Friday, October 30, 2026

Dadar Station Hawkers : दादर रेल्वे स्थानकाला पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा विळखा

स्थायी समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त केल्यानंतरही पोलिस आणि महापालिका प्रशासन ढिम्म

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबईतील फेरीवाल्यांना क्यु आर कोड आधारीत ओळखपत्र देण्यात आल्यानंतर रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसर वगळता पुढे फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु दीडशे मीटरच्या पुढे फेरीचा व्यवसाय करण्यास मान्यता असतानाही दीडशे मीटरच्या आतमध्येच आता मोठ्याप्रमाणात फेरीवाले व्यवसाय करता दिसत आहे. या फेरीवाल्यांनी चक्क दादर रेल्वे स्थानकाला पुन्हा एकदा विळखा घातलेला असून स्थायी समितीच्या बैठकीत आठ दिवसांपूर्वी ही बाब स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही पोलिस आणि महापालिका प्रशासन मात्र ढिम्मच असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने सन २०१४ च्या सर्वेमध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला क्युआर कोड आधारीत ओळखपत्र देण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.पथविक्रेता सर्वेक्षणातून नोंदणीकृत झालेल्या मुंबईतील ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांपैंकी आतापर्यंत ५५ हजार ६७७ पथविक्रेत्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे. उर्वरित संख्या विचारात घेता, पडताळणीमध्ये ३ हजार ९५० अर्जदार हे मयत असल्याचे आढळले आहे. तर ३९हजार ८०८ जण हे एकतर संपर्क होवूनही कार्यालयांमध्ये आलेले नाहीत अथवा त्यांच्याशी संपर्क होवू शकलेला नाही. त्यामुळे ३१ ऑगस्ट रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्थानकांपासून इतर ठिकाणी १०० ते १५० मीटरचा परिसर वगळता अन्य ठिकाणी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली. परंतु दीडशे मीटरच्या पुढे फेरीवाल्यांना परवानगी असतानाच आता रेल्वे स्थानक परिसरात दीडशे मीटर पसिरातच फेरीवाल्यांनी ठाण मांडून स्थानकाला विळखा घातल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात मागील स्थायी समितीच्या बैठकीत परवाना विभागाच्यावतीने मंजुरीसाठी ठेवलेल्या एका प्रस्तावाच्या अनुषंगाने स्थानिक नगरसेवक आणि मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी दादर रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा पडला असून तिथे महापालिका आणि पोलिसांकडून कारवाई होत नाही. स्थानक परिसरात बाहेरचे फेरीवाले आहेत. ते स्थानिक नाहीत. आणि त्यांनाच पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी व्यवसाय करण्यास संरक्षण देत आहे. मात्र, जिथे महापालिकेने स्थानकापासून दीडशेमीटरच्या पुढे व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे, तिथे मात्र पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी कारवाई करत आहे. जे स्थानिक मराठी फेरीवाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करावी. रेल्वे स्थानक परिसर हा फेरीवाला मुक्त असायला हवा, पण तिथे नागरिकांना त्रास होत असतानाही कानाडोळा करायचा आणि जिथे नागरिकांना त्रास होत नसतानाही दीडशे मीटरच्या पुढील बाजुस कारवाईची मोहिम रावबण्याचे महापालिका आणि पोलिस प्रशासनाचे नेमके धोरण काय असाही सवाल केला होता. मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही रेल्वे स्थानकाला बसलेला फेरीवाल्यांचा विळखा काही सुटलेला नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >