- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती
मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या सोमवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. एसआयआर मोहिमेपूर्वी राज्यात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. मात्र, गणना प्रपत्र प्राप्त न झाल्यामुळे किंवा विहित कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे यातील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७, म्हणजेच सुमारे २१.१४ टक्के मतदारांची नावे सध्याच्या प्रारूप यादीतून बाजूला ठेवण्यात आली आहेत. परिणामी, आता प्रारूप यादीत ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदार समाविष्ट असून, यामध्ये ३ कोटी ९५ लाख ८९ हजार ९०५ पुरुष, ३ कोटी ७५ लाख ७२ हजार ५७० महिला आणि ३ हजार ८७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. (Maharashtra SIR Voter List)
जुन्या मतदार यादीतील तब्बल दोन कोटींहून अधिक मतदारांचा समावेश प्रारूप यादीत न होण्यामागे प्रामुख्याने काही महत्त्वाची कारणे समोर आली आहेत. मतदार यादीतील निवासाच्या ठिकाणी संबंधित मतदार गैरहजर असणे किंवा न सापडणे, त्या ठिकाणावरून अन्यत्र स्थायी वा तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेले असणे, मतदाराचे निधन झालेले असणे, इतरत्र नवीन ठिकाणी नाव नोंदणी झालेली असणे किंवा दुबार नोंद असणे, तसेच काही मतदारांनी किंवा कुटुंबियांनी गणना प्रपत्र भरून देण्यास नकार देणे या कारणांमुळे नावे वगळण्यात आली आहेत. (Maharashtra SIR Voter List)
- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई : राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेत ...
प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप मतदार याद्या निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या पात्र नागरिकांची नावे यादीत समाविष्ट नाहीत किंवा जे नवमतदार १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करत आहेत, त्यांना आपले नाव नोंदवण्यासाठी प्रपत्र-६ याद्वारे अर्ज करता येईल. तसेच याद्यांच्या अनुषंगाने आक्षेप घेण्यासाठी प्रपत्र-७ आणि माहितीत सुधारणा करण्यासाठी प्रपत्र-८ वापरता येणार आहे. नागरिकांना ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आपले दावे व हरकती दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत राज्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या प्रक्रियेपूर्वी राज्यात एकूण १ लाख २५३ मतदान केंद्रे होती. पुनरिक्षणादरम्यान ३९४ नवीन मतदान केंद्रांची भर पडली असून, मतदारांची संख्या कमी झाल्यामुळे ४३१ केंद्रे कमी करण्यात आली आहेत. यामुळे आता राज्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या १ लाख २१६ इतकी झाली आहे. याशिवाय, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील तात्पुरत्या स्वरूपातील तब्बल १ हजार ४०३ मतदान केंद्रे पक्क्या इमारती व कायमस्वरूपी जागी स्थलांतरित करण्यात आली आहेत. दावे व हरकतींच्या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सर्व २८८ मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. (Maharashtra SIR Voter List)
मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३" अंतर्गत विशेष बाब म्हणून एक ...
सर्वाधिक आणि सर्वात कमी मतदार असलेले जिल्हे
प्रारूप मतदार याद्यांनुसार राज्यातील सर्वाधिक मतदार असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुणे (६२,१३,६९२ मतदार), मुंबई उपनगर (५१,७१,८०९ मतदार) आणि ठाणे (४५,९१,१३८ मतदार) यांचा समावेश आहे. दुसरीकडे, सर्वात कमी मतदार असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग (६,०५,५०१ मतदार), गडचिरोली (७,३८,३०१ मतदार) आणि वाशीम (८,८५,२६९ मतदार) यांचा समावेश होतो. (Maharashtra SIR Voter List)
लिंगनिहाय मतदार रचना
राज्यभरात प्रसिद्ध झालेल्या ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ एकूण मतदारांमध्ये ३ कोटी ९५ लाख ८९ हजार ९०५ पुरुष, ३ कोटी ७५ लाख ७२ हजार ५७० महिला आणि ३ हजार ८७ तृतीयपंथी मतदार समाविष्ट आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक (२७२) तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी (०) तृतीयपंथी मतदार नोंदवला गेला आहे. (Maharashtra SIR Voter List)
पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत झालेल्या वादानंतर ...
कोणत्या जिल्ह्यात किती मतदार वगळले?
ज्या जिल्ह्यांमध्ये गणना प्रपत्र न मिळाल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे सर्वाधिक मतदारांची नावे प्रारूप यादीत येऊ शकली नाहीत, त्यात ठाणे (२८,५९,३७७), पुणे (२८,६६,४८१) आणि मुंबई उपनगर (२६,५८,२०२) हे जिल्हे आघाडीवर आहेत. याउलट, सिंधुदुर्ग (८२,५१३), हिंगोली (८५,३०९) आणि गडचिरोली (९०,६०३) या जिल्ह्यांमध्ये वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या सर्वात कमी आहे. (Maharashtra SIR Voter List)