Home प्रहार ब्लॉग ‘निषेधा’चे अर्थकारण

‘निषेधा’चे अर्थकारण

1

लोकशाहीत माणसाला एकजुटीने आपला निषेध नोंदवण्यासाठी किंवा आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी किंवा राज्यकर्त्यांवर दबाव आणण्यासाठी एक हुकमी मार्ग आहे आणि तो म्हणजे, मोर्चा, धरणे किंवा रॅली! आपल्या स्वातंत्र्याचे बरेचसे श्रेय मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच बापूजींच्या नेतृत्वाखाली आपण केलेल्या या मार्गाच्या वापराला जाते. त्यामुळे भारतीयांचा या मार्गाबद्दल एक विशेष किंवा खास असा भावबंध निर्माण झालेला आहे. पण, आजमितीला त्याचा केला जाणारा वापर (खरे तर गैरवापरच!) पाहता मला या तीन शब्दांच्या इंग्रजी आद्याक्षरांपासून बनणारे ‘एमडीआर’ हे संक्षिप्त रूपच प्रकर्षाने खुणावत राहते. यातील डूब समजावून घेण्यासाठी आपल्याला मध्यंतरीच्या काळात माध्यमांतून छापून आलेल्या क्षयरोगासंबंधीच्या बातम्या आठवाव्या लागतील. त्यात लिहिल्याप्रमाणे क्षयाचे विषाणू आता एमडीआर झालेत. म्हणजेच, ब-याचशा औषधांना न जुमानणारे, मल्टिड्रग रेसिस्टंट! या मार्गाचेही अशाच विषाणूत रूपांतर झालेय असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

आपल्या इथला या मार्गाचा इतिहास लक्षात घेता, या मार्गाचा वापर म्हणजेच आपल्या मागण्यांच्या पूर्ततेची खात्री असा निषेधक-यांचा समज झाला आहे असे मला वाटते. निषेधक-यांना त्यांच्या मोर्चामुळे निर्माण होणा-या गैरसोयीचा किंवा तोटय़ाचा अंदाज येत नसावा का, असा प्रश्न पडतो. वानगीदाखल नुकताच झालेला १९ जुलै २०१६चा मोर्चा घेऊया. हा मोर्चा भायखळ्यापासून विधानभवनावर नेण्यात आला होता. या दिवशी निर्माण झालेली वाहनकोंडी विरुद्ध दिशेला असणा-या पार शीव (१४.५ किमी)पर्यंत अनुभवायला मिळाली. ट्रॅफिक पोलिसांना हतबल करत, पक्षघाताचा झटका आल्यासारखा मुंबईचा हा भाग पूर्णपणे ठप्प झाला होता.

ही झाली फक्त वैयक्तिक पातळीवरील मानसिक व शारीरिक गैरसोय. एखादेवेळी, निषेधकर्त्यांची शासनास वठणीवर आणण्याच्या व्युहातील ही एक खेळी असू शकेल, असा विचार करून समजावून घेता येईल. पण यामुळे निर्माण होणा-या आर्थिक नुकसानीचे काय? माणसांना कामावर पोचता न आल्याने व्यावसायिक संस्थांचा बुडणारा महसूल त्यांच्या लक्षात येत नसावा हे कोणालाही न पटणारे आहे. काही संघटनांच्या प्रसिद्ध इतिहासामुळे त्यांनी केलेल्या मोर्चाच्या आयोजनाचे निमित्त साधत ब-याच छोटय़ामोठय़ा व्यावसायिक संस्था सुटीच जाहीर करून टाकतात. त्यामुळे एक दिवसाच्या महसुलाच्या नुकसानीच्या मोबदल्यात ते जागा आणि फर्निचरच्या, कितीतरी अधिक पटीच्या, नुकसानीची शक्यता तरी कमी करवतात. यातील सर्वात वाईट पैलू म्हणजे, हातावर पोट असलेल्यांचा बुडता रोजगार! तो फक्त भावनाहिनांनाच न जाणवणारा असू शकतो.

या निषेध मोर्चाचा सुळसुळाट पाहता आपल्याकडे सर्व रोगांवरचे रामबाण औषध म्हणूनच याचा वापर केला जातो. मग काय? जीवनावश्यक चिजांच्या वाढत्या किमतींच्या निषेधातील मोर्चा संपेपर्यंत वाढत्या बेकारीचे कारण घेऊन एक मोर्चा सुरू होतो. मग वाढती गरिबी. पाठोपाठ, वाढत्या समाजविरोधी कारवाया. अशा निषेधांसाठी काढलेल्या मोर्चाची एक शृंखलाच सुरू होईल आणि वर सांगितल्याप्रमाणे क्षयाच्या मल्ट्रिडग रेसिस्टंट विषाणूसारखे, त्याला आवर घालणे कठीण होऊन बसेल. त्यामुळे या निषेध मार्गाचाच निषेध करण्याच्या आपण समीप आलोय असे वाटल्यावाचून राहात नाही.

नेहमीप्रमाणेच, या परिणामांचे आकडय़ांतील रूप पाहूयात. अर्थात, फक्त मुंबईपुरतेच! आपणा सर्वानाच माहीत आहे की, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. हे शहर करमणूक, फॅशनबरोबरच इतरही वाणिज्य उलाढालींचे केंद्र आहे. मुंबईचे, म्हणजे फक्त मुंबईचे, सकल उत्पन्न २७,८०० दशलक्ष डॉलर आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील मुंबईचा सहभाग ६.१६ टक्क्याहून अधिक आहे. भारतातील आर्थिक घडामोडीत १० टक्के कारखान्यांतील नोक-या, ३० टक्के आयकर, ६० टक्के आयात कर, २० टक्के अबकारी कर (एक्साइज), ४० टक्के विदेशी व्यापार आणि १०० दशलक्ष डॉलर्सचा कॉपोर्रेट कर भरत मुंबई आघाडीवर आहे. अशा या व्यग्र शहरांतील एका दिवसाचे ठप्प होणे किती नुकसानकारक आहे हे जाणण्यासाठी अंकगणितीची प्राथमिक ओळख पुरेशी आहे. पण, अशा मानवनिर्मित व्यत्ययाने हातून सुटणा-या संधी आणि त्यामुळे खुंटणारा विकास याची आकडेमोड करण्यासाठी काही अमानवी कौशल्यांची गरज आहे असे मला वाटत नाही.

बापूजींचे अनुकरण करत निषेध करणा-यांना मला सांगावेसे वाटते की, त्यांनी अवलंबिलेल्या या मार्गामुळे याच समाजातील कांही, ज्यांना स्वत:च्या कल्पकतेचा वापर करून आपले विश्व बनवायचे आहे, सामाजिक परिवर्तन करायचे आहे आणि देशाच्या अर्थकारणातही सहभाग द्यायचा आहे, अशांना गैरसोय निर्माण करण्याशिवाय दुसरे काहीही साध्य होत नाही आहे. आणि त्याचे विपरीत परिणाम भोगायला लागण्याआधीच आपण सावध झालेले बरे!

1 COMMENT

  1. प्रिय लेखक,
    आरक्षण मिळवण्यासाठी आणि मिळाल्यानंतर किती दंगे घातले गेले हे तुम्हाला दिसलेलं नाहीय असं वाटत. आज मराठे एकत्र आले तर हि भाषा, आणि ज्यावेळी आरक्षणासाठी घाणेरड्या पद्धतीने मोर्चे झाले त्यावेळी तुमची हि मानसिकता कुठे होती. जाती पती न मानण्याचा ठसका काय फक्त मराठ्यांनीच घेतलाय का?
    अन्याय, अत्याचार हा पूर्णपणे काठीतच आहे यात तिळमात्र शंका नाहीय, जरा जुने चित्रपट पहा, त्या चित्रपटनातून दलितांना अन्याय झाला हेच दाखवण्यात आलाय आणि आता तोच दागिना म्हणून वावरत आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version