Monday, September 7, 2026

BMC Election : ७९ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; जात प्रमाणपत्र, गुन्हेगारी अन् संपत्तीच्या घोषणांवरून वाद

BMC Election : ७९ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; जात प्रमाणपत्र, गुन्हेगारी अन् संपत्तीच्या घोषणांवरून वाद

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन विजयी उमेदवारांनी नगरसेवकपदाची सूत्रे हाती घेतली असली, तरी त्यांच्यापुढील अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. पराभूत उमेदवारांकडून विजयी नगरसेवकांच्या निवडीला विविध मुद्द्यांवरून न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ७९ निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत.

माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद नुकतेच रद्द झाल्यानंतर या निवडणूक याचिकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. निवडणुकीतील विजय अंतिम नसून उमेदवारांनी सादर केलेली कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रातील माहिती, जात प्रमाणपत्र तसेच संपत्ती आणि इतर घोषणांची कायदेशीर पडताळणीही तितकीच महत्त्वाची असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. (BMC Election)

विशेष म्हणजे, दाखल झालेल्या याचिका कोणत्याही एका पक्षापुरत्या मर्यादित नाहीत. मुंबईतील जवळपास सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या विजयी नगरसेवकांविरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर मिळालेले नगरसेवकपद कायदेशीरदृष्ट्या कितपत सुरक्षित आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (BMC Election)

जात प्रमाणपत्रापासून संपत्तीच्या माहितीपर्यंत आक्षेप

पराभूत उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये विविध गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामध्ये जात प्रमाणपत्राची वैधता, उमेदवारांनी सादर केलेली माहिती खोटी अथवा चुकीची असल्याचा आरोप, गुन्हेगारी प्रकरणांची माहिती, तसेच संपत्ती आणि आर्थिक बाबींबाबत दिलेल्या घोषणांवर आक्षेप घेण्यात आल्याचे समोर आले आहे. (BMC Election)

उमेदवार निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रामध्ये विविध वैयक्तिक, आर्थिक आणि कायदेशीर माहिती जाहीर करतात. या माहितीमध्ये विसंगती अथवा चुकीची माहिती असल्याचा आरोप झाल्यास त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे निवडणूक अर्ज आणि प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या प्रत्येक माहितीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

शिवसेना उबाठा सर्वाधिक २४ याचिकांमध्ये

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार पक्षनिहाय चित्र पाहता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांविरोधात सर्वाधिक २४ याचिका दाखल झाल्या आहेत. त्यानंतर भाजपविरोधात १६, काँग्रेसविरोधात १० आणि शिवसेना (शिंदे) पक्षाविरोधात ७ याचिका दाखल झाल्या आहेत. तसेच एमआयएमविरोधात ५, मनसेविरोधात २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात १ याचिका दाखल झाली आहे. (BMC Election)

५ नगरसेवकांची निवड बाद

७९ याचिकांपैकी आतापर्यंत ५ नगरसेवकांच्या निवडीवर प्रतिकूल परिणाम झाला असून त्यांची निवड बाद करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना उबाठाचे २, एमआयएमचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ नगरसेवक यांचा समावेश आहे. यामुळे निवडणुकीत विजय मिळवणे ही अंतिम पायरी नसून, उमेदवारीपासून प्रतिज्ञापत्रातील माहिती आणि निवडणूक प्रक्रियेतील कागदपत्रांची अचूकता तितकीच महत्त्वाची असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. (BMC Election)

निवडणूक पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या उमेदवारांनी मतदारांसमोर सादर केलेली माहिती अचूक आणि सत्य असणे आवश्यक आहे. त्यामध्ये काही त्रुटी, विसंगती किंवा तथ्य लपविल्याचा आरोप झाल्यास त्याचा परिणाम निवडणूक निकालावरही होऊ शकतो.(BMC Election)

७९ निवडणूक याचिका आणि त्यापैकी ५ नगरसेवकांची निवड बाद होणे, तसेच माजी महापौर विशाखा राऊत यांचे पद नुकतेच बाद होणे, या घटनांमुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील उमेदवारी व प्रतिज्ञापत्रांच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या पार्श्वभूमीवर उर्वरित याचिकांमध्ये काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण यापैकी आणखी काही नगरसेवकांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास महापालिकेतील पक्षीय संख्याबळावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत मतदारांचा कौल मिळवून विजयी झाल्यानंतरही न्यायालयीन कसोटीला सामोरे जावे लागत असल्याने मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या निवडीसमोर कायदेशीर आव्हान उभे राहिले आहे. (BMC Election)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >