Friday, October 23, 2026

Champi Cyclone: तैवानमध्ये ‘चांपी’ चक्रीवादळाचा हाहाकार; शाळा-कार्यालये बंद, शेकडो उड्डाणे रद्द!

तैवानवर 'चांपी' चक्रीवादळाचे मोठे संकट ओढवले असून ताशी 170 किमी वेगाच्या वाऱ्यांमुळे शाळा, कार्यालये बंद आणि शंभराहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

ताइपे: तैवानमध्ये 'चांपी' चक्रीवादळाने धडक देण्यापूर्वीच हाहाकार माजवला आहे. ताशी 170 किलोमीटर वेगाने वाहणारे विनाशकारी वारे आणि मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने अत्यंत वेगाने पावले उचलत तैपेई, कीलुंग, ताओयुआनसह अनेक प्रमुख भागांमध्ये शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. वादळाचा धोका ओळखून समुद्रकिनारे आणि डोंगराळ भागांत जाण्यास कडक मनाई करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रमुख शहरे आणि बेटांवर शुकशुकाट

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, ग्रेटर तैपेई, कीलुंग आणि ताओयुआन यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये शुक्रवारी सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. दक्षिण तैवानमधील युनलिन, चियायी, ताइनान, काओशुंग आणि पिंगतुंग या भागांतही खबरदारी म्हणून सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. पूर्व तैवानसह यिलान, हुआलिएन, पेंघू आणि लियानचियांग या बाह्य बेटांवरही बंदची घोषणा करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत.

अवघ्या 24 तासांत 200 मिमी पाऊस आणि पूरस्थिती

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तैवानच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने कहर केला आहे. केवळ 24 तासांच्या आत तैपेई शहरातील काही भागांत 200 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. यामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवार संध्याकाळपर्यंत या वादळाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर तीव्रता ओसरण्याची अपेक्षा आहे.

हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम; शेजारील जपानलाही तडाखा

या महाभयंकर चक्रीवादळाचा थेट परिणाम विमान वाहतुकीवर झाला आहे. वादळ धडकण्यापूर्वीच तैवानमधील शंभराहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांनी विमान कंपन्यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या चक्रीवादळाचा प्रभाव शेजारील जपानपर्यंत पोहोचला असून तेथील चार प्रमुख विमान कंपन्यांची 160 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >