मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणात एक नवी आणि मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता तुरुंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी हा दावा केला आहे.
परमबीर सिंग यांच्याकडून जीवास धोका
अॅडव्होकेट निलेश ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची विनंती केली आहे. तसेच वाझे या प्रकरणात साक्षीदार झाल्यास त्यांना माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही ओझा यांनी केला आहे. सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून लेकीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित करत सीबीआय तपासाचे आदेश दिले होते.
पुराव्यामध्ये फेरबदल केल्याचा गंभीर आरोप
दिशा सालियान प्रकरणात सचिन वाझे यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वाझे यांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रभाव पाडल्याचा आणि पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिशाच्या शवविच्छेदन अहवालातही फेरफार करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. याशिवाय दिशाला घरी नेण्यासाठी सचिन वाझे यांच्या कारचा वापर झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व सध्या आरोप असून त्यावर न्यायालयीन निर्णय येणे बाकी आहे.
या प्रकरणावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले होते. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत होते. तर ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे आरोप राजकीय द्वेषातून केले जात असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले होते. आता सचिन वाझे खरोखरच माफीचे साक्षीदार होतात का आणि यामुळे या प्रकरणाला काय नवे वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






