Tuesday, September 1, 2026

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण

भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव

पुढील पाच वर्षांत मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महायुती महापालिकेमध्ये सत्तेवर आल्यावर २०० दिवस पूर्ण झाले आहेत. पण २०० दिवसांत जर व्यवस्थेची दिशा बदलण्यास सुरुवात झाली असून तर पुढील ५ वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता या बदलामध्ये नक्कीच आहे,असा विश्वास मुंबई भाजपच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या २५ वर्षांचा बॅकलॉग एका दिवसात भरून निघणार नाही. पण तो भरून काढण्यासाठी पारदर्शकता, तंत्रज्ञान, तज्ज्ञांचा अभ्यास, आर्थिक शिस्त आणि जनसहभाग या पाच गोष्टींच्या आधारावर सुरुवात झाली आहे,असे भाजपने मंगळवारी पार पडलेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत स्पष्ट केले.

मुंबई भाजपच्यावतीने आयोजित कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये राजकीय प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या कार्यकारीणीच्या बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपनगराचे पालकमंत्री व सांस्कृतिक मंत्री ऍड आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे यांच्यासह पक्षाच्या कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये परिवर्तन हा जीवनाचा गाभा आहे. जगात जर शाश्वत काही आहे तर तो बदल आहे. आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांतील बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जो बदल घडवून आणतो तोच आयुष्यात पुढे जातो. हा नियम जसा व्यक्तीला लागू आहे तसाच तो समाजव्यवस्था आणि प्रशासनालाही लागू आहे. मात्र परिवर्तन केवळ बदलासाठी नसावे; ते जनसेवेसाठी, जनकल्याणासाठी आणि मुंबईकरांच्या गरजा ओळखून केले पाहिजे.

भविष्यातील प्रगत मुंबईसाठी वर्तमानातील चुकीच्या धारणा आणि जुन्या कार्यपद्धती बदलाव्या लागतील, हे लक्षात घेऊन महायुतीने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम जी यांच्या प्रयत्नातून, मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध महत्त्वाचे उपक्रम आणि सुधारणा राबवण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या २५ वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचे व अव्यवस्थेचे अनेक आरोप आणि प्रश्न सातत्याने उपस्थित होत आले आहेत. मुंबईकरांच्या पैशाचा योग्य वापर झाला का? २५ वर्षे सतत सत्ता देऊन सुद्धा हेच जुने प्रश्न मुंबईकरांसमोर आजही आ वासून उभे आहेत. सन २०१४ ला केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जसे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर, शासन व्यवस्थेतील दलालांची हकालपट्टी, तंत्रज्ञानाचा नेमका आणि प्रभावी वापर, शासकीय योजना राबविण्यात समाजातील बुद्धीजीवी वर्गाची सहभागिता व जनसामान्यांचा सहयोग, चाकोरीबाहेर जाऊन कार्य करण्याचा मानस याच तत्वांचा धागा पकडून मुंबई महानगरपालिकेतही विकासाभिमुख व पारदर्शक कारभार करण्यास महायुतीने सुरुवात केली आहे.

स्टँडींग कमिटी ही अँडस्टँडींग कमिटी अशी जुनी धारणा मोडीत काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत वर्षानुवर्षे चालत आलेल्या तथाकथित 'अंडरस्टँडिंग सिस्टीम'ला आळा घालावा व 'अंडर द टेबल' प्रकारांना स्थान नसावे, या भूमिकेतून कारभारात पारदर्शकता आणण्याचे धाडसी पाऊल उचलण्यात आले आहे. पूर्वी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचीही अशी धारणा झाली होती की, महानगरपालिकेचा कारभार अशाच पद्धतीने चालविला जात असतो हीच मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे भाजपने या राजकीय प्रस्तावात म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारनेही सत्तेत आल्यानंतर अनेक उपक्रमांमध्ये मुंबईला प्राधान्य दिलेले आहे. कोस्टल रोड, गोरेगाव- मुलुंड लिंक रोड व बोगदे, बोरीवली ठाणे जोड प्रकल्प, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड ते सायन पनवेल महामार्ग फ्लायओव्हर आर्म्स, पश्चिम द्रुतगती मार्गावरील रेल्वे उड्‌डाणपूल रुंदीकरण, वांद्रे-वर्सोवा लिंक, कोस्टल रोड विस्तारीकरण, बीडीडी चाळ पुनर्निर्माण अशा अनेक माध्यमातून महाराष्ट्र सरकार मुंबईच्या विकासाला चालना देत आहे, त्याबद्दलही धन्यवाद मानले आहे.

गेल्या काही महिन्यापासून मुंबईमध्ये विरोधी पक्षाकडून महापालिकेच्या चांगल्या योजनांना विरोध होत आहे. कारण त्यांना न जमलेल्या गोष्टी आपण करत असल्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. विरोधकांकडून गारगाई - पिंजाळ प्रकल्प, सव्वा सातशे कोटी रुपये खर्चाचा मेट्रोसाठी बांधण्यात येणारा पूल, दुप्पट पाणीपट्टी आणि मालमत्ता कर भरणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देणारी ओसी देण्याची योजना, फेरीवाल्यांना क्युआर कोड देणारी योजना, रुग्णालयाच्या दर्जोन्नतीसाठी नवजात बालकांसाठी नवीन एनआयसीयू बेड उपलब्ध करून देण्याची योजना अशा कित्येक योजनांना विरोधकांकडून स्वार्थापोटी विरोध केला जात आहे. अशावेळी महापालिकेच्या मागे ताकदीने उभे राहणे व शिवसेना (उबाठा), कॉंग्रेस, राष्ट्रवादी (श.प.गट) यांचा लक्ष्मी दर्शनाचा नॅरेटिव्ह जनतेसमोर आणणं हे आपल्या सर्वांचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले.

राजकारण केवळ सत्तेसाठी नाही, तर मुंबईकरांच्या सेवेसाठी करावयास हवे. अधिकारी तेच असतील, व्यवस्था तीच असेल; पण दृष्टी बदलली की कारभार बदलतो आणि हाच बदल महायुतीने देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार अमीत साटम यांच्या प्रयत्नाने मुंबई महानगरपालिकेत सुरु केलेला आहे. ही केवळ २०० दिवसांची सुरुवात आहे. ही विकसित, स्वच्छ, पारदर्शक, तंत्रज्ञानस्नेही आणि जनहिताची मुंबई विकसित करण्याची नांदी आहे असल्याचे या प्रस्तावात नमुद करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >