावरून घसरल्यामुळे पर्यटक प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

ट्रेन पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोठा वेळ जाणार असल्याने पर्यटकांनी पायीच नेरळला जाणे पसंत केले. साडेपाच किमीचे हे अंतर चालत जाऊन पर्यटकांनी पार केले. तर दुसरीकडे रुळावरून घसरलेले इंजिन उचलून पुन्हा गाडी रुळावर येण्यासाठी रात्रीचे बारा वाजले. मध्यरात्री एक वाजता मिनीट्रेन नेरळ स्थानकात पोहचली.

त्यामुळे माथेरानहून दुपारी सव्वातीन वाजता नेरळकडे निघालेली मिनीट्रेन जुमापट्टी स्थानकातच रद्द करण्यात आली. तर साडेचार वाजता माथेरान येथून सुटणारी मिनीट्रेनची फेरी माथेरान येथे रद्द करण्यात आली. त्याचवेळी सोमवारी नेरळहून माथेरानकरता जाणारी ६.४० ची मिनीट्रेन नेरळ येथे रद्द करण्यात आली.

या सर्व प्रकाराने नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून घसरण्याची परंपरा थांबण्याचे नाव घेत नाही. रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक पुढील काही दिवसात कर्जत, नेरळच्या दौ-यावर येत आहेत. त्यावेळी मिनीट्रेनच्या इंजिनाच्या घसरण्याची समस्या त्यांच्यासमोर मांडणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version