Friday, October 23, 2026

Nitesh Rane : रामदास कदमांचे विधान एकनाथ शिंदेंच्या संमतीने आहे का? मंत्री नितेश राणे यांचा सवाल

मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दरम्यान, रामदास कदम यांच्या विधानाला एकनाथ शिंदे यांची संमती होती का, या प्रश्नावरूनही राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : “आमच्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही 'राम-लखन'ची जोडी आहे आणि या दोघांनी एकत्र मिळून महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे नावाचा रावण जाळला आहे. त्यामुळे रामदास कदम भाजपबद्दल जे बोलत आहेत, त्यामागे शिंदेंचा होकार आहे का, याची स्पष्टता मिळायला हवी,” असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित कथित 500 कोटींच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरून महायुतीत राजकीय वाद पेटला आहे. या ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती भाजपशी संबंधित असून, एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी भाजपनेच हे षड्यंत्र रचल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला होता. या आरोपांवर राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत रामदास कदम यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, मच्छीमारांचे प्रश्न आणि पाझर तलावांतील गाळ काढण्याच्या मुद्द्यांवर आढावा घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे पत्रकारांशी बोलत होते. महायुतीत सर्वकाही सुरळीत असताना अशा विधानांमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळते आणि उद्धव ठाकरेंना रात्री चांगली झोप लागेल, अशी टिप्पणी त्यांनी केली.

?feature=share

“महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या जीवाला किती धोका होता, हे त्यांनी कधीतरी आठवावे. उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना संपवण्यापर्यंत मजल नेली होती. अशा बिकट परिस्थितीत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली नसती, तर काय दिवस बघायला मिळाले असते? भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यामुळेच आज महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार स्थापन झाले असून, एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेतृत्व मुख्यमंत्री पदावर आले आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याऐवजी एकजुटीने काम करण्याची गरज असून रामदास कदम यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे,” असा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी दिला.

या वेळी राष्ट्रवादीचे आमदार काशिनाथ दाते, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अनिल मोहिते, बाबासाहेब सानप, रुद्रेश अंबाडे, कैलास गर्जे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनोज जरांगे यांच्या कथित ऑडिओ क्लिपबाबत बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित आवाजाची तपासणी करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आल्यानंतर सरकार निश्चितपणे बोलेल. जरांगे प्रामाणिकपणे काम करत आहेत, याबद्दल कोणाचेही दुमत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी अहवालानंतरच पुढील भूमिका समोर येईल, असे सांगितले.

दरम्यान, मुंबईत कलाकारांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील सुरक्षेचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जनता व कलाकार पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >