Saturday, September 5, 2026

Nashik Breaking News : रामकुंड परिसरात पाच जण बुडाले , एकाची प्रकृती गंभीर

Nashik Breaking News : रामकुंड परिसरात पाच जण बुडाले , एकाची प्रकृती गंभीर

Nashik Breaking News : नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामकुंड परिसरातील चक्रधर स्वामी मंदिराजवळ गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबई येथील पर्यटकांच्या गटातील तब्बल पाच जण पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पर्यटक नाशिकमध्ये फिरण्यासाठी आले होते. यावेळी रामकुंड परिसरात आल्यानंतर काही पर्यटक गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि नदीतील प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाच जण अचानक पाण्यात बुडाले. घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. (Five people drowned in the Ramkund area)

बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल

पर्यटक पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच गंगेवरील जीवरक्षक दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तातडीने पाचारण करण्यात आलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बचाव पथकांनी कोणताही वेळ न दवडता नदीपात्रात शोध आणि बचावकार्य सुरू केलं. जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत पाण्यात बुडालेल्या पर्यटकांचा शोध घेतला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर पाचपैकी चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं.(Nashik News)

एका पर्यटकाची प्रकृती गंभीर

बचावण्यात आलेल्या पर्यटकांपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने पुढील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर पर्यटकांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर रामकुंड परिसरात काही काळ मोठी गर्दी आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनास्थळी नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. (Nashik News)

प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

गोदावरी नदीपात्रात पाण्याची खोली ठिकठिकाणी वेगवेगळी आहे. तसेच काही ठिकाणी पाण्याचा प्रवाहही अधिक असल्याने पर्यटकांनी केवळ उत्साहाच्या भरात नदीपात्रात उतरणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न घेता पर्यटकांनी पाण्यात उतरू नये, असं आवाहन प्रशासन आणि जीवरक्षक दलाकडून करण्यात आलं आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीपात्रातील परिस्थिती अचानक बदलू शकते. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं आणि जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >