Home प्रहार ब्लॉग ‘लोकल’ प्रवासी समितीचे सदस्य सचिन आणि रेखा

‘लोकल’ प्रवासी समितीचे सदस्य सचिन आणि रेखा

2

दुर्धर आजार असताना शस्त्रक्रिया न करता त्याऐवजी शिकाऊ डॉक्टरकडून गोळ्या- औषधे घेऊन वेळ भागवावी अशीच काहीशी परिस्थिती सध्या नेमण्यात आलेल्या लोकल अपघात आढावा समितीची झालेली पाहायला मिळते.

लोकलच्या मार्गावर होणा-या अपघातांचा सुपरफास्ट वेग पाहता अपघातांचा हा वेग कमी करण्यासाठी मोठय़ा फेरबदलांची गरज आहे. मात्र, त्याऐवजी लोकल प्रवासाचा गंध नसलेल्या खासदारांना लोकल प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नियुक्त करून प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा भंपकपणा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे.

वर्षभरात तीन हजारांहून अधिक प्रवाशांना रेल्वे अपघातात जीव गमवावा लागतो. यामध्ये रेल्वे रूळ ओलांडणे, गाडीतून पडून होणारे मृत्यू, फलाट आणि लोकलच्या अंतरामुळे रुळाखाली जाऊन होणारे अपघात, त्याशिवाय रुळालगतचे खांब आणि ओव्हरहेड वायरचा धक्का लागून होणारे मृत्यू यांचा सामावेश आहे. दररोज किमान १० प्रवाशांचा मृत्यू हे अगदी निश्चित मानले जाते. कोपर ते दिवादरम्यान झालेल्या अपघातांनंतर सोशल मीडियातून अब्रूचे धिंडवडे निघाल्यानंतर लोकप्रतिनिधींना जाग आली आणि त्यांनी हा प्रश्न रेल्वेमंत्र्यांच्या दरबारी मांडला. आता मुंबईकर असलेल्या रेल्वेमंत्र्यांना हे सारे सांगायला लागावे ही लाजीरवाणी बाब म्हटल्यास काही चुकीचे ठरेल असे वाटत नाही. त्यानंतर एरवी चमकूगिरी करणा-या खासदार आणि खुद्द रेल्वेमंत्र्यांवर होणारी टीका लक्षात घेत खासदार, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि रेल्वेशी संलग्न समितींमधील सदस्यांची नेमणूक करून अपघात आढावा समिती नेमण्यात आली.

सुरुवातीला मध्य रेल्वेची अपघात आढावा समिती जाहीर केल्यानंतर पश्चिम रेल्वेने आपली वेगळी चूल मांडली आणि वेगळी समिती स्थापन केली. मध्य रेल्वेच्या समितीमध्ये खासदार किरीट सौमय्या,खा.राजन विचारे,खा. पुनम महाजन, खा.अरविंद सावंत, केतन गोराडिया (प्रवासी संघटना), एल.आर. नागवानी(सामाजिक संस्था) एस.के. सूद (महाव्यवस्थाक मध्य रेल्वे), के.डी.एम.सी. आयुक्त ई.रविचंद्रन, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांचा सामावेश करण्यात आला.

यामध्ये केवळ महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद वगळता इतर कोणाला मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या समस्यांची जाण असावी असे दिसत नाही. खासदार पुनम महाजन यांना तर मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एखादा बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे तयारी करावी लागेल. तर, दोन्ही पालिका आयुक्तांना प्रवाशांच्या समस्यांची जाण असती तर ठाण्यापलीकडच्या प्रवाशांची रस्ते वाहतुकीसाठी वाताहत झाली नसती. तर गोराडिया हे कोणत्याही प्रवासी संघटनेचे पदाधिकारी नाहीत. तर नागवानी हे ट्रॅव्हल्स एजंट हे दोघेही पश्चिम रेल्वेचे प्रवासी आहेत.

आता काही प्रमाणात राजन विचारे आणि अरविंद सावंत यांना जाण असेलही, मात्र प्रश्न ठाण्याच्या पलीकडचा अधिक गंभीर आहे. त्यामुळे त्या भागातील खासदारांना समितीमध्ये स्थान द्यायला हवे होते, तसे झाले नाही, तर पश्चिम रेल्वेच्या समितीत मास्टर ब्लास्टर खासदार सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री खासदार रेखा यांना स्थान देण्यात आले आहे. सचिनने १९८८ पासून लोकलने प्रवास केलेला नाही. तर, खासदार अभिनेत्री रेखा यांना एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रेल्वे प्रवास करावा देखील असेल. त्यामुळे तयार करण्यात आलेली अपघात आढावा समिती होणा-या अपघातांबाबत काय मार्ग काढेल हे काही वेगळे सांगायला नको.

ठरल्याप्रमाणे या दोन्ही समित्यांची बैठक पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुख्यालयांत पार पडली. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या समितीने प्रवाशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. तर, मध्य रेल्वेची पहिलीच बैठक असहकार्यामुळे चांगलीच रंगल्याचे समोर आले आहे. या समितीमधील विविध सदस्यांनी मांडलेल्या पर्यायानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी मांडलेली आकडेवारी शास्त्रीय पद्धतीने मांडण्यात न आल्याने नाराज भाजपाचे खासदार किरीट सोमय्या याबाबत रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असून मध्य रेल्वे प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्यात स्वारस्य नाही असे सांगणार असल्याचे सांगितले.

या बैठकीला खा. पुनम महाजन यांनी मुंबईतील लोकलच्या प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वत: न येता प्रतिनिधीला पाठवण्यात धन्यता मानली. तर खासदार अरविंद सावंत यांनी १५ ते २० मिनिटांची औपचारिक हजेरी लावून मुंबईच्या प्रवाशांचे प्रश्न सोडून दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या होणा-या अपघातांच्या गंभीर प्रश्नांवर नेमण्यात आलेल्या समिती किती गंभीर आहे हे यावरून स्पष्ट होते.

2 COMMENTS

  1. Glamour ok. Brand ambassadors ok. However, what inputs are these two going to give to the Rail administration. At least local MPs will or may have travelled in local trains fir keeping their voters happy or sincerely understanding the local rail travelling woes. But these celebrities ? God knows what the Central & Western Railway authorities are up to.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version