
मुंबई : “हलाल प्रमाणपत्रांच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हिंदू समाजाला दुर्बल करण्यासाठी आणि भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी वापरला जात आहे. २०४७ पर्यंत भारताला ‘गज्वा-ए-हिंद’ करण्याचा प्रयत्न सुरू असून, तो हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार टाकावा”, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केला. हलाल प्रमाणपत्रांविरोधात ‘चांदा ते बांदा’ ही राज्यव्यापी हिंदू जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा त्यांनी सिंधुदुर्ग येथे केली. या मोहिमेच्या माध्यमातून हिंदू समाजाने एकत्र येऊन या विषयावर ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहनही राणे यांनी केले.
हलाल प्रमाणपत्रांच्या विक्रीवर प्रश्न उपस्थित करत मंत्री राणे म्हणाले की, सरकारी मान्यता किंवा कायदेशीर अधिकार नसतानाही खासगी संस्थांकडून ७० ते ८० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारून प्रमाणपत्रे दिली जातात. मांसाहारी पदार्थांपुरती मर्यादित असलेली हलालची संकल्पना आता शाकाहारी अन्नपदार्थ, कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि जीवनरक्षक औषधांपर्यंत पोहोचवली जात आहे. विविध वस्तूंवर हलालचा शिक्का मारून ग्राहकांवर अशी उत्पादने खरेदी करण्याचा अप्रत्यक्ष दबाव आणला जात आहे. या प्रमाणपत्रांमधून उभ्या राहणाऱ्या आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता तपासण्याची गरज आहे. हलाल प्रमाणपत्रांच्या माध्यमातून जमा होणारा निधी ‘हलाल जिहाद’चा भाग असून, हा पैसा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी आणि हिंदू समाजाला दुर्बल करण्यासाठी वापरला जात आहे. सनातन हिंदू धर्मपरंपरेत हलाल संकल्पनेला मान्यता नसल्याचे सांगत, हिंदू समाजाने अशा प्रमाणपत्रांचा वापर असलेल्या वस्तू आणि पदार्थांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी हलाल प्रमाणपत्रांना पर्याय म्हणून ‘मल्हार प्रमाणपत्रा’ची मागणी केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
मंत्री नितेश राणे म्हणाले, भगवद्गीता सर्वांना समान वागणूक देण्याची शिकवण देते; मात्र चूक करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणाचा आणि खरात प्रकरणाचा उल्लेख करत, चुकीचे कृत्य करणाऱ्यांना पाठीशी घालणे हिंदू धर्माच्या शिकवणीत बसत नसल्याचे त्यांनी सांगितले. गोमातेला हिंदू धर्मात पूजनीय स्थान असताना गोमांसाचा व्यवसाय केला जातो. अन्य धर्मांतील धार्मिक आचार आणि हिंदूंच्या सणांमधील सहभाग याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मी कुराण तीनदा वाचले आहे. विशिष्ट धर्मात हलाल पदार्थांचे सेवन करण्याची परंपरा असल्यास इतर धर्मीयांनीही तेच स्वीकारण्याची सक्ती का असावी? हिंदू समाजाने याविरोधात एकत्र यावे, आपल्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्यावी आणि अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले.






