नवी दिल्ली : दिखाऊपणा करणाऱ्या राहुल गांधींनी (Rahul Gandhi) विरोधी पक्षनेते म्हणून शिक्षण सुधारणांसाठी एक तरी सूचना केली आहे का ? मी शिक्षणमंत्री या पदावर कार्यरत असताना राहुल गांधींनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मुद्देसूदपणे एकदा तरी ठोस सूचना केली आहे का ? लोकप्रतिनिधीने देशाचा कारभार सुधारण्यासाठी मुद्देसूदपणे आपले म्हणणे मांडणे अपेक्षित आहे. पण राहुल गांधी हे करताना दिसत नाही. ते अनेकदा देशाचा, देशातील लोकशाही व्यवस्थेचा आणि मूल्यांचा तसेच देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याचा अपमान करताना दिसतात, असे भाजपच्या सरचिटणीस स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या.
विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी स्वतःच कायदे पाळत नाहीत. दिल्ली पोलिसांची परवानगी न घेताच त्यांनी शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी देशाच्या राजधानीत आंदोलन केले. पॅलेट गनच्या मुद्यावर ते आंदोलन करत होते. या प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले तरी राहुल आंदोलन करत होते. राहुल गांधींचा वर्दीतल्या अधिकाऱ्यांवर विश्वास का नाही ? असा प्रश्न भाजपच्या सरचिटणीस स्मृती इराणी यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी कधी पोलिसांवर विश्वास ठेवत नाही तर कधी सैन्यावर. ते जाहीरपणे वर्दीतल्यांचा अपमान करतात. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे असल्याचे सांगतात आणि झारखंडमध्ये विद्यार्थ्यांची फिकीर करत नाहीत. कायम सोयीचे राजकारण करतात. दिल्लीत राहुल यांनी ज्यांचे समर्थन केले त्या मंडळींना शिक्षण व्यवस्थेची काळजी आहे तर ही मंडळी काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये आणि काँग्रेसच्या समर्थनाने सत्तेत असलेल्या झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मौन का बाळतात ? कोणीही कधीही शिव्या देणे, आक्षेपार्ह भाषेचा वापर करणे चुकीचे आहे. पण राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष ज्यांचे समर्थन करतो त्यांनी दिल्लीत आंदोलनाच्या नावाखाली आक्षेपार्ह भाषेचा वारंवार वापर केला. पण या मुद्यावर राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष चकार शब्दही बोलत नाही, असे स्मृती इराणी म्हणाल्या.






