Mumbai rain मुंबई शहर जिल्ह्यात १४२ मिमी पाऊस, मुंबई - पुण्यासाठी २४ तास धोक्याचे....
June 19, 2025 03:20 PM
मुंबई : भारतीय हवामान विभागाने नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात आज गुरुवारी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करुन रेट अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रायगड, नाशिक, सातारा, जिल्ह्यातील घाट क्षेत्रातील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्राला पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, पालघर, ठाणे, आणि सिंधुदुर्गात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.
https://x.com/RMC_Mumbai/status/1935601037219619317
विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्राला पुढील चार दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे. राज्यातील उर्वरित भागात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच मुंबई - पुणे जिल्ह्यात पुढील २४ तासात पावसाचा जोर वाढण्याची हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे.
गेल्या २४ तासात मुंबई शहर जिल्ह्यात १४२ मिमी पाऊस
राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.