Thursday, September 3, 2026

Pune traffic : पुण्यात दहीहंडी आणि श्रीकृष्ण जयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ४ आणि ५ सप्टेंबरला 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Pune traffic : पुण्यात दहीहंडी आणि श्रीकृष्ण जयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ४ आणि ५ सप्टेंबरला 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Pune : श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्सवादरम्यान मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये तुफान गर्दी होत असल्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. प्रशासनाने ४ आणि ५ सप्टेंबर रोजी शहरातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत मोठे फेरबदल केले असून काही महत्त्वाचे रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावर दहीहंडी फुटेपर्यंत हे विशेष नियम लागू राहतील.

५ सप्टेंबर रोजी फरासखाना व विश्रामबाग विभागातील बदल

दुपारी ४ वाजल्यापासून शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणारी वाहने स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक आणि टिळक चौक मार्गे वळवण्यात आली आहेत. बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौक, टिळक रस्ता आणि अलका टॉकीज चौकाचा वापर करावा. तसेच बुधवार चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक असणार असून, सोन्या मारुती चौक ते सेवासदन चौक दरम्यानचा रस्ता पूर्णपणे बंद राहील.

बंडगार्डन, वानवडी व लष्कर विभागातील नियोजन

  • बंडगार्डन विभाग: सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत तीन तोफा चौक ते ब्लू नाईल चौक (इस्कॉन मंदिर) रस्ता बंद राहणार असून, याऐवजी ब्लू नाईल चौक ते तीन तोफा चौक हा मार्ग दुतर्फा करण्यात आला आहे.

  • वानवडी विभाग: दुपारी ४ वाजल्यापासून शिवरकर रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली जाईल. वाहनचालकांनी संविधान चौकातून डावीकडे वळून साळुंखे विहार रस्त्याचा वापर करावा.

  • लष्कर विभाग: दुपारी ४ पासून गोळीबार मैदान चौकाकडून एमजी रोडकडे येणारी वाहतूक वाय जंक्शन येथे थांबवून खाणे मारुती चौкаकडे वळवली जाईल. बाबाजान चौक, व्होल्गा चौक आणि महावीर चौक परिसरातही पर्यायी मार्ग दिले आहेत.

वारजे आणि इतर विभागांमधील नियम

४ व ५ सप्टेंबर रोजी आंबेडकर चौकाकडून चर्च चौकाकडे जाणारी वाहतूक कर्वे रस्त्याने वारजे जंक्शनकडे वळवण्यात आली आहे. तसेच राजाराम पूल ते आंबेडकर चौक दरम्यानची वाहतूक वनदेवी मार्गे कर्वे रस्त्याने जाईल. समर्थ, काळेपडळ आणि फरासखाना (फडके हौद परिसर) येथे ४ व ५ सप्टेंबरला सायंकाळी ४ पासून गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत बदल असतील.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >