WhatsApp Business AI : व्हॉट्सअॅपने भारतात सुरू केली ‘बिझनेस एआय’ सेवा

- छोट्या व्यवसायांना मिळणार २४ तास ग्राहक सेवा देण्याची ताकद


मुंबई : व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं आता भारतातील लहान आणि मध्यम उद्योगांसाठी मोठी घोषणा केली आहे. मेटा समर्थित व्हॉट्सअॅपने भारतात ‘बिझनेस एआय’ ही नवी सुविधा सुरू केली असून, ती आता व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेमुळे छोट्या आणि मध्यम उद्योगांना दिवसाचे चोवीस तास ग्राहकांशी संवाद साधणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी वेगळी साधनं किंवा अतिरिक्त प्लॅटफॉर्मची गरज भासणार नाही.


‘बिझनेस एआय’ ही सुविधा व्यवसायांच्या गरजेनुसार सानुकूलित करता येणार आहे. व्यवसाय मालक आपल्या कंपनीची माहिती, उत्पादनांची यादी, सेवा, किंमती, सवलती, शिपिंगसंबंधित माहिती आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न एआयमध्ये समाविष्ट करू शकतात. त्यानंतर ग्राहकांकडून येणाऱ्या प्रश्नांना ही प्रणाली स्वयंचलितपणे उत्तर देणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्वरित प्रतिसाद मिळेल आणि व्यवसायांवरील कामाचा ताण कमी होईल.



या सुविधेचा मुख्य उद्देश व्यवसायांना अधिक ग्राहक मिळवून देणे, नवीन लीड्स गोळा करणे, अपॉइंटमेंट बुकिंग सुलभ करणे आणि विक्री वाढवणे हा आहे. विशेष म्हणजे, भारतातील विविध स्थानिक भाषांमध्ये संवाद साधण्याची क्षमता या एआयमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत माहिती मिळणार आहे. भविष्यात चॅटदरम्यान थेट यूपीआय पेमेंट्सची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.


या नव्या सुविधेमध्ये व्यवसाय मालकांना पूर्ण नियंत्रण देण्यात आले आहे. एआय ग्राहकांशी संवाद साधत असताना व्यवसाय मालक कधीही त्या संभाषणात सहभागी होऊ शकतील. तसेच आवश्यक असल्यास ही सुविधा बंद किंवा बदलण्याचाही पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे मानवी हस्तक्षेप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


मेटा इंडियाचे डायरेक्टर बिझनेस मेसेजिंग रवी गर्ग यांनी सांगितले की, “लहान व्यवसाय हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे कणा आहेत. मात्र मर्यादित मनुष्यबळ आणि संसाधनांमुळे मोठ्या प्रमाणातील ग्राहकांच्या चौकशी हाताळणे त्यांच्यासाठी कठीण ठरते. ‘बिझनेस एआय’द्वारे आम्ही ही तांत्रिक शक्ती थेट छोट्या व्यवसायांच्या हाती देत आहोत.”



व्हॉट्सअॅपनं जाहीर केलेल्या एका अभ्यासानुसार, भारतातील तब्बल ९१ टक्के ऑनलाइन प्रौढ नागरिक दर आठवड्याला किमान एका व्यवसायाशी चॅटद्वारे संपर्क साधतात. यामुळे ग्राहक सेवा आणि ऑनलाइन व्यवसाय व्यवहारांमध्ये मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


ही सुविधा सुरू करण्यासाठी व्यवसाय मालकांना व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपमधील ‘टूल्स’ विभागात जाऊन ‘युअर बिझनेस एआय’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार माहिती भरून एआयला प्रशिक्षण देता येणार आहे. व्यवसाय प्रोफाइल, उत्पादन कॅटलॉग आणि विविध दस्तऐवजांच्या मदतीने एआय अधिक सक्षम बनवता येईल.


येत्या काही आठवड्यांत भारतातील सर्व पात्र व्यवसायांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे देशातील कोट्यवधी छोट्या व्यवसायांना अधिक स्पर्धात्मक, आधुनिक आणि कार्यक्षम बनण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण