श्रीकृष्णार्पणमस्तु

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे


भगवान श्रीकृष्णांनी
भगवद्गीतेत सांगितले आहे,
दैवी ह्येषा गुणमयी
मम माया दुरत्यया।
मामेव ये प्रपद्यन्ते
मायामेतां तरन्ति ते”।


अर्थ : “तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे; परंतु जे मला शरण येतात, ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात.”


भगवंत म्हणतात की, त्यांना शरण गेल्यास आपण मायेच्या सर्व बाधांना पार करू शकू. नियमांचे पालन, गुरूंचा आश्रय आणि भक्तिमय साधना यांच्याद्वारे शास्त्रीय पद्धतीने हे लक्ष्य प्राप्त कसे करावे हे भगवद्गीतेतून त्यांनी आपल्याला सांगितले आहे. असे असताना एकीकडे मात्र भगवान श्रीकृष्ण मायेला आपली परीक्षा घ्यायला सांगतात. आपण कृष्णभक्तीमध्ये किती दृढपणे लीन आहोत हे पाहायला माया मनुष्याला आपल्या जाळ्यात ओढते. माया श्रीकृष्णांची दासी असल्याने ती अयोग्य व्यक्तीला श्रीकृष्णांकडे पाठवत नाही. कृष्णभक्तीच्या मार्गावर आपण खरोखरच गंभीर आहोत की नाही, याची परीक्षा घेण्यासाठी ती आपल्यावर विविध प्रलोभने किंवा संकटे टाकते. श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कार्यानुसार ती न केवळ प्राणीजनांना श्रीकृष्णांचा आश्रय घेण्यासाठी प्रेरीत करते, तर श्रीकृष्णांचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या साधकांचा संकल्प ती आणखी दृढ करते. एका दृष्टीने या कार्यात माया आणि श्रीकृष्ण दोघे एकत्र येऊन काम करतात; परंतु या परीक्षेत विजयी होण्यासाठी श्रीकृष्णांना शरण जाणे हे एकच सुत्र सगळ्यात सोपे आहे. असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे.


भागवतात गजेंद्र नावाच्या हत्तीची एक कथा सांगितली आहे. भागवतात सांगितलेल्या कथांपासून आपण बरच काही शिकू शकतो आणि प्राप्त करू शकतो, ज्या आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी लाभदायक ठरू शकतात. गजेंद्राची कथा देखील अशीच आहे. या कथेतून खूप काही शिकायला मिळते.


स्वर्गलोकामध्ये एकदा एका मगरीने गजेंद्र नावाच्या हत्तींच्या राजाला आपल्या शक्तिशाली जबड्यांमध्ये पकडले. हत्ती आपल्या अनेक पत्नींसमवेत सरोवरात जलक्रीडा करीत असता पाण्यातील महाकाय मगरीने त्याचा पाय पकडला. गजेंद्राने मगरीच्या पकडीतून आपल्याला सोडवण्याचा बराच प्रयत्न केला; परंतु तो स्वतःला सोडवू शकला नाही. या संघर्षामध्ये गजेंद्राच्या पत्नी आणि मुलांनी त्याची मदत करण्याचा बराच प्रयत्न केला; परंतु मगरीची पकड काही सैल पडली नाही. शेवटी हार मानून गजेंद्राचा परिवार त्याला तसेच सोडून तिथून निघून गेला.


मगरीशी संघर्ष करताना पीडित गजेंद्राला समजून चुकले की आता केवळ भगवंतांची शरणागतीच त्याचे रक्षण करू शकते. त्याने कातर स्वरात भगवंतांना हाक मारली आणि त्याने वचन दिले की, उर्वरित जीवन तो केवळ भगवंतांच्या सेवेतच समर्पित करेल. त्याला समजून चुकले की, या संकटकाळी दुसरे कोणीच त्याची मदत करू शकत नाही. जशी त्याने आर्तभावाने प्रार्थना केली, तत्क्षणी भगवान विष्णू आपल्या गरुड वाहनावरून तेथे प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या दैदीप्यमान सुदर्शन चक्राद्वारे मगरीचे शीर धडावेगळे केले. अशाप्रकारे गजेंद्र मुक्त झाला आणि त्याला भगवंतांचा सेवक बनण्याचे सर्वोच्च पद प्राप्त झाले.


भौतिक सुखाचे जीवन जगताना आपण या जगातील खऱ्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ आहोत. आपल्यापैकी काहीच लोक आध्यात्मिक मार्गाप्रती आकर्षित होतात आणि ते निष्ठापूर्वक साधनेचे पालन करू लागतात; परंतु तरीही मगरीप्रमाणे आपले मन या भौतिक जगातील सरोवरामध्ये आपल्याला आत खेचत राहते. आपण भौतिक जीवनाच्या क्लेशांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र असे करण्यात असहाय्य ठरतो. अर्थात ‘संघर्षाच्या’ या अवस्थेत आपण मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. भक्तीमध्ये येण्यापूर्वी आपले मन स्वैराचारी असते, मात्र भक्तीमध्ये आल्यावर आपण त्याला लगाम घालू इच्छितो.


गजेंद्राला जेव्हा समजले की आपल्या प्रयत्नांनी तो या संकटातून बाहेर पडू शकत नाही, तेव्हा त्याने संघर्ष करणे सोडले आणि भगवंतांचा आश्रय घेतला आणि स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित केले. आपण कितीही ठरवले तरीही पूर्णपणे भगवंताला समर्पित होऊ शकत नाही याचे कारण म्हणजे आपण करीत असलेली अनुष्ठाने, पूजा इत्यादींमुळे आपण भ्रमात राहतो की, याद्वारे आपण भगवंतांना शरण‌ गेलो आहोत; परंतु आपण कितीही पूजा पाठ केले किंवा कितीही तीर्थस्थाने फिरलो तरी आपण पूर्णपणे भगवंताला समर्पित होऊ शकत नाही. कारण ज्या आर्तभावाने नि:सहाय्य गजेंद्राने श्रीकृष्णांना हाक मारली होती. त्या आर्तभावाने जोपर्यंत आपण भगवंताला आळवत नाही तोपर्यंत भगवंत आपल्यासाठी धावून येणार नाही. आपणास सरतेशेवटी समर्पण हे करावेच लागणार, मग ते मनाप्रती असो वा भगवंतांप्रती. आपण मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला वाटते की, हे कार्य तर आपण सहज करू शकू; परंतु माया शक्तीसमोर आपली नियंत्रण शक्ती तुच्छ असल्याचा अनुभव होतो. कारण माया शक्तीला पराजित करण्याचे सामर्थ्य केवळ भगवंतामध्येच आहे. गजेंद्राला देखील या गोष्टीचा साक्षात्कार झाला आणि त्याने स्वतःला श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित केले म्हणूनच तो इतका महान बनला की त्याचे वर्णन श्रीमद्भागवतात करण्यात आले. गजेंद्र आणि मगरीच्या या कथेतून हीच शिकवण मिळते की भौतिक, ऐहिक व इंद्रिय सुखासाठी संघर्ष करून थकल्यावर आपण सरतेशेवटी भगवंतांना शरण जातो.


आपल्या संघर्षमय, आव्हानात्मक तसेच दु:खपूर्ण दिवसांमध्ये जेव्हा आपण एकटेच असतो, तेव्हा आपल्या हृदयातील भगवान श्रीकृष्ण आपल्या आर्त हाकेची वाट पाहत असतात. श्रीकृष्णांप्रती प्रेम आणि समर्पणाच्या भावनेत ढळलेला एक अश्रूचा थेंब देखील व्यर्थ जात नाही. श्रीकृष्णांना शरण जाताच ते त्वरित आपल्याला सर्व प्रकारच्या दु:खांतून कायमस्वरूपी मुक्त करतात. ते केवळ आपल्या समर्पण भावाची वाट पाहत असतात. ज्यावेळी आपल्या हृदयात समर्पण भाव जागृत होतो त्यावेळेपासून ते सदैव आपल्यासोबत असतात.


!! ओम् नमो भगवते वासुदेवाय!!

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये