Home संपादकीय अग्रलेख शिखरावरची सारस्वत बँक

शिखरावरची सारस्वत बँक

0

राज्यातल्या सहकार क्षेत्राला आता १०० वर्षे होऊन गेली. ब्रिटिशांच्या काळातील कायद्यांनी सहकार क्षेत्राची निर्मिती झाली आणि स्वातंत्र्य पूर्व काळात अनेक सहकारी संस्थांची निर्मिती झाली, वाढही झाली. यामध्ये अनेक सहकारी संस्था, पतपेढय़ा, विकास सोसायटय़ा आणि बँकांचाही समावेश होता. सहकारातून बँक ही कल्पना त्यावेळी रुजणे एवढे सोपे नव्हते. कारण इंम्पेरियल बँक आणि अन्य सरकारी बँका यांच्यावर जनतेचा विश्वास जास्त होता.

आज जी स्टेट बँक आहे, ती त्यावेळी पूर्णपणे सरकारी शाखा होती; परंतु सहकारामधली ९७ वर्षापूर्वी स्थापन झालेली सारस्वत बँक ही सहकारी चळवळीतील सगळय़ात मोठी आणि विश्वसनीय बँक मानली पाहिजे. कारण सलग ९७ वर्षे या बँकेची वाटचाल अतिशय यशस्वीपणे, सचोटीने आणि सभासदांचा पूर्ण विश्वास संपादन करून सुरू आहे.

२०१८मध्ये बँक शतक पूर्ण करेल?आणि सहकारातील शतक पूर्ण करणारी ही अग्रगण्य बँक ठरेल. सहकारी चळवळीत ‘बँकिंग’ या विषयात प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी विषय माहिती करून ती संस्था यशस्वीपणे चालवणे, ही गोष्ट आज सोपी वाटत असली तरी सारस्वत बँक स्थापन झाली त्यावेळी १९१८ साली ही गोष्ट एवढी सोपी नव्हती. आज सारस्वत बँकेचे उद्दिष्ट ५० हजार कोटी रुपयांचे आहे आणि त्यामुळे ९७ वर्षे या बँकेने ग्राहकांचा आणि त्या बँकेच्या सभासदांचा विश्वास मोठय़ा प्रमाणात यशस्वी केलेला आहे.

या बँकेच्या यशाचे अनेक शिल्पकार आहेत; पण या बँकेच्या विश्वासार्हतेचे, वाढीचे आणि व्यवसायातील यशाचे खरे मर्म समजले ते अनेक वर्षे बँकेचे अध्यक्ष असलेले एकनाथजी ठाकूर यांना. एकनाथ ठाकूर यांना सहा वर्षाकरिता राज्यसभेची खासदारकी मिळाली होती. एखादा सहकार क्षेत्रातला कार्यकर्ता किंवा नेता खासदार झाल्यावर राजकारणात गुरफटून गेला असता किंवा आपल्याला खासदारकीची पुन्हा संधी कशी मिळेल, याचे डावपेच करत बसला असता; परंतु एकनाथ ठाकूर यांनी राज्यसभेतल्या खासदारकीमध्ये फार जीव गुंतवला नाही. त्यांच्या आयुष्यातली सगळी मोलाची आणि उमेदीची वर्षे त्यांनी सारस्वत बँक मोठी करण्याकरिताच खर्ची केली. निरपेक्ष राहून त्यांनी ही सेवा दिली. अत्यंत शांत स्वभावाचे एकनाथ ठाकूर यांच्या अथक परिश्रमातूनच सारस्वत बँक आज वैभवाच्या शिखरावर पोहोचली आहे. या बँकेच्या यशाच्या पायाचे जे दगड आहेत, ज्यांच्या जोरावर ही बँक उभी राहिली आहे, त्या एकनाथजी ठाकूर यांना कोणत्याही परिस्थितीत वजा करता येणार नाही. इतके त्यांचे अलौकिक काम आहे. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी बँकेच्या कामापासून स्वत:ला कधी वेगळे केले नाही. प्रभादेवीला मुख्यालय स्थापन केल्यानंतर सकाळी दहापासून ते स्वत: कार्यालयात उपस्थित असायचे. बघता बघता बँकेचा पसारा त्यांनी वाढवला. एखादा संस्थेचा जो मुख्य आधार असतो, तो निसर्गनियमाने जेव्हा बाजूला होतो, त्यानंतर ती संस्था मजबूत राहील की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जाते; पण कमान बांधताना त्या कमानीला आधार देतात आणि विशिष्ट दिवसानंतर तो आधार काढून घ्यायचा असतो. आधार काढून घेतल्यानंतर कमान कोसळली नाही तर तो आधार पक्का होता, असे मानले जाते. सारस्वत बँकेच्या यशस्वी कमानीला मजबूूत खांद्याच्या एकनाथ ठाकूरजींचा आधार होता आणि तो पक्का आधार होता. त्यामुळे एकनाथजींच्या दु:खद निधनानंतरही सारस्वत बँक खचली नाही. उलट संस्थेचे नवे अध्यक्ष शशिकांत साखळकर, उपाध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर आणि कार्यकारी संचालक समीरकुमार बॅनर्जी, विविध विभागातील व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, शाखाप्रमुख आणि शेवटच्या कर्मचा-यापर्यंत सर्वानी सारस्वत बँक आपली मानली आणि आपली सेवा त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या बँकेला दिली. त्यामुळे २०१५च्या अखेरीला (जून ३०) ४४,९६८.९६ कोटी रुपयांवर बँकेचा व्यवसाय वाढलेला आहे. आज सारस्वत बँकेकडे २७,१७०.८४ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवीमध्ये त्यांच्या सरलेल्या आर्थिक वर्षात १३.५० टक्क्यांनी वाढ झाली. या एकाच आकडय़ावर बँकेबद्दल सदस्यांना असलेला विश्वास किती मोठा आहे, हे समजते. बचत खात्यातल्या ठेवीसुद्धा ७१६ कोटी रुपयांवर गेल्या आणि बँकेने निव्वळ नफा १४७ कोटी रुपये मिळवलेला आहे. ही सगळी आकडेवारी सहकार क्षेत्राला अतिशय अभिमानास्पद म्हटली पाहिजे.

एकीकडे सहकार क्षेत्रातल्या अनेक संस्था बंद पडत आहेत. सहकारी बँकांसुद्धा बंद पडत आहेत. तिथे प्रशासक नेमावे लागले. महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नेमावा लागला. रोहा अष्टमी को. ऑप. बँक दिवाळखोरीत निघाली. तिथेही प्रशासक नेमला. पेण अर्बन सहकारी बँकेची तीच अवस्था झाली आणि अनेक सभासदांच्या ठेवी बुडाल्या. आज ती प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. कराड बँक बुडाली. महाराष्ट्रात ही उदाहरणे डोळय़ासमोर आहेत. अनेक सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. अनेक सहकारी सूत गिरण्या बंद पडल्या आहेत. सहकारी कारखाने अडचणीत आलेले आहेत. सध्या सहकारी ऊस कारखानदारीला अतिशय विपरित असे दिवस आहेत. या संस्था कशा चालवाव्या? आर्थिक अडचणीतून कसे बाहेर यावे, असे असंख्य विषय या क्षेत्रातल्या कारखानदारीला भेडसावत असताना अनेक अडचणींवर मात करून सारस्वत बँक आता शतकाकडे वाटचाल करीत आहे आणि ५० हजार कोटी रुपयांची सहकारी बँक होणे, ही गोष्ट सोपी नाही. पुढच्या तीन वर्षात जेव्हा ही बँक शतकात प्रवेश करेल. रिझव्‍‌र्ह बँकेने आखून दिलेल्या नियमावलीत काम करणे आज इतके सोपे राहिलेले नाही; पण सारस्वत बँकेने मात्र रिझव्‍‌र्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे काटेकोरपणे पाळून आपली गुणवत्ता टिकवली. एवढेच नव्हे तर अनेक पुरस्कार मिळवून या बँकेचा गौरव वाढवलेला आहे. ‘उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञान सक्षम बँक’ हा पुरस्कार रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरने सारस्वत बँकेला सादर केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, नवी दिल्ली या शहरात २६७ शाखा आज कार्यरत आहेत. तेव्हा सारस्वत बँकेचे हे यश अतिशय लक्षणीय मानले पाहिजे आणि सहकाराबद्दलचा विश्वास वाढवण्यास सारस्वत बँकेची गुणवत्ता आणि सचोटी निश्चित उपयोगी पडेल.?म्हणून शतकाकडे झेपावणा-या या बँकेला शुभेच्छा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version