Rain Update : सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्ये पावसाने पुन्हा जोर धरला आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार, तर काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने आज, ५ सप्टेंबर रोजी देशातील १७ राज्यांसाठी पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. या काळात काही भागांमध्ये ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि वज्रपात होण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
१७ राज्यांना अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, मेघालय आणि केरळ या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पूर्व भारतातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वज्रपात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी वादळी वातावरणात मोकळ्या शेतात किंवा झाडाखाली थांबू नये, असा सल्लाही देण्यात येत आहे.
डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा इशारा
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील डोंगराळ भागांमध्येही हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी, चंबा, कांगडा, किन्नौर, सिरमौर आणि ऊना या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी ५० ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे डोंगराळ भागात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. उत्तराखंडमधील नैनिताल, पिथौरागड, बागेश्वर, चमोली, डेहराडून आणि रुद्रप्रयाग या भागांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूस्खलन किंवा अचानक पूरस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर (Nepal-Tibet Border) २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे मोठं संकट निर्माण झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीत ...
मुंबई आणि कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढणार ?
महाराष्ट्रासाठीही हवामान विभागाचा अंदाज महत्त्वाचा आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. मुंबईत जुलै महिन्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. अचानक हवामान बदलल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे रस्ते वाहतूक, रेल्वे सेवा आणि दैनंदिन जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवासाचं नियोजन करावं. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील हवामानावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच, सप्टेंबरच्या सुरुवातीलाच देशातील १७ राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करत काळजी घेणं गरजेचं आहे.




