Thursday, October 22, 2026

French Open 2026: फ्रेंच ओपनमध्ये मोठा उलटफेर! सिंधूचा थरारक विजय तर तरुण खेळाडूने श्रीकांतला चारली धूळ

फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूने रोमांचक विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे, तर तरुण खेळाडू आयुष शेट्टीने किदाम्बी श्रीकांतचा पराभव करत मोठा उलटफेर केला आहे.

पॅरिस (फ्रान्स) : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या रोमांचक फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या स्टार खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूने अत्यंत चुरशीच्या लढतीत जिद्दीने पुनरागमन करत विजयी सलामी दिली, तर दुसरीकडे युवा खेळाडू आयुष शेट्टीने भारताच्याच अनुभवी किदाम्बी श्रीकांतचा पराभव करत मोठा उलटफेर घडवून आणला आहे. या थरारक सामन्यांनी बॅडमिंटन जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.

पी.व्ही. सिंधूचा थरारक विजय

महिला जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानी असलेल्या पी.व्ही. सिंधूने 'अरेना ग्रँड पॅरिस' येथे झालेल्या 64 मिनिटांच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात थायलंडच्या सुपानिदा काटेथोंगचा 21-14, 8-21, 23-21 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये सिंधूने सहज विजय मिळवला, पण दुसऱ्या गेममध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये सिंधू 19-8 अशी मजबूत आघाडीवर असताना काटेथोंगने सलग 11 गुण घेत 19-19 अशी बरोबरी साधली. अखेर सिंधूने संयम राखत गेम आणि सामना आपल्या नावावर केला.

आयुष शेट्टीचा अनुभवी श्रीकांतवर विजय

पुरुष एकेरीत युवा खेळाडू आयुष शेट्टीने माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या किदाम्बी श्रीकांतचा 19-21, 21-16, 21-12 असा पराभव केला. पहिला गेम गमावल्यानंतर आयुषने शानदार पुनरागमन केले. निर्णायक गेममध्ये श्रीकांतने सुरुवातीला आघाडी घेतली होती, पण आयुषने आक्रमक खेळ करत 14-12 अशा धावसंख्येवरून सलग सात गुण मिळवले आणि दिमाखात विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

इतर भारतीय खेळाडूंची कामगिरी

महिला एकेरीत भारताच्या देविका सिहागने इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित पुत्री कुसुमा वर्दानीविरुद्ध जोरदार लढा दिला, पण तिला 21-9, 16-21, 22-20 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. तसेच, महिला दुहेरीत रुतपर्णा पांडा आणि श्वेतापर्णा पांडा या जोडीला जपानच्या रिरीना हिरामोतो आणि चिहारू शिदा यांच्याकडून 21-6, 21-11 असा पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेतून बाहेर जावे लागले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >