
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तकाचे शुक्रवारी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे.या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश भूषण गवई शाळेतील विद्यार्थ्यांचा वर्ग घेणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि गवई ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’या पुस्तिकेतील धडे विद्यार्थ्यांना समजावून सांगणार आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांशी ते संवादही साधणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश यांच्याशी थेट बोलण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई महापालिकेने भारतीय संविधानावर आधारित शैक्षणिक साहित्य विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर महिनाभरातच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी दादर (पश्चिम) येथील भवानी रोडवरील मुंबई महापालिकेच्या शाळेत आयोजित करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार आणि आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अनेक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्या आणि भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा योजना ठोकळे यांनी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित घटनात्मक मूल्यांचे शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
देवेंद्र फडणवीसांसोबत स्वतः भेट घेतल्याची सांगितली आठवण मुंबई : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली ...
‘स्मार्ट नागरिक’ अभ्यासक्रमाचा भर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी मूल्ये रुजवणे आणि त्यांच्यात नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ करणे यावर असेल. ‘विद्यार्थी प्रेरणा’ हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेणारे असेल. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नागरी जाणीव, घटनात्मक मूल्ये आणि चारित्र्यविकासाला प्रोत्साहन देणे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवणे, नागरिक म्हणून त्यांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे, दैनंदिन जीवनातील घटनात्मक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगणे तसेच समाज आणि राष्ट्रासाठी सकारात्मक योगदान देण्यास प्रोत्साहित करणे, हे या उपक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असल्याचे आमदार अमित साटम यांनी माहिती देताना सांगितले.
देशाचे भविष्य घडवणाऱ्या तरुण पिढीमध्ये घटनात्मक मूल्ये रुजवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. भारतीय संविधान हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा मूलभूत आधार असल्याचे सांगून साटम म्हणाले की, संविधानातील मूल्ये, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवली पाहिजेत. विशेषतः बालवयात ही मूल्ये कृती-आधारित, अनुभवाधारित आणि वयोगटाला अनुरूप शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून समजावून सांगितली, तर ती विद्यार्थ्यांच्या दैनंदिन विचारांत, आचरणात आणि वर्तनात अधिक प्रभावीपणे रुजण्यास मदत होईल, असे साटम यांनी स्पष्ट केले.





