मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाला अटक, ५२ कोटी रुपयांचे कोकेन जप्त
June 4, 2025 04:17 PM
मुंबई : एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीकडून एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी ५२ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले. नैरोबीच्या एका हँडलरने ड्रग्जची तस्करी करण्यासाठी १५०० अमेरिकन डॉलर दिल्याची कबुली अटक केलेल्या व्यक्तीने दिली.
नेरोबी येथून आलेल्या केनेडी चेगे या केनियाच्या नागरिकाला एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. केनेडी चेगेकडून ५२ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. कंबरेचा पट्टा आणि काफ सपोर्टर यात लपवलेल्या पाकिटांमधून केनेडी चेगेने कोकेनची तस्करी केली होती. एअर इंटेलिजन्स युनिटने केनेडी चेगेच्या सामानातून ५१९४ ग्रॅम कोकेन जप्त केले. या जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५१.९४ कोटी रुपये एवढी आहे. जप्तीनंतर केनेडी चेगे विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.