मुंबई : देशभरात सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला अनेकांनी हा प्रकार केवळ विनोद किंवा सोशल मीडिया ट्रेंड म्हणून घेतला होता. मात्र अवघ्या काही दिवसांतच या सोशल मीडिया पेजने प्रचंड लोकप्रियता मिळवत देशभरातील तरुणांचे लक्ष वेधून घेतले. केवळ ५ दिवसांत या पेजने इन्स्टाग्रामवर तब्बल १०० लाख म्हणजेच १० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे फॉलोअर्सच्या बाबतीत या पेजने भाजपच्या पोजला मागे टाकले असून, काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटलाही मागे टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram
या चर्चेची सुरुवात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यापासून झाली. काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात. काही लोक कायदा, माध्यमं आणि आरटीआयसारख्या व्यवस्थांमध्ये झुरळांप्रमाणे घुसखोरी करतात, असे विधान त्यांनी केले होते. नंतर त्यांनी हे वक्तव्य सर्वसामान्य बेरोजगार तरुणांसाठी नसून बनावट पदव्या आणि चुकीच्या मार्गांचा वापर करणाऱ्यांसाठी असल्याचे स्पष्ट केले. मात्र या विधानानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या.
याच पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे नाव चर्चेत आले. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असलेल्या अभिजीत दीपके या मराठी तरुणाने अमेरिकेतील बोस्टनमध्ये बसून ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने वेबसाईट, इंस्टाग्राम (Instagram) पेज आणि एक्स (X) अकाउंट सुरू केले. पाहता पाहता या पेजने सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली आणि तरुणांमध्ये चर्चेचा विषय बनला.






