Ahilyanagar News : गरिब आणि गरजू नागरिकांना अवघ्या १० रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणाऱ्या शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) योजनेबाबत अहिल्यानगर येथून मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शासनाचे अनुदान रखडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शिवभोजन केंद्रचालकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने जिल्ह्यातील ३८ शिवभोजन केंद्रांसाठी तब्बल १ कोटी २५ लाख २६ हजार रुपयांचे तीन महिन्यांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रचालकांना मोठा दिलासा मिळणार असून, गरिब आणि गरजू नागरिकांसाठीची १० रुपयांची थाळी पुन्हा सुरळीतपणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ३८ शिवभोजन केंद्रांमधून दररोज सुमारे तीन हजार नागरिकांना भोजनाचा लाभ दिला जातो. मात्र, या केंद्रांना शासनाकडून मिळणारे अनुदान गेल्या मार्च महिन्यापासून रखडले होते. त्यामुळे केंद्रचालकांना रोजचा खर्च भागवताना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता राज्य शासनाने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे अनुदान मंजूर केले आहे. जिल्ह्यासाठी एकूण १ कोटी २५ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, जून, जुलै आणि ऑगस्ट या पुढील तीन महिन्यांचे अनुदान अद्याप मंजूर झालेले नाही. म्हणजेच मार्चपासून जवळपास सहा महिन्यांपासून अनुदान रखडल्याने गरिबांची भूक भागविणाऱ्या शिवभोजन केंद्रचालकांवरच आर्थिक संकट ओढावले होते. केंद्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन, अन्नधान्य, भाजीपाला, तेल, मसाले आणि इतर साहित्याचा खर्च भागवताना केंद्रचालकांना पदरमोड करावी लागत होती. (Ahilyanagar News)
Ahilyanagar : पुण्यातून २४ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला थेट उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार समृद्धी महामार्गावर उघडकीस आला आहे. मात्र, ...
१० रुपयांत मिळते पोटभर जेवण
गरीब आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने २६ जानेवारी २०२० पासून शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत नागरिकांना अवघ्या १० रुपयांत दोन पोळ्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि एक वाटी भात दिला जातो. शिवभोजन केंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. जिल्ह्यात सध्या एकूण ३८ शिवभोजन केंद्र सुरू असून, या केंद्रांमधून दररोज सुमारे तीन हजार नागरिकांना भोजनाचा लाभ मिळत आहे. मात्र, नागरिकांना स्वस्त दरात भोजन देणाऱ्या केंद्रचालकांना स्वतः मात्र वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने केंद्र चालवणे त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरत आहे. (Ahilyanagar News)
ग्रामीण भागासाठी २५, तर शहरासाठी ४० रुपये अनुदान
शिवभोजन थाळी उपलब्ध करून देणाऱ्या केंद्रचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीमागे अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील केंद्रांसाठी प्रति थाळी २५ रुपये, तर शहरी भागातील केंद्रांसाठी प्रति थाळी ४० रुपये अनुदान देण्यात येते. मात्र, मार्च महिन्यापासून देयके रखडल्याने केंद्रचालकांची आर्थिक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे अनुदान थकीत असल्याची माहिती केंद्रचालकांकडून देण्यात आली होती. त्यापैकी आता सव्वा कोटी रुपयांहून अधिक अनुदान मंजूर झाले आहे. या निधीमुळे केंद्रचालकांना रखडलेली देणी भागविण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. तसेच नागरिकांना कमी दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना सुरळीत ठेवण्यासही हातभार लागणार आहे.दरम्यान, राज्य सरकारने तीन महिन्यांचे अनुदान मंजूर केल्याने केंद्रचालकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे प्रलंबित अनुदान कधी मंजूर होणार, याकडे आता केंद्रचालकांचे लक्ष लागले आहे.