मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून पडून 27 वर्षीय एअर-कंडिशनर तंत्रज्ञाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. (Bandra News)
मिळालेल्या माहितीनुसार, झियादुल शमशुजुहा हुडा हे 29 मजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर खिडकीबाहेर आउटडोअर एसी युनिट बसवण्याचे काम करत होते. यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले.
घटनेनंतर हुडा यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सायन रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेल्या हुडा यांच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या.
पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात
या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी निष्काळजीपणाच्या आरोपावरून 30 वर्षीय पर्यवेक्षक इंद्रजित चौहान आणि एसी कंत्राटदार तश्वर अली इब्बारत अली मन्सूरी (28) यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हुडा यांना सेफ्टी हार्नेस देण्यात आला होता, असा दावा पर्यवेक्षक आणि कंत्राटदाराने केला आहे.
मात्र, त्यांनी हार्नेस योग्य पद्धतीने घातला होता का आणि काम सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी करण्यात आली होती का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हुडा यांनी सेफ्टी बेल्ट घातला होता, मात्र हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे.
हुडा यांना कामात मदत करणाऱ्या 21 वर्षीय अतिकुर रहमान मोहम्मद सागीर मन्सूरी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काम सुरू असताना हुडा यांचा अचानक तोल गेला आणि ते खाली कोसळले.
दरम्यान, एका पादचाऱ्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेप्रकरणी सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास खेरवाडी पोलीस करत आहेत. (Mumbai News)