Thursday, November 26, 2026

प्रफुल्ल पटेल यांनी घेतली शरद पवार यांची रुग्णालयात भेट

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रवासातील दगदग आणि डी-हायड्रेशनच्या त्रासामुळे गुरुवारी दुपारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय हालचालींकडे लक्ष वेधले गेले आहे. पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. शरद पवार यांना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आले. सुरुवातीला ते नियमित तपासणीसाठी आल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रवासामुळे झालेल्या दगदगीमुळे त्यांना डी-हायड्रेशनचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजताच सुप्रिया सुळे बैठक सोडून तातडीने रुग्णालयात गेल्या. मात्र, रोहित पवार बैठकीतच राहिले. ते रुग्णालयात गेले नसल्याने त्याबाबतही चर्चा सुरू झाली.
सुप्रिया सुळे रुग्णालयात पोहोचल्यानंतर काही वेळाने प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पवार, सुळे आणि पटेल यांची रुग्णालयातील भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली. या पार्श्वभूमीवर शरद पवार काही वेगळा राजकीय निर्णय घेणार का, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी शरद पवार रुग्णालयात दाखल झाले होते, त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दुसऱ्या दिवशी त्यांची भेट घेतली होती. त्या वेळीही राजकीय चर्चांना सुरुवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तुम्ही पक्षाची काळजी न करता आराम करावा, मी आणि सुप्रिया मिळून देश सांभाळतो, असे मोदी यांनी सांगितल्याचा उल्लेखही चर्चेत आला होता.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >