Monday, August 31, 2026

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांमधील तणावाला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असला, तरी युद्धाबाबत अद्यापही कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. यामुळे पश्चिम आशियात युद्धाचे काळे ढग कायम असून, विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक व्यापाराला मोठे अडथळे निर्माण होत आहेत. या जागतिक घडामोडींचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. (PM Narendra Modi)

पश्चिम आशियातील या तणावपूर्ण वातावरणात आणि अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची 'एससीओ' शिखर परिषदेदरम्यान प्रत्यक्ष भेट झाली आहे. या उच्चस्तरीय भेटीमुळे संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले होते. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे पार पडलेल्या या परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत पश्चिम आशियातील बिघडलेली परिस्थिती, होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारातील अडथळे आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी हे दोन्ही नेते २०२४ च्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान रशियातील कझान येथे भेटले होते, तसेच मार्च महिन्यात अमेरिका-इराण संघर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींनी दूरध्वनीवरून पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला होता. (PM Narendra Modi)

इराणच्या अध्यक्षांसोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची बिश्केक येथे भेट घेतली. विविध क्षेत्रांमध्ये इराणबरोबरची भारताची दीर्घकालीन मैत्री अधिक दृढ करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचा मी पुनरुच्चार केला आहे. आगामी काळात आम्हाला आमच्या द्विपक्षीय व्यापाराची व्याप्ती वाढवायची आहे आणि त्यात विविधता आणायची आहे. या बैठकीत आम्ही या क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. तसेच, या भागात शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारत आपला पाठिंबा सतत देत राहील.”

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. त्या संभाषणादरम्यान पेझेश्कियान यांनी पश्चिम आशियातील बदलती परिस्थिती आणि पुढील वाटचालीबाबत मोदींना सविस्तर माहिती दिली होती. यावर प्रतिक्रिया देताना, सर्व वाद आणि मतभेद केवळ परस्पर संवाद आणि राजनैतिक (डिप्लोमॅटिक) चर्चेच्या माध्यमातूनच सुटले पाहिजेत, या भारताच्या भूमिकेचा पंतप्रधान मोदींनी ठळकपणे पुनरुच्चार केला होता. (PM Narendra Modi)

पश्चिम आशियाई क्षेत्रात दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच, आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील दळणवळणाचे स्वातंत्र्य अबाधित राखणे आणि जागतिक व्यापाराची सुरक्षितता सुनिश्चित करणे या मुद्द्यांवरही पंतप्रधान मोदींनी विशेष भर दिला होता. या ताज्या भेटीमुळे भारत आणि इराणमधील संबंधांना आगामी काळात नवे आयाम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (PM Narendra Modi)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा