Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण
June 10, 2026 06:49 PM
panvel to karjat corridor
MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) सुमारे २,७८२ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच या मार्गावर रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प-३ अंतर्गत विकसित करण्यात येणारा हा २९.६ किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वेमार्ग नवी मुंबई, रायगड आणि कर्जत परिसरातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करणार आहे. तसेच कल्याण मार्गावरील वाढत्या रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासही मदत होणार आहे.
एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी आवश्यक असलेले संपूर्ण जमीन संपादन पूर्ण झाले असून वन विभागासह विविध शासकीय यंत्रणांकडून आवश्यक मंजुरीही प्राप्त झाल्या आहेत. प्रकल्पातील बहुतांश नागरी कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.या कॉरिडॉरमध्ये ९ मोठे पूल, ३५ लहान पूल, १६ अंडरब्रिज, ५ उड्डाणपूल आणि ३ बोगदे उभारण्यात आले आहेत. तसेच कर्जत रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून पनवेल रेल्वे उड्डाणपूल अंतिम टप्प्यात आहे. मोहपे आणि किरावली येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
ट्रॅक जोडणी आणि सिग्नलिंगची कामे अंतिम टप्प्यात
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मार्गावरील ट्रॅक जोडणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सिग्नलिंग आणि दूरसंचार यंत्रणांची उभारणीही वेगाने सुरू असून मोहपे आणि चौक स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या ‘फॅक्टरी ॲक्सेप्टन्स टेस्ट’ यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
प्रवाशांना मिळणार थेट आणि पर्यायी रेल्वे मार्ग
हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर पनवेल आणि कर्जतदरम्यान स्वतंत्र उपनगरी रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कल्याण जंक्शनमार्गे वळसा घालण्याची गरज भासणार नाही. प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच रेल्वेची वहनक्षमता वाढेल आणि उपनगरी रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत होईल.
निवासी आणि औद्योगिक विकासाला गती
नवी मुंबई, कर्जत आणि परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या निवासी तसेच औद्योगिक प्रकल्पांसाठी हा रेल्वे मार्ग मोठा आधार ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना पूरक ठरत हा कॉरिडॉर प्रादेशिक संपर्क अधिक मजबूत करण्याची महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असून, मुंबई महानगर प्रदेशाच्या वाहतूक व्यवस्थेत हा प्रकल्प नवी क्रांती घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.