Tuesday, September 1, 2026

Alien Temple : देशातील पहिलं अनोखं मंदिर पाहिलंत का ?

Alien Temple : देशातील पहिलं अनोखं मंदिर पाहिलंत का ?

आपल्या भारत देशात विविध वैशिष्ट्ये आणि आख्यायिका असणारी हजारो मंदिरे आहेत. परंतु, तामिळनाडूमधील एका मंदिराने सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. तामिळनाडूतील सालेम जवळील मल्लामुपमपट्टी या गावात एक अत्यंत अनोखे मंदिर उभारण्यात आले आहे, जे 'एलियन मंदिर' म्हणून ओळखले जाते. पारंपारिक मंदिरांपेक्षा हे मंदिर पूर्णपणे वेगळे असून, यात अध्यात्म, प्राचीन धार्मिक मान्यता आणि आधुनिक युगातील एलियन्सबद्दलची उत्सुकता यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.

कोणी अन् का उभारले हे अनोखे मंदिर ?

या मंदिराची स्थापना स्थानिक आध्यात्मिक मार्गदर्शक लोगानाथन (ज्यांना 'सिद्धर बाकिया' म्हणूनही ओळखले जाते) यांनी केली आहे. त्यांच्या मते, परग्रहावर राहणारे जीव (एलियन्स) हे मानवापेक्षा अत्यंत प्रगत आणि उच्च पातळीवरील विचारसरणीचे आहेत. ते मानवजातीला शांतता, बंधुभाव आणि समृद्धीचा मार्ग दाखवू शकतात. या विश्वात केवळ पृथ्वीवरच नाही, तर इतर ग्रहांवरही जीवसृष्टी अस्तित्वात आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीव एकमेकांशी जोडलेले आहेत, हा संदेश देण्यासाठी त्यांनी हे मंदिर उभारले आहे.

जमिनीखाली ११ फूट खोल तळघरात 'एलियन देवा'ची स्थापना

या मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे स्थापन केलेली एलियनची मूर्ती. सर्वसाधारणपणे आपण सिनेमात किंवा चित्रात जसे एलियन पाहतो — मोठी लांबट मान आणि मोठे काळे डोळे तशीच हुबेहूब मूर्ती येथे घडवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मुख्य मूर्ती मंदिराच्या मध्यभागी जमिनीखाली तब्बल ११ फूट खोल असलेल्या एका तळघर स्वरूपाच्या गर्भगृहात ठेवण्यात आली आहे.

भगवान शिव आणि एलियन्सचा संबंध ?

मंदिराच्या संस्थापकांचा असा दावा आहे की, प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये उल्लेख असलेले 'विमान', आकाशात उडणारे रथ आणि अफाट ज्ञान हे खरं तर परग्रहावरील जिवांच्या अस्तित्वाचेच संकेत आहेत. एवढेच नाही तर, भगवान शिवाने सर्वात आधी निर्माण केलेल्या सृष्टीत हे एलियन्स समाविष्ट होते आणि त्यांच्याकडे अफाट शक्ती आहे, असाही त्यांचा दावा आहे. अर्थात, या सर्व गोष्टी त्यांच्या वैयक्तिक आध्यात्मिक मान्यतेवर आधारित असून, विज्ञानाने या दाव्यांना अजून तरी कोणताही वैज्ञानिक आधार दिलेला नाही.

हिंदू देवी-देवता आणि एलियनचा अनोखा संगम

या मंदिरात केवळ एलियनचीच पूजा केली जात नाही, तर भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील प्रमुख देवी-देवतांच्या मूर्तीही येथे तितक्याच आदराने स्थापन करण्यात आल्या आहेत. या तळघर संकुलात भगवान शिव, माता पार्वती, भगवान मुरुगन, माता काली आणि वाराही अम्मान यांच्या पारंपरिक मूर्ती आहेत. प्राचीन भारतीय परंपरा आणि परग्रहावरील विश्वाचा विचार या दोन्ही गोष्टी एकाच छताखाली नांदू शकतात, हे दाखवण्याचा एक प्रयत्न या मंदिरातून करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >