रायगड : पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या तीन पर्यटकांना दिवेआगर समुद्रकिनारी बुडताना स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत जेट स्कीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. आदित्य भिसे (२४), अभिषेक साळवे (२३) आणि भूमी बोऱ्हाडे (२१) हे समुद्रात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात ओढले गेले. मोठ्या लाटांमुळे तिघेही बुडू लागल्याने काही काळ समुद्रकिनारी धावपळ उडाली. पोर्ट केबिन विसर्जन पॉईंटवर कर्तव्यावर असलेले होमगार्ड रेवाळे यांनी पर्यटकांचा मदतीसाठीचा आवाज ऐकताच बचावकार्यासाठी आवाहन केले. त्यानंतर दिवेआगर येथील गोविंदा मिरवणुकीत सहभागी असलेले प्रणय चोगले, विघ्नेश चोगले, योगेश चोगले, विष्णुदास चोगले यांच्यासह इतर ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले. जेट स्कीच्या सहाय्याने त्यांनी समुद्रात उतरून तिन्ही पर्यटकांना बाहेर काढले.
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा उद्या सोमवार दि. 7 सप्टेंबर रोजी इंदौर मध्ये जेन ...
पाण्यात बुडाल्याने तिघांच्या नाकात व तोंडात पाणी गेले होते. त्यांना तातडीने बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी रुग्णालयात जाऊन पर्यटकांची भेट घेतली. पर्यटकांनी समुद्रात पोहताना पाण्याची खोली, लाटांचा वेग आणि समुद्राची स्थिती लक्षात घेऊन सुरक्षारक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक तरुणांच्या प्रसंगावधानामुळे तीन पर्यटकांचे प्राण वाचल्याने त्यांच्या धाडसी बचावकार्याचे कौतुक होत आहे. वाढती पर्यटकसंख्या लक्षात घेता समुद्रकिनारी जीवरक्षक, बचाव साधने आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.