Nashik : नाशिक शहरात रस्ते, नाले, मोकळे भूखंड आणि नदीपात्रात अनधिकृतपणे बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात आता महापालिकेने (Nashik Municipal Corporation) कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांकडून तो हटविण्यासाठी महापालिकेला येणाऱ्या खर्चाच्या तब्बल दहापट रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. एवढंच नाही, तर संबंधितांविरोधात थेट फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार आहे. महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी याबाबत स्पष्ट इशारा दिला असून, शहरात घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ (Solid Waste Management Rules, 2016) ची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
रस्ते, नाले आणि नदीपात्रात राडारोडा टाकण्यास बंदी
बांधकाम, दुरुस्ती किंवा पाडकामातून निर्माण होणारा मलबा रस्ते, पदपथ, नाले, मोकळ्या जागा किंवा नदीपात्रात टाकण्यास पूर्णपणे मनाई आहे. महापालिकेच्या अधिकृत यंत्रणेमार्फत राडारोडा उचलून नेण्यासाठी प्रतिटन ८०० रुपये वाहतूक शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, कुणी अनधिकृतपणे राडारोडा टाकताना आढळल्यास तो हटवण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या दहापट रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. त्यामुळे शहरात कुठेही राडारोडा टाकून मोकळं होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
Nashik Mhada Scam : नाशिकमधील बहुचर्चित सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घोटाळ्याच्या चौकशीला आता वेग आला आहे. या प्रकरणाच्या तपासात एकापाठोपाठ एक धक्कादायक ...
कचरा जाळलात तर २५ हजारांचा दंड
फक्त राडारोडाच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आणि कचरा जाळणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. पालापाचोळा, प्लास्टिक किंवा इतर प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर जाळल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. तसंच, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड, तर कचऱ्याचे योग्य पद्धतीने विलगीकरण न केल्यास प्रकारानुसार ३०० ते १५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
चार प्रकारांत कचरा विलगीकरण बंधनकारक
नाशिक शहरातील नागरिक, संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांना कचऱ्याचं योग्य वर्गीकरण करणं आता बंधनकारक असणार आहे. कचऱ्याचं ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष काळजीचा कचरा, अशा चार प्रकारांत विलगीकरण करावं लागणार आहे. मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनाही स्वतंत्र नियमांचं पालन करणं आवश्यक राहणार आहे. शहरातील स्वच्छता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावरही महापालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिकचा तिसऱ्यांदा वापर केल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
Nashik Breaking News : नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामकुंड परिसरातील चक्रधर स्वामी मंदिराजवळ गोदावरी नदीत पोहण्यासाठी ...
शहर स्वच्छ ठेवणं प्रत्येकाची जबाबदारी
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणं ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं आवाहन आयुक्त मनिषा खत्री यांनी केलं आहे. विशेषतः बांधकामाचा राडारोडा उघड्यावर टाकून रस्ते आणि नाले अडविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे नाशिककरांनी कचऱ्याचं योग्य विलगीकरण करावं, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. एकूणच, नाशिक शहरात आता राडारोडा आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडासोबतच फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने नियम मोडणाऱ्यांची चांगलीच अडचण होणार आहे.